आपल्या प्रेमासाठी सुनिल दत्त थेट मुंबईचा डॉन हाजी मस्तानशी भिडले होते..

प्रेमासाठी काय पण !

हे फक्त म्हणायला ठीक आहे. पण खरंच अशी वेळ येते तेव्हा आपण काय करतो, याला खरं महत्व आहे. कसं असतंय ना भिडूंनो, तंत्रज्ञानाने आपण कितीही प्रगत झालो तरी समाजाच्या बुरसट विचारांना नाही रोखु शकत. जेव्हा गोष्ट आंतरजातीय लग्नाची असेल तेव्हा मात्र हाच समाज उफाळून स्वतःची मतं मांडतो. खुपदा समाज राहिला बाजुला, मुला-मलीच्या घरच्यांचाच या लग्नाला विरोध होतो.

असंच काहीसं झालं अभिनेते सुनील दत्त आणि नर्गीस यांच्या बाबतीत. प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांच्या लग्नाला विरोध होता चक्क एका डाॅनचा.

हा डाॅन होता मुंबईतील गुन्हेगारी जगतात मशहूर असा हाजी मस्तान.

गोष्ट १९५७ सालची. नर्गीस आणि सुनील दत्त ‘मदर इंडिया’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत होते. गंमत म्हणजे या सिनेमात नर्गिस आणि सुनील दत्त आई-मुलाच्या भुमिकेत. सुनील दत्त तसे आधीपासुन नर्गीसवर भाळलेले. ‘मदर इंडिया’ च्या निमित्ताने दोघे आणखी जवळ आले.

सुनील आणि नर्गीसमधलं प्रेम बहरत होतं.

गुजरात मधील गावात एका शेतावर ‘मदर इंडिया’चा क्लायमॅक्स चित्रीत होणार होता. सर्व तयारी करण्यात आली. नर्गीस शाॅटसाठी तयार होती. आणि अचानक हवेचा एक मोठा झोत आला आणि बघता बघता नर्गिस जिथे उभी होती त्या शेताने पेट घेतला. नर्गिसजवळ आगीच्या ज्वाला येत होत्या.

सुनील दत्तने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पेटत्या आगीत उडी घेतली आणि नर्गीसला आगीतुन वाचवले.

या घटनेमुळे सुनील आणि नर्गीस यांचं प्रेम आणखी वाढलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पण या दोघांच्या लव्हस्टोरीत एक व्हिलन होता. हा व्हिलन दुसरा तिसरा कोणी नसुन मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात गुन्हेगार हाजी मस्तान होता. हाजी मस्तानची १९५७ च्या वेळेस मुंबईत दहशत होती. सामान्य माणसांचा मसीहा म्हणुन त्याची ओळख असली तरी लोकांच्या मनात त्याच्याविषयी एक दरारा होता. हाजी मस्तानचे सिनेसृष्टीत सुद्धा तसे संबंध होते.

नर्गीस आणि सुनील दत्त एकमेकांशी लग्न करत आहेत, हि बातमी हाजी मस्तानपर्यंत पोहोचली.

हाजीने दोघांच्या लग्नाला कडाडून विरोध केला. सुनील दत्त यांना हाजी मस्तानकडून धमकीचे फोन यायला सुरुवात झाली. सुनील दत्त यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण फोन वारंवार येत राहिले. हाजी मस्तानचं म्हणणं होतं,

‘नर्गिस हि आमच्या मुसलमानांची शान आहे. कोणी हिंदू जर तिच्याशी लग्न करणार असेल तर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही.’

कुख्यात गुन्हेगाराची अशी धमकी ऐकुनही सुनील दत्त डगमगले नाहीत. त्यांच्या पाठीशी अफाट प्रेमाचं बळ होतं. त्यांनी हाजी मस्तानला फोन लावुन भेटायचं ठरवलं. मुंबईतील एका बंदरावर हाजी मस्तान आणि सुनील दत्त आमनेसामने आले.

सुनील दत्त यांनी हाजी मस्तानसमोर शांतपणे स्वतःचं म्हणणं मांडलं.

ते म्हणाले,

“मी नर्गिसवर जीवापाड प्रेम करतो. तिच्याशी लग्न करुन मी तिला आयुष्यभर सुखी ठेवेन. तुम्हाला हे जर चुकीचं वाटत असेल तर मला इथेच गोळी मारा. आणि जर तुम्हाला हे पटलं असेल तर आपण दोघं एकमेकांना आलिंगन देऊ.”

सुनीलजींचं नर्गिसविषयीचं प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दांतुन हाजी मस्तानला जाणवलं. तिथल्या तिथेच दोघांच्या लग्नाविषयीचा हाजी मस्तानचा विरोध मावळला.

११ मार्च १९५८ रोजी नर्गिस आणि सुनील दत्त यांनी एकमेकांशी विवाह केला.

हाजी मस्तानने मोठा पुष्पगुच्छ या दोघांना शुभेच्छा म्हणुन पाठवला होता. स्वतःच्या प्रेमासाठी आत्मविश्वासाने कसं लढावं, याचं उदाहरण म्हणुन सुनीलजींच्या या कृतीकडे पाहता येईल. तसंच स्वतःच्या म्हणण्यावर ठाम राहून विशिष्ट शब्दांनी समोरच्या व्यक्तीच्या मनातला राग कसा दूर करावा, याची हुशारी सुनील दत्त यांच्यापाशी होती.

स्वतःच्या प्रेमासाठी हाजी मस्तानसारख्या माणसासमोर निडरपणे उभे राहणा-या सुनील दत्त यांना सलाम.!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.