या मुस्तफा, Bella Ciao वाजवणाऱ्या मुंबई पोलीस बँडला १९३६ पासूनचा गौरवशाली इतिहास आहे

दरवर्षी सोशल मीडियावर असे काही मिम्स, व्हिडीओ येतात जे संपूर्ण वर्षाचा ट्रेंड सेट करून जातात. असाच एक व्हिडीओ गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ ला सोशल मीडियावर आला ज्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात कल्ला केला. प्रत्येकापर्यंत नक्की पोहोचावा अशी अपील करत खूप शेअर केला गेला. भरभरून प्रेम त्या व्हिडिओला तर मिळालच मात्र एका अशा अपरिचित गोष्टीची ओळख महाराष्ट्राला झाली ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा. 

‘बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक’ सोप्या शब्दात… ‘मुंबई पोलीस बँड’

मुंबई पोलिसांनी त्यांची लोकप्रिय जेम्स बाँड सिग्नीचर थीम तेव्हा सादर केली होती. तेव्हा नेटिझन्स असे आश्चर्यचकित झाले होते की काय सांगावं. शब्दात तर सांगता येणार नाही मात्र त्यांचं आश्चर्य आणि अभिमान त्यांच्या कृतीतून झळकला. काही वेळातच व्हिडीओ व्हायरल झाला, विशेषत: इंस्टाग्रामवर तर धुमच माजवली आणि देशभर प्रसिद्ध मिळवली.

पोलिसांचा हा उपक्रम खूपच भारी आहे, पोलिसांमधील हे सुप्त गुण, त्यांची कला खरंच वाखाणण्याजोगी आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र हा उपक्रम म्हणजेच हा बँड काही आत्ताचा नाहीये. त्याला खूप जुना इतिहास आहे…

वर्ष होतं १९३५ चं. भारतावर तर ब्रिटिशांचं राज्य होतंच मात्र इतर अनेक देशांमध्येही ब्रिटिशांनी सत्ता पसरवलेली होती. त्यामुळे जगातील संपुर्ण ब्रिटिश साम्राज्यामध्ये हे वर्ष ′रजत जयंती वर्ष′ म्हणुन साजरे करण्यात आले. भारतामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. मुंबईमध्ये सुद्धा नायगावात एक कार्यक्रम होता. 

जोरात तयारी करण्यात आली होती. खूप सारे प्रेक्षक, मोठे ब्रिटिश अधिकारी यांच्या उपस्थितीत जल्लोषाने नायगांव पोलीस कवायत मैदानावर ३ डिसेंबर १९३५ रोजी एका शानदार संचालनाचे (परेड) आयोजन करण्यात आलं होतं. नायगाव पोलीस मुख्यालय त्याच्या अभियांत्रिकी दृष्टीने केलेल्या रचनेसाठी प्रसिद्ध होतं. शिवाय त्याचं मैदानही प्रशस्त आणि आदर्श समजले जात होतं. त्यात भर घातली ती मुंबई पोलिसांच्या आकर्षक परेडनं.

मुंबई पोलीसांच्या त्या उत्कृष्ठ संचालनाने सर्वांचीच मने जिंकली होती. मात्र एका ठिकाणी पाणी मुरलं होतं, पोकळी जाणवली होती. 

उपस्थितांना एक बाब खटकत होती आणि काहीतरी हरवले आहे असे वाटत होतं. हरवलं होतं – संगीत!

सर्व बाबी उत्कृष्ठ होत्या. मुंबई पोलीसांमध्ये अनेक कलाकार होते, अनेक वादक होते मात्र तरी त्यांचा स्वतःचा बँड नव्हता. म्हणून जोपर्यंत या पोलीस दलाकडे बँड पथक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परेड परिपुर्ण होणार नाही, असा विचार तिथल्या उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांकडे चर्चेला आला. बस्स, हीच गोष्ट लक्षात आली आणि बँडची कल्पना जन्माला आली…

मात्र यात एक अडचण होती. राजेशाही सरकार पोलिस बँडसाठी कोणतेही पैसे देऊन भाग घेणार नव्हते. त्यांचं ‘काटकसरी आर्थिक धोरण’ होतं. ज्यामुळे पोलीस बँडवर एव्हढा खर्च करणे, सध्यातरी शक्य नव्हते. अशाप्रसंगी मुंबईचे उत्स्फूर्त प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या. पुढचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होणार होता. तेव्हा त्यावेळी पोलिसांना बँड साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला गेला. 

