कारगिल युद्धाची प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर विक्रम बत्रांचं शौर्य आणि बलिदान उभं करते…

कारगिल युद्ध होऊन २३ वर्ष झाली आहेत. तरीही या युद्धाची गोष्ट निघाली की कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव सगळ्यात समोर असतं. आजही कारगिल विजय दिवस त्यांच्या आठवणी शिवाय संपन्न होत नाही. बत्रा यांच्या जीवनावर आधारित २ पिक्चर सुद्धा रिलीज झाले आहेत. 

कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म पालमपूर इथे ९ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. बत्रा यांचं प्राथमिक शिक्षण आर्मी स्कुलमध्ये झालं. यावेळी ते लष्करी जवानांना पाहायचे. त्यांचं राहणं, वागणं, कामाची पद्धत पाहून त्यांना लष्कराबद्दल आवड निर्माण झाली होती. 

बत्रा अभ्यासात जास्त हुशार नव्हते. त्यांना टेबल टेनिसची आवड होती. त्याच बरोबर आवडीचं काम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणं. १२ नंतर बत्रा चंदीगडला गेले. फर्स्ट ईअरला असताना बत्रा यांनी एनसीसीमध्ये भाग घेतला होता. १९९४ साली प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये बत्रा यांनी सहभाग घेतला होता.

१९९५ मध्ये बत्रा कॉलेजमध्ये असताना एका शिपिंग कंपनीमध्ये मर्चंट नेव्हीसाठी निवड झाली होती. नंतर पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंग्रजीमध्ये एमए करण्यासाठी पंजाब विद्यापीठ, चंदीगडमध्ये दाखल झाले.

१९९६ मध्ये लष्करात भरती होण्यासाठी त्यांनी सीडीएसची परीक्षा दिली होती. त्यावेळी अलाहाबाद इथल्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे त्यांची निवड झाली. या परीक्षेत निवडल्या गेलेल्या पहिल्या ३५ उमेदवारांपैकी विक्रम एक होते. इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी कॉलेज सोडलं. डिसेंबर १९९७ मध्ये त्यांचं प्रशिक्षण संपलं आणि ६ डिसेंबर १९९७ रोजी जम्मूतल्या सोपोर नावाच्या ठिकाणी लष्कराच्या १३ जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

लवकरच मार्च १९९८ मध्ये यंग ऑफिसर्स हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना इन्फन्ट्री स्कूलमध्ये पाच महिन्यांसाठी मध्य प्रदेशात पाठवण्यात आलं. त्यांचा कोर्स पूर्ण होताच त्यांना अल्फा ग्रेडिंग देण्यात आलं आणि जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या बटालियनमध्ये पुन्हा सामील करण्यात आलं. १९९९ मध्ये कमांडो प्रशिक्षणासह त्यांनी इतरही प्रशिक्षण घेतलं.

काहीच महिन्यात कारगिल युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा त्यांची निवड युद्धासाठी झाली. मात्र या दरम्यान ते होळीच्या सणाच्या वेळी सुट्टीसाठी घरी आले होते. तेव्हा त्यांची होणारी बायको डिंपल चीमा यांना भेटले तेव्हा युद्धाचीही चर्चा झाली होती. ज्यावर कॅप्टन बत्रा म्हणाले होते…

“मी एकतर तिरंगा घेऊन येईन किंवा तिरंग्यात लपेटून येईन, पण मी नक्की येईन.”

अखेर युद्ध घडी आली… १ जून १९९९ रोजी त्यांचं सैन्याला कारगिल युद्धात पाठवण्यात आलं. हॅम्प आणि राकी नॅब स्थान जिंकल्यानंतर विक्रम यांना कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर कॅप्टन बत्रा यांच्या तुकडीला ५१४० शिखर मुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी कॅप्टन बत्रा यांनी शक्कल लढवली आणि शत्रूला कोणतीही खबर न लागू देता त्यांच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. 

त्यानंतर कॅप्टन बत्रा यांनी आपल्या साथीदारांसह थेट शत्रूच्या तळांवर हल्ला चढवला. आघाडीवर असलेल्या पथकाचं नेतृत्व करताना त्यांनी निर्भीडपणे शत्रूवर चढाई करत चार शत्रूंचा बळी घेतला.

हे शिखर म्हणजे सगळ्यात कठीण भाग. तरीही विक्रम बत्रा यांनी आपल्या साथीदारांसह २० जून १९९९ रोजी पहाटे ३.३० वाजता हे शिखर काबीज केलं. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी जेव्हा या शिखरावरून रेडिओच्या माध्यमातून आपल्या विजयाची माहिती देताना ‘ये दिल मांगे मोर’ असे शब्द काढले तेव्हा फक्त भारतीय सैन्यच नाही तर संपूर्ण भारताची छाती आनंदाने फुलली होती.

हा तोच क्षण होता जेव्हा विक्रम यांना त्यांचं कोड नाव शेरशाहसह ‘कारगिलचा शेर’ ही पदवीही देण्यात आली. 

दुसऱ्या दिवशी विक्रम बत्रा आणि त्यांच्या टीमचा ५१४० या शिखरावर भारतीय झेंडा हाती घेतलेला फोटो मीडियामध्ये झळकला होता.

यानंतर भारतीय लष्कराने ७ जुलै १९९९ रोजी पॉइंट ४८७५ हे शिखर काबीज करण्यासाठी मोहीम हाती घेतली. त्यावेळी कॅप्टन विक्रम आणि त्यांच्या तुकडीला ही जबाबदारी देण्यात आली होती. हे शिखर म्हणजे सगळ्यात अवघड ठिकाण. याच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होता. आणि त्याच एकमेव मार्गावर शत्रूंनी नाकेबंदी केली होती. 

तेव्हा ही मोहीम फत्ते करण्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एका अरुंद पठाराजवळून शत्रूच्या तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा समोरासमोरचं युद्ध सुरु झालं तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांनी पॉईंट ब्लॅक रेंजमध्ये शत्रूच्या पाच सैनिकांना ठार मारलं. मात्र या दरम्यान ते शत्रूच्या स्नायपरच्या निशाण्यावर आले आणि गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीतही त्यांनी रांगत शत्रूंवर ग्रेनेड फेकले आणि त्यांना ठार केलं. 

कॅप्टन बत्रा या युद्धात सगळ्यात पुढे होते आणि त्यांनी जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती. हे करताना त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही आणि शत्रूंनी केलेल्या जोरदार गोळीबाराला सामोरं जात ऑपरेशन पूर्ण केलंच!

ऑपरेशन पूर्ण झालं आपण कारगिल युद्ध जिंकलो मात्र यात कॅप्टन बत्रा यांना गमावून बसलो… कॅप्टन बत्रा यांनी देशासाठी हे केलं होतं. आपलं आयुष्य त्यांनी भारतीय सैन्याला दिलं होतं आणि त्याचप्रेमाखातर ते शाहिद झाले.

त्यांच्या या बलिदानाची आजही भारत आठवण काढतो आणि गर्वाने त्यांचं नाव घेतो… ‘शेरशहा!’

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.