अंबानी की अदानी दोघांच्यात कोण श्रीमंत आहे ?

भारताच्या व्यावसायिकांचा नाद करायचा नाही अशी म्हणण्याची वेळ आता आलीये, असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. झालंच तसंय… २०१३ पासून, भारतीय अब्जाधीशांनी जेवढी संपत्ती कमावलीये ती लंडनच्या GDP पेक्षा जास्त आणि UAE च्या GDP च्या जवळपास दुप्पट असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलंय. Hurun India च्या रिपोर्टनुसार गेल्या दशकात, भारतीय अब्जाधीशांनी ७०० बिलियन डॉलर संपत्तीची भर घातलीये. तर या वाढीचा मोठा हिस्सा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी उचलला आहे.

अंबानी आणि अदानींबद्दल सांगायचं तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही. मात्र या दोघांमध्ये नेहमीच चढ उतारा होत असतात. आज एक तर दोन दिवसांत अजून काही वेगळं ऐकू येतं. नुकतंच बघायचं झालं तर ब्लूमबर्ग बिलिनीयर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी यांनी टॉप १० लोकांमध्ये समावेश केला आहे. काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी अंबानी यांचं नाव होतं.

गौतम अदानी १०५ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीमुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. तर मुकेश अंबानी १०० बिलियन डॉलर्ससहित ११ व्या जागेवर आहे. एकंदरीत बघितलं तर २०२१-२०२२ हे वर्ष या दोन्ही बिजनेसमॅनसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानींच्या संपत्तीत या वर्षात ६९.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अंबानी यांच्या संपत्तीत २०.६७ टक्क्यांनी वाढ झालीये.

तेव्हा या दोघांनी कशी वाढ केलीये, त्यांच्या संपत्तीचा चढत्या आलेखात कशाचा वाटा आहे, ते बाघूया… 

मुकेश अंबानी

रिलायन्सचा अमेझॉनसोबत गेल्या काही वर्षांपासून फ्युचर्स ग्रुपला घेऊन वाद सुरु होता. त्यात अखेर रिलायन्सने बाजी मारली आहे. त्यांनी फ्युचर रिटेल स्टोअर्सवर नियंत्रण मिळवलं आहे. न्यूयॉर्कमध्ये मँडरिन या हॉटेलमधील तब्बल ७३.३७ टक्क्यांची हिस्सेदारी ७३० कोटींना खरेदी केलीये. तर जिओ हा रिलायन्सचा मास्टरप्लॅन देखील प्रोसेसमध्ये कामी आलाय.

रिलायन्सच्या जिओने गुगलसोबत पहिला ४- जी स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट हा मार्केटमध्ये आणला. यात एक अशी डील देखील राहिली की जी गमावून सुद्धा रिलायन्स फायद्यात राहिलं. रिलायन्सने सौदी अरामको यांच्यासोबत केलेला १५ बिलियन डॉलरचा करार रद्द केला होता.

तर रिलायन्स इंडस्ट्रीज,  रिलायन्स इन्फ्रा, जयकॉर्प, बालाजी, प्राईम फोकस, नेटवर्क १८, टीव्ही १८, डेन नेटवर्क, हॅथवे केबल अशा कंपन्यांचा या वाढत्या आलेखात सहभाग राहिला. 

गौतम अदानी

पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात आणि तेलंगणातील २३५ किलोमीटरच्या रस्तेबांधणी प्रकल्पाचं काम मिळवलं. २१ ऑक्टोबरला जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपूरम इथल्या विमानतळांचा ताबा मिळवला. ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी सुरु केली. एन्व्हार्नमेंट फ्रेंडली स्टील मिलसाठी पॉस्कोसोबत करार केला. इतकंच नाही तर ५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली.

या सगळ्या अचिव्हमेंट्समध्ये त्यांच्या ज्या कंपन्यांचा वाटा राहिला त्या कंपन्याच्या शेअर्समध्ये काल ४ एप्रिलला मोठी वाढ दिसून आली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. कंपनीचे शेअर्स नऊ टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स ५.४३ टक्के, अदानी पोर्टमध्ये ४.२० टक्के, अदानी पॉवरमध्ये ४.११ टक्के, अदानी विल्मरमध्ये १.७० टक्के, अदानी एंटरप्रायझेस १.०४ टक्के आणि अदानी ट्रान्मिशन १.०२ टक्क्यांनी शेअर्स वाढले. 

अशाप्रकारे अदानी या वर्षातील जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या उद्योगपतींपैकी एक आहे. २ वर्षात त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. तर २०२१ मध्ये, अदानी जगातील सर्वात मोठे ‘प्रॉफिट गेनर’ म्हणून उदयास आले होते आणि या वर्षातही हा ट्रेंड कायम राहील, असं दिसतंय.

ग्रीन हायड्रोजन हे पाणी आणि ग्रीन इलेक्ट्रिसिटीपासून तयार केलं जाणारं आणि सर्वात स्वच्छ इंधनाचा प्रकार मानला जातो. तर स्टील, सिमेंट आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांसारख्या जड उद्योगांना डीकार्बोनाइज करण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचंही बोललं जातं. अशात भारत हा ग्रीनहाऊस गॅसेसचा उत्सर्जन करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. 

म्हणून सध्या ग्रीन हायड्रोजन निर्मितीत उतरण्यासाठी योजना आखत असताना मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोन्ही धनाढ्यांनी देखील समर्थन दिलंय. भारताने २०३० पर्यंत ५ मिलियन टन ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 

२०२२ च्या M3M हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार, सर्वात जास्त नवीन श्रीमंत व्यावसायिकांच्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. २०२१ मध्ये भारतात ५१ नव्या अब्जाधीशांची भर पडलीये असून एकूण संख्या २५० पेक्षा जास्त झालीये. भारताच्या आधी ११३३ नव्या व्यवसायिकांसहित नंबर लागतो चीनचा आणि मग येतं यूएस 716 आकड्यांसहित. 

याच रिपोर्टनुसार अदानी यांनी २०२१ मध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये ४९ अब्ज डॉलरची भर पडलीये. म्हणजे वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात सुमारे ६००० कोटी रुपयांची ही भर आहे. तर २०२१ मध्ये त्यांच्या संपत्तीमधील एकत्रित वाढ ही जगातील तीन टॉपचे अब्जाधीश एलोन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यापेक्षा जास्त आहे. 

अदानी आणि अंबानी यांच्यातील ही रेस स्पष्टपणे दिसून आली ती २०२१ मध्ये, जेव्हा अंबानींनी त्यांच्या तेल ते टेलिकॉम ग्रुपची ग्रीन एनर्जीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. जीवाश्म इंधनाची मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सने ७५००० कोटी रिन्यूएबल एनर्जीमध्ये गुंतवण्याची योजना जाहीर केली.

आतापर्यंतच्या या आकडेवारीतून जर बघितलं तर सध्यातरी श्रीमंतांच्या या शर्यतीत अदानींनी अंबानी यांना ओव्हरटेक केलं आहे. तेही गेल्या दोन आठवड्यांत. 

मात्र यांच्या रेसचं काही सांगता येत नाही. उद्या लगेच काय परिणाम येतील, ते तर येणार काळच सांगेल… 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.