वाद्ये खरेदी करण्यासाठी निधी गोळा करण्यात येऊ लागला. प्रतिष्ठित आणि व्यावसायिक दानशुरांप्रमाणेच सर्व सामान्य नागरिकांनी देखील शक्य होईल तितके पैसे दिले. त्यातून ब्रास बँडचे वाद्य आणि साहित्य खरेदी करण्यात आले. 

अशाप्रकारे १९३६ ला मुंबई शहर पोलीस दलाला त्यांचं स्वतःचं पहिलं वाहिलं ब्रास बँड पथक मिळालं.

१७ एप्रिल १९३६ रोजी नवे व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांच्या स्वागत कार्यक्रमात पोलीस बँडने पदार्पण केलं. गेटवे ऑफ इंडिया इथे कार्यक्रम होता. तेव्हा शानदार संचालनामध्ये लष्करी बँडसोबत मुंबई पोलीसांच्या बँडने परफॉर्म केलं. 

तेव्हा याचे बँड प्रमुख होते बॅण्डमास्टर सी.आर.गार्डनर. त्यांनी  मिळालेल्या संधीचे अगदी सोने केलं. सगळ्याच उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केलं, त्यांची मन जिंकली इतकं भन्नाट सादरीकरण बँडने केलं होतं.

बँडच्या कामगिरीने गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न प्रभावित झाले होते. लॉर्ड ब्रेबॉर्न हे हरहुन्नरी आणि खिलाडू वृत्तीचे गव्हर्नर होते. तेव्हा त्यांनी मान्यता दिली आणि ठरल्याप्रमाणे १८ डिसेंबर १९३६ रोजी नायगाव पोलिस कवायत मैदानावर जो कार्यक्रम होणार होता त्या विशेष वार्षिक पोलीस संचालनामध्ये मुंबई पोलीस बँडने प्रथमच स्वतंत्रपणे वाद्य वाजवलं. 

आपले वाद्य कौशल्य अक्ख्या मुंबईकर जनतेसमोर सादर करत त्यांनी शाबासकीची थाप पाठीवर मारून घेतली.

ब्रिटिशांना दाखवून दिलं की, ते कोणत्या गोष्टीला नकार देत होते. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली तेव्हा त्याच समारंभात विशेष कार्यक्रम करत  गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या हस्ते बँडसाठी देणगी देणाऱ्या दानशूरांचा खास सत्कार करण्यात आला. शिवाय हा बँड अस्तित्वात येण्यामागे तत्कालिन पोलीस कमिशनर बॅरिस्टर डब्ल्यू.आर.जी.स्मिथ याचे विशेष प्रयत्न होते. म्हणून त्यांचेही सर्वानी आभार मानले. 

तेव्हापासून बृहन्मुंबई पोलीस दलाला स्वतःचा बँड मिळाला म्हणून १८ डिसेंबर हा मुंबई पोलीस बँड डे म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटीश निघून गेल्यानंतर, देखील पोलिस बँडचा वारसा चालू राहिला आणि १९५९ च्या बॉम्बे पोलिस मॅन्युअलमध्ये त्यांची उपस्थिती संस्थात्मक झाली.

सुरुवातीला, बँडचे दोन वेगळे भाग होते. एक पाईप बँड ज्यामध्ये पाईपर आणि ड्रमर असतात आणि एक ब्रास बँड ज्यामध्ये संपूर्णपणे पितळी वाद्यं असतात. मात्र १९८० च्या दशकात पाईप बँडची मागणी घटली तेव्हा १९८१ मध्ये तो बंद करण्यात आला. 

