‘अगले पचास वर्ष ये गाना गूंजता रहेगा’ किशोर कुमारचं हे वाक्य खरं ठरलं

सिनेमातील गाण्याच्या मेकींगच्या कथांना अंत नाही.

सत्तरच्या दशकातील एका लोकप्रिय गाण्याचा हा किस्सा. राजेश खन्ना, मुमताज,संजीव कुमार यांचा एक चित्रपट ‘आप की कसम’ १९७३ साली आला होता. जे ओम प्रकाश दिग्दर्शित या सिनेमाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी तथा पंचमचे होते.

या सिनेमातील गाणी “करवटें बदलते रहे सारी रात हम”, “सुनो कहो कहा सुना” , “पास नहीं आना भूल नहीं जाना”, “ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मुकाम”, “चोरी-चोरी चुपके चुपके” हि गाणी खूप गाजली होती पण यातील सर्वात लोकप्रिय गाणे ठरले “जय जय शिव शंकर काँटा लगे न कंकर” यातील सर्व गाण्याचे बजेट दिड लाख ठरले होते.

प्रत्येक गाण्याला साधारणत: २५ हजारा पर्यंत खर्च करणे अपेक्षित होते.

“जय जय शिव शंकर ” या गाण्याचे दोन किस्से मशहूर आहेत. पहिला किस्सा म्हणजे सुरूवातीला हे गाणे गायला लता तयारच नव्हती. कारण हे गीत जरी भगवान शंकराचे असले तरी यात भांग,नशा अशा अर्थाचे शब्द येणार होते व लताचा या शब्दांना आक्षेप होता. पण आनंद बक्षी यांनी लताला विश्वास दिला की ते अशा प्रकारच्या कुठच्याही शब्दांचा वापर इथे करणार नाहीत.

लता गाणार म्हटल्यावर सर्वांना हुरूप आला. गाण्याच्या रिहर्सल सुरू झाल्या. या गाण्यात लता-किशोर सोबत कोरस देखील गाणार होता. त्या मुळे पंचमने या गाण्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायची ठरवले. लोकसंगीताची धुन व कॅची शब्दरचना असल्याने गाणं शंभर टक्के हिट होणार याची त्याला खात्री होती. त्यामुळे सारी टीम ’तब्येतीने’ गाण्याच्या तयारीला लागली.

एकदा रिहर्सल बघायला दस्तुर खुद्द जे ओम प्रकाश आले. गाण्यासाठी एवढा मोठा वादकांचा ताफा बघून ते मनातून चरकले. व आत निघून गेले. पंचमला शंका आलीच ते पाठोपाठ आत गेले. त्यांनी जे ओमप्रकाश यांना विचारले’क्या हुवा दादा?’ त्यावर उत्तर होतं “मज़ा नहीं आ रहा है” आणि “पैसे बहुत लग जायेंगे, पचास हजार खर्च करने होगे” यावर पंचम शांत झाले. पैशाचाच प्रश्न तिथे काय बोलणार? आपलं चांगल गाणं बाद होणार या विचाराने ते नाराज झाले .

शेवटचा उपाय म्हणून त्यांनी किशोरला हि गोष्ट सांगितली. किशोरने हसून सांगितले ’इतनी सी बात..लो अभी ठीक करता हूं’ किशोर तडक जे ओमप्रकाश कडे गेला म्हणाला ’ इस पिक्चर का यही एक गाना सबसे जादा कामयाब होगा..आप पचास हजार की बात कर रहे हो अगले पचास वर्ष ये गाना गूंजता रहेगा..मै गॅरंटी देता हूं’ किशोरच्या समुपदेशाने जे ओमप्रकाश तयार झाले व गाण्याचे बजेट वाढवले गेले आणि मोठ्या मस्तीत गाण्याचे रेकॉर्डींग झाले.

आता किशोरकुमारने धमाल करायची ठरवले.

या गाण्याच्या रेकॉर्डींग च्या वेळी किशोरने त्याच्या स्वभावाला अनुसरून एक प्रचंड दंगा केलाय . गाण्याच्या शेवटी कोरसचा टेंपो वाढत जातो तेंव्हा किशोरने आपल्या आवाजात दोन ओळी घुसडल्या. ’अरे बजाव रे बजाव इमानदारीसे बजाव , पचास हजार खर्च किये है….!’ म्हणत जे ओमप्रकाश ला चिमटा काढला! आजही तुम्ही बारकाईने गाणं ऐका तुम्हाला स्पष्ट पणे ’अरे बजाव रे बजाव इमानदारीसे बजाव, पचास हजार खर्च किये है….!’ऐकायला मिळेल.

किशोरचे शब्द अक्षरश: खरे ठरले १९७४ सालच्या बिनाका गीत माला च्या वार्षिक कार्यक्रमात हे गाणे दुसर्‍या क्रमांकावर होते. हे गाणे आजही अफाट लोकप्रिय आहे.

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.