पंढरपुरातील तुळशीच्या माळा नगरच्या ते विठ्ठल-बालाजी साम्य; 10 गोष्टी जाणून घ्या

आज आषाढी एकादशी. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र, कर्नाटकातून विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने पायी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांना अखेर त्यांच्या सख्याचं दर्शन होत असतं. खूप मोठ्या प्रमाणात यंदा भाविकांनी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला गर्दी केली आहे.

पंढरपूर, आषाढी वारी आणि विठ्ठल हे समीकरण महाराष्ट्राच्या खूप जवळचं आहे. पांडुरंगाच्या भक्तांसाठी तर जमिनीवरील स्वर्ग आहे, असं बोललं जातं. म्हणूनच आषाढीच्या मुहूर्ताला या समीकरणाच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं ठरतंय…

१. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक 

इ.स. ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असा अनुमान लावला जातो की, याच काळात पंढरपुरातील  विठ्ठलाचं देऊळ निर्माण झालं. ‘स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होतं. हळूहळू त्याचा विस्तार झाला.  इ.स. ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव आणि त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली, असं सांगितलं जातं

पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली. मात्र मंदिराचा विस्तार १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाल्याचं दिसतं. 

२. विठ्ठलाच्या मंदिरात १९४७ आधी अस्पृश्यांना प्रवेश नव्हता

विठ्ठल हा समन्वयवादी भक्ती-परंपरेचा देव आहे. विठ्ठलाची आराधना परमेश्वर म्हणून नव्हे, तर ‘सखा पांडुरंग’ आणि ‘विठू माउली’ अशा रूपांमध्ये केली जाते. वारकरी पंथातील लोक विविध जातीय पार्श्वभूमींचे आहेत, त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि अगदी मुस्लीम धर्मातील लोकही आहेत. वारकरी एकमेकांना भेटले की एकमेकांच्या पाया पडतात आणि मग एकमेकांना आलिंगन देतात.

या परंपरेचा गाभा समन्वयवादी आणि समतावादी असल्याचं मानलं जात असलं, तरी १९४७ पूर्वी केवळ सवर्ण भक्तांना आणि कारागीर जातींमधील व्यक्तींनाच मंदिरात प्रवेशाची मुभा होती. अस्पृश्यांच्याही दिंड्या दरवर्षी वारीसोबत पंढरपुराला यायची पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.

विठोबाच्या या बडव्यांनी खुद्द संत चोखोबांना दारावरून आत येऊ दिलं नव्हतं. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं.

सर्वात आधी राज्यभर या विषयावरून रान उठवलं. राष्ट्र सेवा दलाची पथके “घ्यारे घ्यारे, हरिजन घरात घ्यारे” ही पदे गाऊन समाजप्रबोधनाचा प्रयत्न करत होती. ऊन-वारा-पावसाची तमा न करता एका ध्यासाने गुरुजी गावोगाव हिंडले. हरिजन मंदिर प्रवेशासाठी जनमत जागृती केली. अस्पृश्यता हा कायद्याने दूर होणार नाही तर ती पाळणाऱ्याच्या मनातून दूर झाली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता. गुरुजींची भाषणं लोकांच्या मनाचा ठाव घेत होती.

साने गुरुजींनी जानेवारी १९४७ ते मे १९४७ या कालावधीमध्ये हा सत्याग्रह केला. स्वतःचा आंतरिक आवाज ऐकून १ मे ला त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हे उपोषण १० दिवस सुरू राहिलं. लोकांचा दबाव, साने गुरुजींचा आत्मक्लेश यामुळे १० मे रोजीच्या मध्यरात्री पंढरपूर मंदिराच्या बहुसंख्य विश्वस्तांनी मंदिरप्रवेशाच्या बाजूने मत दिलं. 

परिणामी ११ मे १९४७ रोजी अस्पृश्यांनी विठ्ठलमंदिरात प्रवेश केला आणि साने गुरुजींनी उपोषण सोडलं. तेव्हापासून पंढरपूरचं मंदिर सर्व जातीजमातींसाठी खुलं आहे. 

