१२०० कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीने ४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणूकांची घोषणा झालीय. राजकीय पुढारी देखील अगदी यात मग मंत्र्यापासून सगळे आमदार, खासदार आप-आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर स्वतः जातीने लक्ष देवून असतात.

पण मागच्या आठवड्यात केरळ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने इतिहास रचला आहे. एका बाजूला डावे, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांनी तर यश मिळवलंच पण त्या सोबतच १ हजार २०० कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या एका कंपनीने देखील ४ ग्रामपंचायतीमध्ये आपला सरपंच बसवला आहे.

केरळ स्थित ‘अन्ना – किटेक्स’ समूहाने आपल्या सीएसआरच्या पैशांमधून ‘ट्वेंटी-20’ नावाची एक सामाजिक संघटना उभी करून गावाचा विकास चालू केला आहे.

‘ट्वेंटी-20’ ने ५ वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत किझाकंबलम या ग्रामपंचायतीची पहिल्यांदा निवडणूक लढवत १९ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. या पाच वर्षांमध्ये कंपनीन आणि संघटनेनं या गावच रुपडं पालटलं आहे.

किझाकंबलम मध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये या संघटनेनं ३ हजार ६०० घरांमध्ये इंटरनेट, चांगल्या मेडिकल सेवा, फ्री ऍम्ब्युलन्स, बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीमध्ये किराणा सामान, चांगले रस्ते, कॅनॉलच्या माध्यमातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी, शेतकऱ्यांसाठी ऍग्रो मशीनरी, गर्भवती महिलांना जेवण अशी काम केली आहेत.

त्याच जोरावर या महिन्यात झालेल्या निवडणुकीत किझाकंबलम मध्ये १९ पैकी १८ जागा जिंकत हि ग्रामपंचायत तर राखलीच पण त्यासोबतच शेजारच्या एकरनाडु, कुन्नथुनाडु, मुजवन्नूर या ग्रामपंचायती देखील जिंकल्या आहेत.

कोणत्याही कॉर्पोरेट समूहाशी जोडलेली हि देशातील कदाचित पहिलीच समाजसेवी संघटना असावी जिने निवडणूक लढवत राजकीय पक्षांवर मात दिली आहे.

ही संघटना कशी उदयास आली?

ट्वेंटी-20 ही संघटना अन्ना-किटेक्स समूहाची किटेक्स गारमेंट्स कंपनीचे मुख्य संचालक साबू एम. जॅकब यांच्या विचारातून पुढे आलेली संघटना आहे. त्यांचा भाऊ आणि अन्ना अल्युमिनियमचे प्रमुख बॉबी यांची साथ त्यांना आहे.

वडिलांची सामाजिक कार्याची इच्छा म्हणून २०१२ मध्ये या दोन भावांनी किझककंबलम मध्ये एक आरोग्य शिबीर भरवलं. जॅकब बंधूना अजिबातच अंदाज नव्हता की, हे आरोग्य शिबीर त्यांना एका वेगळ्या दिशेनं घेऊन जाणार पाऊल ठरले.

कंपनीने शिबिरासाठी १०० डॉक्टर आणि ५०० हॉस्पिटलची मदत घेतली होती. एका दिवसात जवळपास ७ हजार लोकांनी उपस्थिती लावली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात शिबिरात आरोग्यापेक्षा लोकांच्या रस्ते, पाणी, वीज, साफ-सफाई या घटकांशी संबंधित जास्त तक्रारी होत्या.

यावर उपाय म्हणून २०१३ मध्ये जॅकब बंधूनी त्या भागातील उद्योगपती, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि गावाच्या विकासासाठी त्यांची मदत मागितली. या बैठकीत त्यांनी विकासासाठी १२ कलमी एक कार्यक्रम तयार केला आणि त्याला २०२० पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं.

याच लक्ष्यला त्यांनी ‘ट्वेंटी-20 किझककंबलम’ असं नाव दिलं.

सोबतच या लक्ष्याचा आढावा घेण्यासाठी ‘ट्वेंटी-20’ याच नावानं अन्ना किटेक्स समूह आणि सेवना समूह (इलेक्ट्रानिक वस्तू बनवणारी कंपनी) या दोघांच्या भागीदारीत एक संघटना तयार केली. साबू जॅकब हे याचे मुख्य संयोजक आहेत.

