आई अभ्यास सोडून खेळायला जा म्हणाली, आता वेंकटेश अय्यरनं आठ कोटी कमावलेत
लहानपणी सगळ्यात जास्त मार कशामुळं खाल्ला असेल, तर क्रिकेट खेळण्यावरुन. एकवेळ बड्डेला नवे कपडे नका घेऊ, पण उन्हाळ्यात बॅट आणि बॉलसाठी पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता आपल्याकडे काय तेंडुलकर, कोहलीसारखं लहानपणीच जबरी बॅटिंग करण्याचं स्किल नव्हतं. पण कोचिंग मिळालं असतं तर आपणही लय बाप क्रिकेटर झालो असतो, असं कधी कधी मनापासून वाटतं.
बालपण मोबाईलमध्ये नाही तर मैदानावर घालवणाऱ्या पिढीच्या आयुष्यात असा एक दिवस नसेल, जेव्हा घरचे म्हणाले, ‘बाळा आज अभ्यास राहूदे, जरा खेळायला जा.’ कारण आपल्याकडे उलटं चित्र होतं. कित्येक जणांची मदर आधी मैदानावर फटके द्यायची, मग घरी फटके मारत आणायची आणि वर घरी आल्यावर परत हाणायची. ‘ती बॅट जाळून टाकीन एकदा’ हा डायलॉग तर आयुष्यात किती वेळा ऐकला असेल गिणतीच नाय. आता बॅटची जागा मोबाईलनं घेतलीये म्हणा.
पण आपल्या भारतातच एक आई अशी आहे, जी आपल्या पोराला म्हणली की, ‘बाळा आज अभ्यास राहूदे, जरा खेळायला जा.’ पोरगं होतं सीए, पण आईचं म्हणणं कसं टाळणार? त्यामुळं, एमबीए पूर्ण केलेलं, सीएची नोकरी करणारं पोरगं क्रिकेटच्या मैदानात उतरलं आणि थेट इंडियाकडूनही खेळलं.
तो पोरगा म्हणजे वेंकटेश अय्यर. आयपीएलच्या नव्या सिझनसाठी प्लेअर्सचं रिटेन्शन झालं. कोलकाता नाईट रायडर्सनं थोडेथिडके नाही तर आठ करोड रुपये मोजत अय्यरला आपल्या संघात कायम ठेवलं. विशेष म्हणजे अय्यरला संघात घेतलं तेव्हा त्याला फक्त २० लाख रुपये देण्यात आले.
थोडक्यात भावानी ४० पट जास्त रक्कम मिळवली आहे…
वेंकटेशचा जन्म झाला मध्य प्रदेशमधल्या इंदौर इथं. त्याचे वडील एचआर कन्सल्टंट आहेत, तर त्याच्या आईनं रुग्णालय व्यवस्थापक म्हणून काम केलंय. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत अय्यर क्रिकेट फक्त छंद म्हणून खेळत होता. विशेष म्हणजे, बाकी पोरांच्या अगदी उलट त्याला खेळण्यापेक्षा जास्त गोडी शिक्षणाची होती. त्यानं आपल्याला सीए व्हायचंय हे डोक्यात पक्कं केलं होतं, त्यामुळं त्यानं बीकॉम करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मन लावून अभ्यास करत त्यानं सीएची इंटरमिडिएट परीक्षाही दिली.
या दरम्यान तो मध्यप्रदेशच्या सिनिअर टीममध्ये खेळू लागला. त्यानं सीएचं शिक्षणही सोडलं, पण क्रिकेटसाठी नाही, तर एमबीए करण्यासाठी. पण त्याची क्रिकेटमधली प्रगती बघून त्याच्या घरच्यांनी त्याला प्रोत्साहन दिलंच, पण कॉलेज व्यवस्थापनानंही त्याला सूट दिली. अय्यरचं क्रिकेट हळूहळू भरात येऊ लागलं होतं, त्यातच २०१८ मध्ये त्याला एका अकाउंटिंग कंपनीनं जॉब ऑफर दिली.
अय्यरसमोर प्रश्न उभा ठाकला, क्रिकेट निवडायचं की जॉब? पण भावाचा ओढा क्रिकेटकडे जास्त ठरला आणि अय्यरनं क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं.
अय्यरनं भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मिडल ऑर्डरमध्ये येऊन फटकेबाजी करायची असेल, किंवा ओपनिंगला येऊन एक बाजू लावून धरायची असेल, अय्यरनं दोन्ही भूमिका कडकमध्ये बजावल्या. सोबतच संघाला गरज असली की अय्यर चांगली बॉलिंगही करायचा.
डोमेस्टिक क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीनं त्याला आयपीएलचं तिकीट मिळवून दिलं. २०२१ च्या पहिल्या टप्प्यातच त्याचा डेब्यू होईल, असं वाटत होतं. मात्र त्याला पहिला टप्पा बेंचवर बसूनच घालवावा लागला. दुसऱ्या टप्प्यात नाईट रायडर्स गटांगळ्या खात होते, मात्र त्यांनी अय्यरला ओपनर म्हणून संधी दिली. त्यानंही हा विश्वास सार्थ ठरवला आणि संघाला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावली.
त्याच्या स्फोटक बॅटिंगमुळं मोठमोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू इम्प्रेस झाले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्याची आयपीएलमधली कामगिरी इतकी वाढीव होती, की त्याला भारताच्या टी२० वर्ल्डकप कॅम्पेनसाठी नेट बॉलर म्हणून संधी मिळाली. पुढं न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० सिरीजसाठी त्यानं भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातही स्थान मिळवलं.
२०२१ च्या आयपीएल सिझनच्या आधी अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये सराव करत होता. भारताचा अनुभवी बॉलर हरभजन सिंग त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, ‘तू यावर्षीचा कोलकाता नाईट रायडर्सचा फाईंड असशील. तुला भारताकडून खेळण्याची संधीही मिळेल.’ भज्जीचा अंदाज अगदी खरा ठरला, २०२१ मध्ये वेंकटेश अय्यर सुपरहिट झालाच आणि त्याला भारताकडून खेळण्याची संधीही मिळाली.
आता कोलकात्यानं त्याच्यासाठी आठ करोड मोजलेत, कारण त्यांनाही पक्का अंदाज आहे, अय्यर कच्चा खिलाडी नाही, तर लंबी रेस का घोडा आहे.
हे ही वाच भिडू:
- वडिलांच्या एका निर्णयामुळं श्रेयस अय्यरचं करिअर वाचू शकलं
- कॅप्टन विरोधी टीमचा असो किंवा आपला, गंभीरचं डोकं सटकलं की सुट्टी नाही!
- दोन पर्याय होते. गुंडगिरी करायची की क्रिकेट ? तो क्रिकेटचा गुंडा बनला..