३. विठ्ठल आणि तिरुपती बालाजीत साम्य आहे

भगवान विठ्ठल आणि वेंकटेश्वर स्वामी हे दोन्ही समधर्मी देव असल्याचं मानलं जातं. दोघेही भगवान विष्णुच्या पुराणातील  रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले देव आहेत आणि तरीही ते विष्णुरूप म्हटले जातात. विठ्ठलाला बाळकृष्ण नावाने ओळखलं जातं तर वेंकटेश्वर स्वामीला बालाजी म्हणतात.

भगवान विठ्ठलाची पत्नी राधेचं निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर भगवान वेंकटेशाची पत्नी भृगू ऋषींनी केलेला अपमान आपल्या पतीने सहन केल्यामुळे तिरुमलापासून पूर्वेस तीन मैलावर दूर जाऊन बसलेली आहे. म्हणून दोघांच्याही दर्शनावेळी पत्नी आणि भगवानांचा दर्शन घ्यावं लागतं.

४. पंढरपुरात मिळणाऱ्या बहुतांश तुळशीच्या माळा नगरमधून येतात

वारकरी समुदायात तुळशीला खूप महत्व आहे. कारण वारकऱ्यांचे आराध्य पांडुरंगाला तुळस खूप  प्रिय आहे. आपल्या आराध्याच्या जवळ राहण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्याला आवडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणं, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणून ते देखील तुळशीला पूजतात. अगदी पायी दिंडीतही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन मैलोमैल करतात. शिवाय प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात हमखास तुळशीची माळ असते.

अशा या नवीन माळा खरेदी करायच्या असल्या तरी पंढरपूराला प्राधान्य दिल्या जातं. या बहुतांश माळा नगरमधील कारागीर तयार करतात. गेल्या कित्येक पिढ्या नगरमधील कारागीर हे काम कुशलतेने करत आहेत. जवळपास २० ते २५ प्रकारच्या माळा ते बनवतात आणि आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पाठवतात. इकडे वारी सुरु झाली की तिकडे तुळशीच्या माळा तयार करायला सुरुवात होते.

आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात दररोज जवळपास २० हजारांपर्यंत माळा विकल्या जात असल्याचंही या कलाकारांनी सांगितलंय.

५. आज वारीचं जे स्वरूप आहे ते श्रीगुरू हैबतबाबा यांच्यामुळे आहे

हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते. मात्र ते ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त होते. त्याच ओढीने ते आळंदीला आले आणि अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले.

पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा, नैवेद्याचीव्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत सुरू आहे.

श्रीगुरू हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम,भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरू हैबतबाबा यांनी १८३१ पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते.

६. वारीचा शेवटचा टप्पा धावत पूर्ण केला जातो 

पायी वारी केली जात असली तरी या वारीचा शेवटचा टप्पा सगळे भाविक धावून पूर्ण करतात. याला ‘धावा’ असं संबोधलं जातं. असं करण्यामागची मान्यता अशी आहे की, संत तुकाराम पंढरपूरच्या वारीला पायी निघाले होते. ते जेव्हा वेळापूर इथे पोहोचले तेव्हा छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं त्यांना दर्शन झालं. 

जसं त्यांना दर्शन झालं तसं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शन ओढीने वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत गेले, असं सांगितलं जातं.

वारकरी संप्रदायाचे भाविक संतांना खूप मानतात म्हणून तुकाराम महाराजांच्या या क्षणाचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

७. नामदेव पायरीची आख्यायिका

संत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचं ठरवलं. तेव्हा आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी त्यांनी विठ्ठला पुढे जाऊन ‘आता आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली. नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. अगदी लहानपणी नैवेद्य खा म्हणत विठ्ठलाजवळ हट्ट करणारे नामदेव. जेव्हा त्यांना प्रथिनांची आज्ञा विठ्ठलाकडून झाली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर इथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. 

जातं त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली ती म्हणजे – विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी. ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले. तिथेच त्यांचं समाधी स्थान  तयार करण्यात आलं आणि त्या पायरीला ‘नामदेव पायरी’ म्ह्णून ओळखलं जाऊ लागलं.

आपल्या आराध्याच्या भक्तांच्या सेवेचं आणि त्यांच्या पायाच्या धुळीचं सौभाग्य आपल्याला लाभावं, असं वाटणारे संत वारकरी संप्रदायातच सापडतात.

