ज्या मास्कला आज आपण सोडतोय त्याने गेल्या २ वर्षांत कोटींची कमाई देशाला करून दिलीये

३१ मार्च २०२२. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांच्या समोर आले आणि नाकावरील मास्क खाली सरकवत त्यांनी ‘महाराष्ट्र मास्कमुक्त होतोय’ अशी घोषणा केली. फक्त मास्कच नाही तर सगळे कोरोना निर्बंध हटवल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. या घोषणेनंतर आमच्याच ऑफिसमध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रीया उमटल्या…

पहिली प्रतिक्रिया…

अरे वाह! बरं झालं गेली एकदाची ती मास्कची कटकट. काय राव, कधी तरी चुकून विसरलो की लागलेच मामा मागे (पोलीस). आता मस्त ऐटीत बाहेर फिरायचं… अधिसारखं.

आणि दुसरी प्रतिक्रिया…

हे काय! असं कसं अचानक बंद केलं. अजून तर काही केसेस निघत आहेतच कोरोनाच्या. असं अचानक बंद केलं तर त्यात खूप भर पडणार. असो…मला तर बाबा सवय झालीये आता त्याची. सुरक्षित वाटतं. तेव्हा मी तर स्वेच्छेने मास्क वापरणार.

दोन्ही प्रतिक्रिया एकदम विरुद्ध होत्या, पण अनपेक्षित अशा नव्हत्या. तुम्ही पण यातीलच एका प्रतिक्रियेचा भाग असणार जेव्हा तुम्ही हा निर्णय ऐकला असेल.

मात्र यात अतरंगी आमचा एक भिडू. त्याच्या डोक्यात या बातमीने ‘स्टोरी’ चमकली. 

ज्या मास्कला आज आपण अलविदा म्हणायची तयारी करतोय त्याची एंट्री आपल्या आयुष्यात अचानकच झाली. कधी ना कधी जाणार माहित होतंच पण जाता जाता या मास्कने अख्या जगाचं आर्थिक गणित बदलून टाकलं. दूर दूर चर्चेत नसणारी मास्क इंडस्ट्री याने रेड कार्पेटवर आणली. मग काय? रॅम्प वॉक करत या इंडस्ट्रीने देशाच्या जिडीपीत चांगलंच योगदान दिली.

मग आम्ही विचारलं… नेमकं किती? अन् भिडू बोलला ‘तेच तर शोधायचंय आणि नेहमी काहीतरी हटके हवं असणाऱ्या आपल्या वाचकांना ते द्यायचंय’.

बस्स. लागलो कामाला आणि आणलीये सगळी माहिती तुमच्यासाठी.

मास्कची वाटचाल

मास्कचा वापर तसा जुनाच. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स किंवा जोखमीची कामं करणारे जसे की केमिकल इंडस्ट्री, गॅस इंडस्ट्री आणि नाले साफ करणारे कामगार असे अनेक लोक त्याचा वापर करायचे. मात्र सामान्य नोकरी करणारा, शिकणारा वर्ग याला कधी मास्कची गरज भासली नाही. म्हणून त्याकडे कधी कोणाचं लक्ष देखील गेलं नाही. तर आजची परिस्थिती अशी झालीये की ड्रेसवर मॅच मास्क घालणं आणि मास्क कलेक्शनची आवड निर्माण करण्यापर्यंत या मास्कला यश आलंय.

यासाठी मोलाचा वाटा राहिला तो कोरोनाचा. कोरोना आला आणि मास्कची सक्ती झाली. कधीही चेहऱ्याला न झाकणाऱ्या आणि स्त्रिया स्कार्फने त्यांचा चेहरा झाकतात म्हणून त्यांना ट्रोल करणाऱ्या लोकांना देखील नाईलाजाने मास्क नावाचा अलंकार परिधान करावाच लागला. जेव्हा याची सक्ती झाली तेव्हा मास्क वापरकर्ते जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती भारतात निर्माण झाली.

२०२० चं ते साल. मास्कचा तुटवडा जाणवू लागला. तेव्हा या क्षेत्रात अनेक कंपन्यांना उतरण्याची गरज भासली. एकॉमिनिक टाइम्सनुसार, सुरुवातील देशातील ४३ आघाडीच्या फेस मास्क उत्पादकांची यादी करण्यात आली आणि त्यांची उत्पादन क्षमता लक्षात घेण्यात आली. तेव्हा भारताची N95 मास्कची उत्पादन क्षमता ३१.२ मिलियन इतकी होती. 

