कोण कुठला लाईटमन ! पण फारुख शेख त्याला भेटायला रोज हाॅस्पीटलमध्ये जायचे

‘तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धुप तुम घना साया’ हे जगजित सिंग यांनी गायलेलं गाणं. ‘साथ साथ’ सिनेमातलं गाणं लोकप्रिय होण्याचं महत्वाचं कारण जगजित सिंग यांचा आवाज आहेच.

पण हे गाणं ज्या कलाकारावर चित्रीत झालंय त्या फारुख शेख यांचाही गाणं लोकप्रिय होण्यात मोठा वाटा आहे. देखणं रुप, निखळ हास्य असणारे फारुख शेख वाट्याला आलेली प्रत्येक भुमिका उत्तम साकारायचे.

फारुख शेख मुंबईतील सेंट झेव्हियर्स काॅलेजमध्ये शिकायला होते. अभिनेत्री शबाना आझमी यांना फारुखभाई दोन वर्ष सिनीयर होते. शबाना आझमी यांचा मैत्रीणींच्या ग्रुपमधील रुपा जैनशी पुढे फारुखभाईंनी विवाह केला.

‘फारुख शेख दिसायला इतके भारी होते, की आम्ही सर्व मुली त्यांच्यावर फिदा होतो’, अशी आठवण शबाना आझमी यांनीच सांगीतली आहे.

सेंट झेव्हियर्स काॅलेजमध्ये तेव्हा फारुख शेख ‘ज्युनियर शशी कपूर’ या नावाने ओळखले जात असत. 

फारुखभाईंच्या सिनेकारकीर्दीवर एक नजर टाकल्यास असं पाहायला मिळतं की ते कोणत्याही स्पर्धेचा हिस्सा नव्हते. १९८० च्या दशकात बच्चन-कपूर यांच्यामध्ये जी अनामिक स्पर्धा होती त्या स्पर्धेचा साधा स्पर्शसुद्धा फारुख शेख यांना संपूर्ण करियरमध्ये झाला नाही.

साध्या-सोप्या विषयांच्या दर्जेदार सिनेमांमध्ये फारुखभाईंचा अभिनय अनुभवणं हि पर्वणीच. 

फारुखभाईंनी ‘उमराव जान’ मधील ऐतिहासीक नवाब सुलतान साकारला, तर ‘चष्मेबद्दूर’ मध्ये सिद्धार्थच्या भुमिकेतुन स्वतःच्या आत दडलेला विनोदी कलाकार त्यांनी सर्वांना दाखवला. ‘साथ साथ’ मधल्या अविनाशच्या रुपात वैवाहीक जीवनातील घुसमट त्यांनी प्रभावीपणे उभी केली. ‘कथा’ सिनेमातला नसीरुद्दीन शहाच्या खोडकर मित्राच्या रुपात फारुख सर्वांचंच मन जिंकुन गेले.

विविध प्रकारच्या भुमिका त्यांनी साकारल्या. प्रेक्षकांचे प्रेम सुद्धा लाभलं. तरीही शेवटपर्यंत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा कोणताही आविर्भाव त्यांच्या चेह-यावर दिसला नाही. 

फारुखभाईंविषयी सई परांजपे यांनी एक किस्सा एका मुलाखतीत सांगीतला होता.

तो किस्सा असा…

फारुखभाईंनी सई परांजपे दिग्दर्शित ‘चष्मेबद्दूर’ आणि ‘कथा’ या सिनेमांमध्ये काम केलंय. १९८० दरम्यान चष्मेबद्दूरचं शुटींग दिल्लीत सुरु होतं. फारुखभाईंची सिनेमात प्रमुख भुमिका. एकदा सिनेमाच्या सेटवर एक लाईटमन खाली पडला. लाईटचा सेटअप करताना त्याला हा अपघात झाला आणि तो जबर जखमी झाला. लाईटमनला तत्काळ हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर होती. 

पुढच्या दिवशी पुन्हा शुटींग सुरु झालं. फारुखभाई मात्र शुटींग झाल्यावर पटकन निघुन जायचे. सई परांजपेंना कालांतराने कळालं की फारुखभाई कोणालाही न सांगता ज्या हाॅस्पीटलमध्ये तो लाईटमन ॲडमिट होता, त्याची विचारपुस करायला जायचे.

त्याला काय हवं नको ते बघुन त्याच्या कुटूंबियांना थोडीफार आर्थिक मदत त्यांनी केली. फारुखभाई सेटवर कोणालाही याविषयी न सांगता करता दररोज त्या लाईटमनला भेटायचे. फारुखभाईंनी केलेल्या या कृतीमुळे त्यांच्या आत असलेल्या माणुसकीची जाणीव आपल्याला होते. 

फारुखभाईंचं राहणीमान अत्यंत साधं होतं. ते खुपवेळेस शुटींगला जाण्या-येण्यासाठी रिक्षाचा वापर करायचे. अंधेरीला लोकांच्या गर्दीतुन सफेद सदरा घालुन कसलीही लाज न बाळगता ते रस्त्यावर बिनधास्त फेरफटका मारत असत. भारत सरकार पोलीओचे जे डोस लहान मुलांना देतं त्या उपक्रमात फारुखभाईंचाही सहभाग होता. वर्षातले १२ रविवार त्यांनी हे काम केले आहे. 

२०१३ साली ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमात रणबीर कपुरच्या वडीलांच्या भुमिकेत फारुखभाई झळकले होते. या शेवटच्या सिनेमात सुद्धा त्यांची भुमिका प्रेक्षकांना आवडुन गेली. फारुख शेख यांच्या निखळ हास्याप्रमाणे त्यांचे सिनेमे पाहुन आपल्याही चेह-यावर आनंद झळकल्याशिवाय राहत नाही. 

  •  भिडू देवेंद्र जाधव 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.