माणूस दगा देतो, झाड नाही. म्हणूनच किशोर कुमार झाडांना मित्र करायचे…

आजूबाजूला माणसं २४ तास वावरत असतात. आपण सुद्धा त्यांच्या सानिध्यात दिवसभरात असतो. पण तरी हवं तसं समाधान मिळतं का? सर्वांना भेटून झाल्यावर स्वतःसाठी एक वेळ हवा असतो.

कधी वाटतं.. आपण दिवसभर अनेक लोकांशी खूप गप्पा मारल्या. पण आपण स्वतःशी काही बोललोय का? धकाधकीच्या जीवनात कधी  कोणालाही सोबत न घेता एकटंच कुठेतरी जावंसं वाटतं. समुद्रकिनारी लाटांचा आवाज ऐकत शांत बसावंसं वाटतं. आपण एकटे जरी असलो तरी सुद्धा आपल्या सोबत एक गोष्ट असते ती म्हणजे निसर्ग. झगमगत्या दुनियेत असाच एक माणूस होऊन गेला.

जो माणसांमध्ये कमी आणि झाडा – झुडूपांमध्ये जास्त रमायचा. हा माणूस म्हणजे किशोर कुमार. आज किशोर कुमार यांचा स्मृतीदिन. 

मोठा भाऊ अशोक कुमार फिल्मी जगतात स्वतःच्या अभिनयाने मशहूर होता. पण किशोर कुमार मात्र काहीसे वेगळे होते. मोठ्या भावाच्या कामाबद्दल त्यांना आदर आणि अभिमान होताच. आपण सुद्धा मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकून स्वतःचं नाव कमवावं, अशी इच्छा किशोर कुमार यांना बिलकुल नव्हती. त्यांच्या दुनियेत ते खुश होते.

असं सर्व असलं तरी किशोर कुमार यांनी भारतीय सिनेजगतात स्वतःची अजरामर ओळख निर्माण केली. 

किशोर कुमार के. एल. सेहगल यांना फार मानायचे. सेहगल साब जणू त्यांचे गायन क्षेत्रातले आदर्श होते. आपण ज्या व्यक्तीला आदर्श मानतो, त्याला आयुष्यात एकदा तरी भेटण्याची इच्छा असते. किशोर कुमार यांची सुध्दा इतकीच इच्छा होती. अशोक कुमार त्यावेळी स्टार होते. मोठ्या भावाच्या ओळखीने के. एल. सेहगल यांना भेटता येईल, या हेतूने मध्य प्रदेशातील खांडवा येथे राहणारे किशोर कुमार मुंबईत आले. 

मुंबईत आल्यावर त्यांची के. एल. सेहगल यांच्याशी भेट झाली. माझी लोकप्रिय गाणी किशोरने गाऊन त्याचा एक म्युझिक अल्बम काढावा, अशी सेहगल साब यांची इच्छा होती. परंतु किशोर कुमार यांनी सेहगल साब यांना नम्रपणे नकार दिला.

“तुमची गाणी ही तुमची ओळख आहे. मला ती ओळख किंवा तुमच्या आवाजाची नक्कल करायची नाहीय. तुमची गाणी तुमच्या आवाजात तशीच अबाधित राहतील.”

असं किशोर कुमार यांनी सेहगल साब ना सांगितले.  

या भेटीनंतर किशोर कुमार पुन्हा घरवापसी करणार होते. पण त्यांच्या नशीबात काहीतरी वेगळं होतं.

दादामुनी अशोक कुमारचा भाऊ म्हणून किशोर कुमारला अनेक निर्माते, दिग्दर्शक सिनेमात घेऊ इच्छित होते. अशोक कुमार यांचं मार्गदर्शन होतंच. त्यामुळे सुरुवातीला एक सिनेमा केला, त्यानंतर दुसरा सिनेमा आणि बघता बघता किशोर कुमार अभिनेते आणि गायक म्हणून प्रसिद्ध झाले. 

पुढचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. किशोर कुमार यांना सिनेसृष्टीबद्दल एवढी आत्मीयता नव्हती.

“इथे जेव्हा निर्माते, दिग्दर्शक यांना तुमच्यात फायदा दिसतो तेव्हाच ते तुमच्यासोबत असतात. एकदा हा फायदा संपला की तुमच्या कठीण काळात तुम्हाला मदत करायला कोणी पुढे येत नाही.”

असं किशोर कुमार यांचं परखड मत होतं. हे मत किती वास्तविक आहे, याची जाणीव होते. कारण सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अनेक माणसांना उतारवयात फार हलाखीत दिवस काढावे लागतात. 

किशोर कुमार यांना कसलंही व्यसन नव्हतं. त्यामुळे शक्यतो पार्टी, समारंभ यांना जाणं ते टाळायचे. कारण नाही म्हटलं तरी अशा आलिशान कार्यक्रमांमध्ये आग्रह करणारे कमी नसतात. त्यामुळे किशोर कुमार शूटिंग झालं की थेट घर गाठायचे. घरी आल्यावर ते काय करायचे ? तर थकवा घालवण्यासाठी ते हॉलिवूडचे हॉरर सिनेमे बघायचे.

त्यांच्या घराभोवती मोठी बाग त्यांनी निर्माण केली होती. त्या बागेची काळजी घ्यायचे. 

या बागेतील रोपट्यांवर, येथील झाडांवर किशोर कुमार यांचं नितांत प्रेम होतं. हे सर्व जणू त्यांचे मित्र. याच भावनेने त्यांनी जनार्दन, रघुनंदन, जगन्नाथ, गंगाधर अशी झाडांची नावं ठेवली होती. या झाडांशी दररोज गप्पा मारण्यात, त्यांना गाणी ऐकावण्यात किशोर कुमार यांना आनंद वाटायचा. त्यांच्या अशा स्वभावामुळे इंडस्ट्रीत त्यांना सर्व ‘मॅड मॅन’ म्हणायचे. ‘माणसांच्या मतलबी जगात नि:स्वार्थी असलेली निसर्गाची दुनिया मला अधिक प्रिय आहे.’

असं किशोर कुमार सांगायचे. एरवी मुंबईत यशस्वी झाल्यावर इथेच कायमचे सेटल होणारे कलाकार दिसतात. परंतु किशोर कुमार यांना मुंबईतलं वातावरण आवडलं नाही. ते कालांतराने पुन्हा एकदा त्यांच्या घरी मध्य प्रदेशला गेले. 

किशोर कुमार यांचं मुळ नाव आभास कुमार. सिनेसृष्टी हा त्यांच्यासाठी एक आभास म्हणावा लागेल. या दुनियेचे रंग लावून सुद्धा स्वतःचं अस्तित्व जपणारी, मातीशी प्रामाणिक राहणारी, निसर्गावर मनसोक्त प्रेम करणारी किशोर कुमार सारखी माणसं सध्याच्या जगात सापडणं कठीण आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.