मुंबई पोलिस बँडमध्ये आता जवळपास १०२ वादक आणि दोन सहाय्यक बँड मास्टर्स आहेत, ज्यांचं नेतृत्व पोलिस निरीक्षक आणि बँडमास्टर संजय कल्याणी करतात. ते भारतीय नौदलातून १५ वर्षांच्या नेव्ही बँडमधील कारकीर्दीनंतर निवृत्त झाले आहेत. बँडमास्टर हे सहसा माजी संरक्षण सैनिक असतात ज्यांना सशस्त्र दलात त्यांच्या कार्यकाळानंतर भरती केले जाते. त्यांना अशा बँडचं चांगलं नॉलेज असतं.

सुरुवातीला शहरातील प्रमुख उद्यानांसह सार्वजनिक ठिकाणी हे बँड साप्ताहिक वाजवलं जायचं. नंतर बॉम्बे पोलिस मॅन्युअलने खाजगी कार्यांसाठी या बँड्सना भाड्याने घेण्याची परवानगी दिली.

त्यानुसार दक्षिण मुंबईतील न्यू एम्पायर, मिनर्वा आणि न्यू एक्सेलसियर सारख्या चित्रपटगृहांच्या बाहेर चित्रपटांच्या प्रीमियर शोमध्ये हा बँड वाजवला जाऊ लागला. १९८० च्या दशकात ‘हवा मे उडता जाए’ त्यांच्या गाण्याला भरपूर लोकप्रियता मिळाली होती, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

आता बँड प्रजासत्ताक दिनाची परेड, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम वाजवणं, पोलीस स्मृतीदिन, पोलीस स्थापना दिन, महाराष्ट्र दिन, आणि वार्षिक क्रीडा कार्यक्रम यासारख्या राज्य सरकारच्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये वाजवला जातो.

आठवडाभर चालणार्‍या वार्षिक पोलिस रेझिंग डे सोहळ्यात पोलिस बँड गेटवे ऑफ इंडिया, बॅंडस्टँड, हँगिंग गार्डन्स अशा सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण करतात. संगीतकारांना वाद्यांद्वारे पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे – हॉर्न, ट्रम्पेट, सनई, सॅक्सोफोन आणि तालवाद्य. ते दररोज चार तास सराव करतात आणि दर शुक्रवारी नायगावच्या मैदानावर वेगवेगळ्या पोलिस तुकड्यांसह दर परेड करतात.

बँडमध्ये नोकरीसाठी अर्ज करणार्‍या हजारो लोकांपैकी काही मोजकेच लोक निवडले जातात आणि रिक्त पदांची संख्या कमी असल्यामुळे भरती प्रक्रिया क्वचितच होते.

बँडवाल्यांच्या मुलांना त्यांच्या संगीताने प्रेरणा मिळते म्हणून अनेकांच्या मुलांनी या विभागात संगीत वाजवण्याचा कौटुंबिक वारसा पुढे चालू ठेवल्याची उदाहरणे आहेत. जेम्स बाँड थीम सॉन्ग अशाच एका बँडमॅनने म्हणजे हेड कॉन्स्टेबलने केली आहे. त्यांचं नाव आहे – जमीर शेख.

जेम्स बाँड थीम सॉन्गपासून हा बँड सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर त्यांचे राजेश खन्ना यांचं ‘मेरे सपनों की रानी’ हे गाणं खूप व्हायरल झालं. मग काय, तेव्हापासून ते आतापर्यंत वेगवेगळे गाणे तेही वेगवेगळ्या शैलीचे येतंच आहेत. ट्रेंडवर असणारे सगळे गाणे आपल्या खास शैलीने वाजवत हे पथक देशभर धूम करतंय. जसं की, मनी हायेस्ट सिरीजचं Bella Ciao, पुष्पाचं श्रीवल्ली आणि आता अफगाणी सॉन्ग ‘या मुस्तफा’.

महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आणि गर्व वाटण्याचं अजून एक कारण दिल्याबद्दल या पोलीस बँडला बोल भिडूचा सलाम..!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.