पण जॅकब माध्यमांशी बोलताना सांगतात,

आम्ही पाण्याशी संबंधित, घराशी संबंधित ज्या काही योजना तयार केल्या त्या प्रत्येक योजनेचा ग्रामपंचायतीने विरोध सुरु केला. त्यामुळे आमच्या १२ कलमी कार्यक्रमातील एक ही योजना पुढे जावू शकली नाही.

मग ‘ट्वेंटी-20 राजकारणात कसे आले?

ग्रामपंचायतीच्या सततच्या विरोधामुळे ‘ट्वेंटी-20’ सोबत विकास कामासाठी जोडल्या गेलेल्या इतर कंपन्यांनी देखील त्यांची साथ सोडली. हा विरोध पुढली जवळपास ३ वर्ष चालू राहिला.

अशातच ऑगस्ट २०१५ मध्ये ओणमच्या काळात ग्रामपंचायतींने सूडबुद्धीने आम्हाला वागणूक दिली.

जॅकब या बाबतीत माहिती देताना सांगतात,

ओणम आमच्या इथला सगळ्यात मोठा सण असतो. त्या दिवशी आम्ही १५ हजार स्के. फूट शेड उभं करून गावातील लोकांसाठी कमी दरात घरगुती सामान विकण्यासाठी दुकान लावलं होत. अशावेळी दुकानात बरीच गर्दी असताना संध्याकाळी ६ च्या दरम्यान अचानकच पंचायतीने या भागात कलम १४४ लागू केलं. त्यामुळे आम्हाला ४ हजार जणांना बाहेर निघायला पहाटेचे ३ वाजले होते.

या घटनेनंतर ट्वेंटी-20′ ची एक बैठक झाली. संघटनेशी जोडलेली काही लोक या निष्कर्षाला आली की, जो पर्यंत पंचायतीमध्ये दुसऱ्या राजकीय पक्षांचं वर्चस्व आहे तो काहीच काम होणार.

त्यामुळेच अखेरीस २०१५ च्या ओणममध्ये आमच्या संघटनेनं राजकीय पदार्पणाचा निर्णय घेतला, आम्हाला लक्षात आलं होत की, कोणत्याही राजकीय ताकदीविना, ग्रामपंचायतीच्या मदतीशिवाय काहीच करू शकणार नाही. असं जॅकब एका मुलाखती दरम्यान सांगतात.  

पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताच काँग्रेसकडून ‘ट्वेन्टी-20’ आरोप चालू झाले की,

कंपनी या क्षेत्रामध्ये ब्लीचिंग पाऊडरचा कारखाना सुरु करू इच्छिते, आणि त्या कारखान्याला क्लिअरन्स मिळण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु आम्ही या टीककांकडे लक्ष्य न देता २०१५ आणि २०२० या दोन्ही वर्षातील निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या आणि जिंकल्या. सोबतच आता आम्ही याच विकासाच्या मुद्द्यावर येणाऱ्या विधानसभांच्या निवडणूक देखील लढवणार आहे, असे जॅकब माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगतात.

‘ट्वेंटी-20’ चे या भागात जवळपास ४ हजार ५०० नोंदणीकृत सदस्य आहेत. या सदस्यांनीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी महत्वाची भूमिका पार पडली. संघटनेचे सदस्य के.वी. जॅकब सध्या किझककंबलम या पंचायतीचे अध्यक्ष (सरपंच) आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील प्रभावित झाले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २०१७ मध्ये किझाकंबलम ग्रामपंयातीने बनवलेल्या फूड सिक्यूरिटी मार्केटचे उदघाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीमध्ये विकले जाणारे सामान बघून गडकरी चांगलेच प्रभावित झाले होते. त्यांनी त्याक्षणी रस्ते बनवण्यासाठी पंचायतीला ४२ कोटी रुपये दिले होते.

सोबतच हे मॉडेल देशभरात लागू करण्याची गरज असल्याचे देखील गडकरींनी सांगितले होते. 

कोरोना आणि लोकडाऊन च्या काळात देखील ‘ट्वेंटी-20’ या संघटनेने सॅनिटायझर, मास्क आणि फूड किट्स यांचं सतत वाटप चालू ठेवले होते. २ महिन्यांमध्ये जवळपास २६ हजार ५०० लोकांपर्यंत त्यांची हि मदत पोहचली होती.

त्यामुळे ग्रामपंचायतीमधून फक्त राजकारणच नाही तर विकास देखील करता येऊ शकतो असाच एक प्रकारचा संदेश या संघटनेनं दिला आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.