११ मतांनी आमचा उमेदवार पडला अन् रात्री ११ वाजता हळुच गुलाल धुतला…
बोलभिडूने आव्हान केलं. तुमच्या निवडणुकीचे किस्से तुम्ही सांगा. त्याच कारण एकच सत्ताधारी असो कि विरोधक. निवडणुका हा एक उत्सव असतो. भांडण, कुरघोड्या हे कायमच. यात गमतीजमती, गाजलेली भाषण, एका क्षणात फिरलेलं वारं अशा खूप गोष्टी असतात. तुम्ही पण लिहायला घ्या. bolbhidu1@gmail.com वर तुम्ही लिहलेले किस्से पाठवा.
तुर्तास असाच एक किस्सा, चंदगड तालुक्यातल्या श्रीनाथ माडूळकर या भिडूने पाठवलाय. वाचा.
वेळ – २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकालाचा.
२८८ हा बालवाडीच्या दरवाज्या वरती लिहलेला आकडा मला समजायला २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस उजडवा लागला.
सन २००४ साली महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघामधील २८८ हा शेवटचा मतदार संघ म्हणजे चंदगड मतदार संघ (२००९ पासून मतदारसंघात बदल होऊन आता नंबर २७१ झालाय.)
वय साधारण १२ वर्षे पण शर्टच्या कॉलर पासून ते हाफ चड्डीच्या शेवटच्या शिलाई पर्यंत उमेदवाराचे स्टिकर लावून केलेला प्रचार. आमचा उमेदवार कसा योग्य यासाठी केलेली मारामारी आणि कोण कुठल्या उमेदवाराचा समर्थक यावरून केलेल्या क्रिकेटच्या टीम. एवढ सद्याच्या काळात केलं असतं तर उमेदवारंच आमचा कट्टर समर्थक म्हणून बॅनर लावला असता. पण नारळ फोडला नसता कारण, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं निवडणूक चिन्ह होते नारळ.
दिवस ढकलत होते प्रचार संपला, निवडणूकीचा भडंग पण वाटून-खाऊन संपला,
आणि निकालाच्या दिवसाचा सूर्य उगवला…
तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी आणि लाऊडस्पीकर वर आकडे ऐकून तिकडून कोणी आल्याशिवाय कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर काय समजायचं नाही आणि तो खड्यातून रास्ता शोधत गावी यायचं तो पर्यंत तिकडे मोजणीचे आकडे बदलेले असतं
अशा वातावरणात सायंकाळी ४ च्या सुमारास आमचा उमेदवार जिंकला असे सांगत दोन मोटरसायकल गाड्या आणि ६ माणसे आले..
ती गावातीलच आहेत का कोण आहेत हे गुलालात रंगलेल्या तोंडाला पाणी मारून बघावे लागले. त्यांनी उमेदवार जिंकला असं सांगितलं. पुन्हा गाड्या माघारी फिरून परत मोजणीच्या ठिकाणी. त्यांच्या मोटरसायकलचा धूर उडून जायच्या आत आमच्या पक्षाच्या फटाके फुटून ढगात धूर, आम्ही फटाके ऐकून घरातून पळत गल्लीत पोचायच्या आत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दारात फटाके फुटायला चालू झाले. विरोधक आणि आम्ही दोघांच्या घरासमोर फटाके फुटू लागले.
ज्यांना थोडंफार कळत होते त्यांना कळायचं बंद झालं आणि आम्हाला काय फटाके वाजले की मजा यायची…
रात्र झाली फटाके बंद झाले तसे दारू पिणाऱ्याचे शाब्दिक फटाके चालू झाले. तो पर्यंत आमच्या अंगावर पण थोडा गुलाल पडला होता कुणी टाकला आठवत नाय पण घरच्यांच्या शिव्या आठवतात…
शेवटी २-३ वेळा फेरमतमोजणी होऊन निकाल लागला, आमचा उमेदवार ११ मतांनी निवडणूक हरला आणि हे सगळ्या गावाला पचवायला रात्रीचे ११ वाजले आणि आमच्या गुलालाच्या चेहऱ्यावर १२ वाजले…
निकालानंतर आमच्या उमेदवाराच्या गटाच्या लोकांना एकच प्रश्न गुलाल धुवायचा कुटं…
पंधरा दिवसांनी विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आमच्या लोकांना विचारलेला एकच प्रश्न…
“गुलाल धुतला कुठं”
२००४ ची हि निवडणूक युतीचे माजी राज्यमंत्री भमरुआण्णा पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नरसिंगराव पाटील यांच्यात झाली होती. नरसिंगराव पाटील या निवडणुकीत ११ मतांनी विजयी झाले होते.
नाव – श्रीनाथ माडूळकर, ढोलगरवाडी, चंदगड(कोल्हापूर).
आपण आपले किस्से bolbhidu1@gmail.com वर पाठवू शकता.