कुलकर्णींच्या ‘मीरा’ला तोड नव्हती…!!!

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने. शंकरराव कुलकर्णी त्यांचं नांव. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं.

shankarraos 1971 final
मीरा कार सोबत शंकरराव कुलकर्णी

इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. कारची किंमत होती १२००० रुपये. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिन देखील भारतीय बनावतटीचं होतं. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता.

किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या १५ जणांच्या टीमसोबत १९४५ मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केलं. १९४९ मध्ये शंकररावांनी या कारचं पहिलं मॉडेल तयार केलं. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसं बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून ५ मॉडेल त्यांनी बनवले. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक होता एम.एच.के.१९०६. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती.

brocher

१९७५ साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. परंतु लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे  पुढे या प्रकल्पाचं पुढं काहीच होऊ शकलं नाही. मीरा कारचं मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती, तसंच अनेक शासकीय परवानग्या देखील गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय त्याच काळात सुजुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरु करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं.

 

 

4 Comments
  1. Kaushik Vidyadhar Shrotri says

    Who has written this….He was my great grandfather

  2. Sandip says

    Adjustable ground clearance height, rubber shock absorber is alo made in car…..plz mention it..!!!

  3. Mahesh salunke says

    Very nice

  4. Sharad pise peth vadgaon says

    मीरा मिनी कार मी ईचलकरंजी येथे पाहीली आहे कमी बजेट मध्ये त्या कळात मस्त कारहोती आजही कार बनवलेस लोकप्रिय होईल

Leave A Reply

Your email address will not be published.