सारखं खर्चाचं रडगाणं ऐकवणाऱ्या निर्मात्याची किशोर कुमारने अशी जिरवली

कसं असतं ना भिडूंनो, एखादा माणुस आपल्यावर खर्च करतोय याची जाणीव असतेच. पैसे देताना माणुस जर सारखं ऐकुन दाखवत असेल तर मात्र डोकेदुखी होते.

उदाहरण द्यायचं झालं, तर तुमच्या मित्राच्या वाढदिवसाचा प्लॅन तुम्ही आखताय. काही कारणास्तव अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होतोय. तुम्ही हे इतरांना सांगीतलं. सर्वजण मान्य झाले. पण कोणीतरी एक मित्र काॅन्ट्रीचे पैसे देताना सतत वाढलेल्या पैशांबद्दल काचकुच करत असेल, तर तुमच्या डोक्याचा भुगा होणारच.

असंच काहीसं झालं, दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बाबतीत. अर्थात कारण वेगळं होतं. 

गोष्ट १९७४ सालातली. निर्माते-दिग्दर्शक जे. ओम प्रकाश पहिला सिनेमा बनवत होते. सिनेमाचं नाव होतं ‘आप की कसम’. बाॅलिवूडचा काका अर्थात राजेश खन्ना, संजीव कुमार, मुमताज, असरानी अशी तगडी स्टारकास्ट होती. सिनेमा सुपरहिट झाला. विशेषतः सिनेमातली सहा गाणी सुद्धा अत्यंत सुंदर होती.

या सिनेमातलं सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘जय जय शिवशंकर’. 

हे गाणं बनवतानाचा किस्सा असा की, आर. डी. बर्मन यांच्याकडे या गाण्याच्या संगीताची जबाबदारी होती. सिनेमात अनेक लोकांच्या समूहावर गाणं चित्रीत होणार होतं. हे जाणुन आर. डी. बर्मन यांना कोरससाठी अनेक वाद्य आणि खुप माणसांची गरज होती. गाण्याच्या गरजेनुसार त्यांनी वाद्य आणि माणसांचा बंदोबस्त केला. 

यामुळे गाण्याचं बजेट वाढलं. हे गाणं आधी २५,००० मध्ये तयार होणार होतं. आर. डींच्या या गोष्टीमुळे गाण्याचं बजेट ५०,००० रुपयांवर गेलं. सिनेमाचे निर्माते ओम प्रकाश यांना हि गोष्ट कळाली. ५०,००० रुपये खर्च करुन सुद्धा गाणं चांगलं नाही झालं तर??? असा आगळाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते रेकाॅर्डींग रुममध्ये ५०,००० खर्च झाल्याची गोष्ट सारखी उगाळत होते. 

रेकाॅर्डींग रुममध्ये उपस्थित असलेले किशोर कुमार यांनी हे प्रकरण उडतं उडतं ऐकलं. त्यांनी बर्मनदांकडून सर्व हकीकत जाणुन घेतली. ‘तु या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. गाणं चांगलं होण्याकडे तुझं लक्ष असु दे’, असं किशोर कुमार यांनी बर्मनदांना सांगीतलं.

आता त्या वेळी किशोर कुमार यांच्या डोक्यात नेमकं काय चालु होतं, याची कोणालाच कल्पना नव्हती. 

किशोर कुमार हा खोडकर स्वभावाचा माणुस. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या ‘जय जय शिवशंकर’ गाण्याच्या रेकाॅर्डींगला सुरुवात झाली. लता मंगेशकर किशोर कुमारांसोबत गात होत्या. एक एक कडवं किशोर कुमार त्यांच्या स्टाईलमध्ये गात होते. गाणं संपताना म्युझिकचा आवाज वाढत होता आणि अचानक किशोर कुमार यांना एक मस्तीखोर कल्पना सुचली.

शेवटच्या लाऊड म्युझिकमध्ये

‘अरे बजाओ रे बजाओ ईमानदारी से बजाओ, अरे बजाओ बेटा, पचास हजार खर्चा कर दिए’

असं किशोर कुमार गातात. 

किशोर कुमारांनी केलेली हि खोडी आजही गाण्यात ऐकायला मिळते. गाणं संपताना किशोर कुमार त्यांच्या खास आवाजात हसत हसत या ओळी गातात. सध्याच्या काळात आपल्यावर कोणी टिका केली तर आपण लगेच त्याच्यावर पलटवार करुन मोकळे होते. परंतु त्या काळी किशोर कुमार यांनी निर्मात्यांच्या पन्नास हजारच्या तक्रारीचा सुर स्वतःच्या आवाजाने असा मावळला.

म्हणुनच किशोर कुमार हे आजही भारतीय सिनेसृष्टीतले महान गायक आणि अभिनेते मानले जातात. 

हे गाणं पहा यात गाणं संपता संपता ५० हजारांचा उल्लेख तूम्हाला ऐकू येईल.

 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.