पाच हजार करोड रुपयांना अहमदाबादची टीम खरेदी करणाऱ्या सीव्हीसी कंपनीची गोष्ट साधी नाही

आयपीएल म्हणलं की, खेळाडूंना कोटींच्या घरात मिळणारे पैशे आठवतात. पण कधी कुठल्या खेळाडूला मिळाले नसतील एवढे पैशे बीसीसीआयला टीमा विकून मिळतात. आता पुढच्या आयपीएलला दोन नवा टीम येणार तेव्हाच लक्षात आलं होतं की, पैशाचा पाऊस पडत असतोय.

नव्या दोन टीमा आल्यात अहमदाबाद आणि लखनौच्या. लखनौची टीम घेतली संजीव गोएंकांनी तेही ७०९० कोटी रुपयात. अहमदाबादची टीम गेली सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडे, ५६२५ कोटीत. आता पुण्याच्या टीमचे मालक म्हणून गोएंका फेमस आहेत.

पण भिडू लोक, सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सही काय कच्चे खिलाडी नाहीत.

सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स ही खाजगी इक्विटी आणि गुंतवणूक सल्लागार कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९८१ मध्ये झाली. या कंपनीचं मुख्यालय लक्झेंबर्ग या देशात असून मुख्य कार्यालय लंडनमध्ये आहे.

सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सचा एकूण टर्नओव्हर ५६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि जगभरात यांचे ३ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या ४० वर्षात कंपनीनं जगभरातल्या ७३ कंपन्यांमध्ये ५ लाखांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

आयपीएलमध्ये ही कंपनी पहिल्यांदाच उतरली असली, तरी याआधी त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये भागीदारी करण्याचा प्रयत्न केला होता.

सीव्हीसीनं पैशे लावलेला क्रिकेट हा काय पहिला आणि एकमेव खेळ नाही. याआधी त्यांनी ला लिगा या स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये आणि फॉर्म्युला वनमध्ये पैशे गुंतवले होते. २००६ पासून २०१७ पर्यंत ते फॉर्म्युला वन टीमचे मालक होते.

आता कंपनी मोठी आहे, म्हणल्यावर वाद होणार नाहीत असं कसं!

सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडे असलेली फॉर्म्युला वन टीम लिबर्टी मीडिया कंपनीनं विकत घेतली. सीव्हीसीसाठी हा आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदा देणारा करार होता. त्यांना त्यातून अंदाजे ३०० टक्केपेक्षा जास्त नफा मिळाला. द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, ग्रँड प्रिक्स सर्किटच्या प्रगतीतुन सीव्हीसीपेक्षा अधिक कमाई कुणालाच करता आली नाही. पण या करारावर चाहते चांगलेच नाराज झाले. त्यांनी सीव्हीसीवर पैशासाठी खेळाचा नाश आणि जास्त नफ्यासाठी टीमची विक्री केल्याचा आरोप केला होता.

ही कंपनी खेळात अत्यंत कमी पैशे गुंतवते, पण प्रॉफीट मात्र मजबूत कमवते, अशी टीका चाहत्यांनी केली.

आता अहमदाबाद संघाची मालकी किती दिवस त्यांच्याकडे राहते आणि त्याच्याकडून ते किती प्रॉफिट काढतात हे काय आत्ता लगेच सांगता येणार नाही. एक मात्र नक्की या गुंतवणुकीमुळं आयपीएल आणखी ग्लोबल झालीये हे फिक्स.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.