मात्र मागणी जास्त असल्याने या कंपन्यांच्या आकड्यांत लवकरच वाढ झाली. आणि २०२० च्या शेवटपर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त अधिकृत मास्क निर्मिती करणाऱ्या  कंपन्या भारतात होत्या. पीआर न्यूजवायर या वृत्तसंस्थेनुसार आर्थिक वर्ष २०२० मध्ये भारतीय मास्क मार्केटचं मूल्य सुमारे ६६ मिलियन डॉलर इतकं होतं. तर वाढती आरोग्य जागरुकता, प्रदूषण आणि वाढत्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे ते आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत CAGR (संकलित वार्षिक वाढ दर) ११% पेक्षा जास्त होईल असा अंदाज दिलाय. 

खरंतर डिस्पोजेबल मास्कने २०२० मध्ये भारतीय मास्क मार्केटचं नेतृत्व केलं. जर विभागानुसार बघितलं तर २०२० मध्ये भारतीय मास्क मार्केटमध्ये उत्तरेकडील प्रदेशांचं वर्चस्व होते. कारण देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरं याच प्रदेशात आहेत. एप्रिल-डिसेंबर २०२० दरम्यान देशात जवळपास १५० मिलियन मास्क तयार करण्यात आले.

एप्रिल २०२१ मध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की,  N95 मास्कची मागणी दररोज तीन लाखांच्या जवळ होती आणि उत्पादन क्षमता दररोज ३० लाख होती. जवळपास २४० पेक्षा जास्त मास्क उत्पादन कंपन्या या क्षेत्रात उतरल्या होत्या. एक रिपोर्टनुसार मे २०२१ पर्यंत भारत एकूण उत्पादनापैकी जवळपास ३०% मास्क निर्यात करत होता. 

सर्जिकल मास्क 

मार्केट वॉचच्या प्रेस रिलीजनुसार २०१७ मध्ये भारतातील सर्जिकल मास्कचा बाजार ५८ मिलियन डॉलर इतका होता आणि २०२५ पर्यंत ९५ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. तर अलाईड मार्केट रिसर्चच्या अहवालानुसार, भारतीय सर्जिकल मास्क मार्केट २०१९ च्या कालावधीत ७१.७३ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचला होता आणि २०२७ पर्यंत १५७ मिलियन डॉलरवर जाण्याचा अंदाज देण्यात आला होता. 

सर्जिकल मास्क हे पॉलीप्रॉपिलीन फॅब्रिक किंवा डिस्पोजेबल लिनन सारख्या सिंथेटिक मटेरियलचा वापर करून बनवले जातात. ते सामान्यतः शस्त्रक्रिया प्रक्रियेत वापरले जातात.

पीपीई किट 

२०२० मध्ये ६० मिलियन पीपीई बॉडी कव्हरॉल्सची उत्पादन क्षमता भारताकडे होती. जी २०२१ मध्ये प्रतिदिन पाच लाख झाली होती. जवळपास ११०० उत्पादकांनी पीपीई बॉडी कव्हरॉलच्या निर्मितीसाठी नोंदणी केली होती.  २०२१ येता येता भारत हा PPE किटचा जगभरातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक होता. 

जागतिक स्थिती 

फॉरचून बिसनेस इन्साईटच्या रिपोर्टनुसार जागतिक बाजारपेठेत २०२० मध्ये २२३.९% ची प्रचंड वाढ दिसून आली. २०२० मध्ये जागतिक फेस मास्क बाजाराची व्हॅल्यू USD १७.८४ बिलियन होती. तर २०२१ मध्ये ती USD २३.७० बिलियनवर जाण्याचा अंदाज असून २०२८ पर्यंत USD १७.९४ बिलियनपर्यंत जाण्याचा अंदाज होता. 

तर जागतिक आरोग्य संघटनेच्या  (डब्ल्यूएचओ) २०२१ च्या आकडेवारीनुसार जगभरातील मागणी पूर्ण करण्यासाठी महिन्याला अंदाजे ८९ मिलियन मेडिकल मास्कची आवश्यकता होती.

अशाप्रकारे ज्या मास्कला आज आपण सोडतोय त्याने भारत आणि जगाला गेल्या दोन वर्षांत मोठी कमाई करून दिली आहे. अनेक व्यापार उभे केले तर अनेकांना रोजगार यामुळे मिळाला आहे. आता जेव्हा याची सक्ती बंद होणार आहे तेव्हा एकंदरीतच याचा मास्क मार्केटवर आणि आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल, हे पाहणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.