८. वारकऱ्यांनी लढा देत बडवे प्रथा मोडली

बडवे हे विठोबाची परंपरेने सेवा करणारं एक घर होतं. बडवे हे त्यांचं आडनाव. कमीतकमी गेल्या एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या आधीपासून हे घराणं पंढरपूरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगाच्या पूजेचा मान पिढ्यानपिढ्या याच घराण्याकडे होता. जेव्हा जेव्हा पंढरपुरावर संकट आलं तेव्हा त्यांनी विठोबाच्या मूर्तीचं संरक्षण केल्याचे पुरावे सापडतात.

मात्र मंदिरचं व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्याने विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असं बोललं जातं. त्यांनी वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. जवळपास शंभर-सव्वाशे वर्ष बडवे विरुद्ध वारकरी समाज अशी खेच चालली. वाढत्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सोई सुविधा करताना कमी पडणं तसंच भाविकांची मंदिर आणि परिसरात लुट करणं, असे आक्षेप त्यांच्यावर घेतले जाऊ लागले. ज्यामुळे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. 

१९६७ साली सर्वप्रथम राज्यशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला. मात्र हा आपल्यावरील अन्याय आहे या भावनेने बडवेंनी या कायद्यालच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका १९७४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. 

पुढे जवळपास ४० वर्ष लढा देऊनही बडवे समाजाच्या विरोधात सर्व निकाल लागल्याने अखेर… १५ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आलं. 

९. रुख्मिणी देवीची पूजा महिला पुजाऱ्याने केली 

बडव्यांचे हक्क गोठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना पंढरपूराने बघितली. १५ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंडळ समितीने मंदिरातील बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि मग मंदिर समितीने सर्व जाती-जमाती आणि महिला पुजाऱ्यांची नियुक्ती केली. फक्त नियुक्ती केली नाही तर, या नवीन पुजाऱ्यांकडून मंदिरातील पूजेस सुरुवात केली होती. 

पहिल्या १० पुजाऱ्यांमध्ये २ महिला पुजाऱ्यांची निवड करण्यात आली होती.

निर्णयानुसार पंढरपूर मंदिर समितीने विठ्ठलाची पूजा करण्यासाठी बहुजन समाजातील पुजारी आणि रुख्मिणीदेवीच्या पूजेसाठी महिला पुजारी नियुक्त करण्याची परवानगी दिली होती. इतिहासात प्रथमच पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा बहुजन समाजातील पुजाऱ्याने तर रुक्मिणीदेवीची पूजा महिला पुजाऱ्याने केली होती.

१०. वारीचं स्वरूप बदलणारा ‘तुकाराम’ पॅटर्न

वारीच्या वेळी लाखो भाविकांची सोय-सुविधा करणं म्हणजे मोठी कसरत असते. वणवण करत आषाढीला येणं, तिथे गर्दीने खेचाखेच होणं, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींचा सामना भाविकांना करावा लागायचा. आज आषाढीला भाविक जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा त्यांची बऱ्याच सोयी-सुविधा दिसून येतात. याचं बरंचसं श्रेय जातं  ‘तुकाराम’ पॅटर्नला. 

२०१५ मध्ये भाजप युतीच्या सरकारने पंढरपूर मंदिर समिती बरखास्त केली होती. तेव्हा मंदिराचे अधिकार तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आले होते. तेव्हा त्यांनी अनेक धाडसी बदल केले होते. 

आषाढीच्या वेळी रात्र रात्र भाविक विठोबाच्या नामसंकीर्तनात तल्लीन होतात. मात्र आधी मंदिर जास्त काळ उघडं ठेवलं जात नव्हतं. तेव्हा मंदिर २२ तास दर्शनासाठी उघडं राहण्याचा नियम त्यांनी केला. दर्शन रांगेतील भाविकांना चहा-पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नदीपात्रात होणारी राहुट्यांची गर्दी आणि त्यातून निर्माण हणाऱ्या गैरसोयी यासाठी वारकऱ्यांच्या ६५ एकरचा विशेष तळ विकसित केला. 

तिथे वीज, पाणी, रस्ते आणि शौचालये याचा सोयी उपलब्ध केल्या. शिवाय विष्णुपदांजवळ बंधारा बांधण्याची वर्षानुवर्षांची प्रलंबित मागणी एवढ्या तीन महिन्यात त्यांनी पूर्ण केली होती. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.