उत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर…!!!

 

इंग्रजी भाषेला आपल्या दैनंदिन व्यवहारात फार महत्वाचं स्थान आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात बोलताना आपण आपल्याही नकळत अनेक इंग्रजी शब्दांचा वापर सर्रासपणे करत असतो. पण असं असलं तरी इंग्रजीबद्दलची आपल्या मनातली भीती मात्र कमी होत नाही. ‘इंग्रजी’ म्हंटलं की नको रे बाबा, असा आपला एकंदरीत सूर असतो. पण म्हणून व्यवहारातलं इंग्रजीचं महत्व काही आपल्याला नाकारता येत नाही.

दैनंदिन जीवनातील इंग्रजीचं हेच महत्व लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील एका गावाने मात्र  घेऊन खूप पूर्वीपासूनच इंग्रजी आत्मसात करण्याचा चंग बांधलाय. गमतीची गोष्ट अशी की या गावात ‘इंग्लिश देवी’चं मंदिर देखील बांधण्यात आलंय आणि लोक मंदिरात जाऊन देवीची पूजा-अर्चा देखील करतात.

तर हा किस्सा आहे उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील ‘बनका’ या गावचा.

या गावातील दलित समुदायाने ऑक्टोबर २०१० वर्षी गावात ‘इंग्लिश देवी’चं मंदिर बांधलय. या देवीचा चेहरा हा ब्रिटीश भावमुद्रेसारखा आहे आणि देवीच्या हातात एक पेन आणि पुस्तिका आहे. पितळापासून बनविण्यात आलेल्या या मूर्तीचं वजन २० किलो इतकं आहे. देवीच्या डोक्यावर इंग्रजी पद्धतीची हॅट आहे. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आणि या गावातील इंग्लिश देवीच्या मंदिरातील पुतळा यात बरचसं साम्य आहे.

english devi statue

शिक्षण हाच दलितांसाठी प्रगतीचा आणि त्यांना समृद्धीकडे नेणारा मार्ग आहे, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यातही इंग्रजी भाषा ही आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लोकांसाठी जीवनदायिनी आहे, म्हणूनच दलित समाजाने इंग्रजीची कास धरावी आणि आपल्या उन्नतीच्या वाटेवर धावायला लागावं, यासाठी प्रेरणा म्हणून हे मंदिर बांधण्यात आलं असल्याचं गावकरी सांगतात.

इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन देणं याशिवाय समाजातील महिलांना देखील शिक्षण घेण्यासाठी आणि आधुनिकतेची वाट धरण्यासाठी प्रेरित करणे, हा देखील मंदिर उभारण्याचा एक हेतू होता, अशीही माहिती गावकऱ्यांकडून मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला होता. त्यातही बाबासाहेबांनी इंग्रजीचं महत्व केव्हाच ओळखलं होतं. त्यामुळे ते इंग्रजी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी  आग्रही होते. बाबासाहेबांच्या याच शिकवणीमुळे गावेने सामूहिकरीत्या इंग्रजी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी हा निर्णय घेतला, असंही गावकरी सांगतात.

दलित समाजाने इंग्रजी शिक्षणाची वाट धरण्यासाठी जरी हे मंदिर बांधण्यात आलं असलं तरी काही लोक मात्र या मंदिरात येऊन ‘इंग्लिश देवी’ची पूजा-अर्चा करतात आणि नवस देखील बोलतात. आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी शिक्षण मिळण्यासाठी त्यांना चांगल्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ‘इंग्लिश देवी’ला साकडं घातलं जातं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.