शेतीच्या सगळ्या समस्यांची उत्तरं या सहा ॲप्समधून मिळू शकतात

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतलाय. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सरकार शेतकऱ्यांसाठी एक ‘सुपर ॲप’ लाँच करण्याची योजना आखतंय. ज्यामध्ये अनेक डिजिटल संस्था आणि मोबाइल ॲप्लिकेशन एकत्र केले जाणार आहेत. याने काय होईल तर, शेतकऱ्यांना शेतीबद्दलचे कोणतेही प्रश्न असतील तर ते एकाच ठिकाणी येऊन सोडवण्यास मदत होईल.

नवीन संशोधन आणि विकास, हवामान आणि बाजारपेठेतील अपडेट्स, शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि विविध कृषी-हवामान झोनसाठी सल्ला यासारखी सगळी माहिती तिथे असणार आहे.

२०१४ पासून बीजेपीचं सरकार जसं केंद्रात आलं आहे तसं ‘डिजिटल इंडिया’कडे त्यांनी जोरदार लक्ष दिल्याचं सगळेच बघताय. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुपर ॲपचं जास्तच फॅड आल्याचं दिसतंय. कारण भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग डेस्कटॉपच्या ऐवजी स्मार्टफोन वापरणारा आहे.

तेव्हा शेतकऱ्यांना देखील टेक्नोसॅव्ही बनवण्यास सरकारने तंत्रज्ञानाच्या वापरला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील ‘ई-पीक पाहणी’ त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहू शकतो. स्वतःचा पीकपेरा स्वतः मोबाईच्या साहाय्याने नोंदवण्याची हे ॲप महाराष्ट्र शासनाने विकसित केलं आहे. तेव्हा अजून असे कोणते ॲप्स आहेत जे शेतकऱ्यांना मदत करू शकतात हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

त्यातून काही ॲप आणि वेवसाईट्सची माहिती मिळाली जे खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आले आहेत. कोणत्याही पिकाची किंवा भाजीपाल्याची शेती, पीक लागवड, पेरणी, कापणी, कीटक किंवा किडींच्या हल्ल्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हे ॲप्स योग्य शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करते. शिवाय ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने शेतकरी त्यांचा वापर करून शंका सोडवू शकतात तेही विनामूल्य…

१. किसान सुविधा ॲप

२०१६ मध्ये हे ॲप सुरु झालं. शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी आणि गावांच्या विकासासाठी काम करण्यासाठी हे सुरू केलं होतं. या ॲपमध्ये साध्याचं हवामान आणि येत्या पाच दिवसांचं हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना देण्यात येतो. सोबतच जवळच्या शेतमालाचे बाजारभाव, खत, बियाणे आणि शेतीसाठी लागणारी वेगवेगळी उपकरणं यांची माहिती दिली जाते. या ॲपची डिझाईन अशी बनवण्यात आली आहे ज्याने ती सहज तंत्रज्ञानासाठी नवीन असलेल्या शेतकऱ्याला देखील हाताळता येईल.

केंद्रीय मंत्रालयाने जरी हे ॲप विकसित केलं असलं तरी सगळ्या भाषांमध्ये हे उपलब्ध असल्याने आपली प्रादेशिक भाषा निवडून आपण माहिती घेऊ शकतो.

२. आरएमएल फार्मर – कृषी मित्र

या ॲपमध्ये सुद्धा शेतकरी नवीन वस्तू आणि मंडईच्या किमती, कीटकनाशकं आणि खतांचा अचूक वापर, हवामान अंदाज, कृषी सल्ला आणि  सल्लागारांबद्दल माहिती मिळवू शकतात. शिवाय, हे ॲप सरकारच्या कृषी धोरणं आणि योजनांबद्दल माहिती आणि बातम्या देखील देतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ते भारतातील ५०,००० गावे आणि १७ राज्यांमधील ४५० हून अधिक पीक जाती, १३०० मंडई आणि ३५०० हवामान ठिकाणं निवडू शकतात. या ॲपचं डिजाईन असं आहे ज्याद्वारे शेतकरी शेतीच्या विविध पैलूंचे विश्लेषण करू शकतात किंवा माहिती मिळवू शकतात.

३. पुसा कृषी

तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांना अधिकचा परतावा मिळू शकतो अशी केंद्र सरकारची धारणा आहे. त्यानुसार हे ॲप केंद्रीय मंत्रालयाने विशेषतः भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी विकसित केलं आहे. हे ॲप शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केलेल्या पिकांच्या नवीन वाणांशी संबंधित माहिती देतं.

तसंच संसाधन-संवर्धन पद्धती आणि शेती यंत्रसामग्रीशी संबंधित माहिती आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी, याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करतं.

४. क्रॉप इन्शुरन्स

हे ॲप शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विम्याच्या प्रीमियम मोजण्यासाठी मदत करते. सोबतच त्यांच्या पिकासाठी आणि त्यांच्या लोकेशनसाठी कट ऑफ डेट्स आणि कंपनी कॉन्टॅक्ट्सची माहिती प्रदान करते. हे शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याबद्दल रिमाइंडर आणि कॅल्क्युलेटर म्हणून काम करते. कोणत्याही अधिसूचित क्षेत्रातील कोणत्याही अधिसूचित पिकाच्या सामान्य विम्याची रक्कम, विस्तारित विम्याची रक्कम, प्रीमियम तपशील आणि अनुदानाची माहिती मिळवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

हे पुढे त्याच्या वेब पोर्टलशी जोडलेले आहे जे शेतकरी, राज्ये, विमा कंपन्या आणि बँकांसह सर्व भागधारकांना सेवा पुरवते.

५. खेती-बाडी

‘खेती-बाडी’ हे एक सामाजिक उपक्रमातुन सुरु करण्यात आलेलं ॲप आहे. या ॲपचा उद्देश ‘सेंद्रिय शेती’ला प्रोत्साहन देणं आणि समर्थन देणं हा आहे. तर भारतातील शेतकऱ्यांशी संबंधित सगळी महत्त्वाची माहिती, त्यांच्या समस्या यांची माहिती देखील हे ॲप प्रदान करतं. हे ॲप शेतकऱ्यांना त्यांची रासायनिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये कशी बदलावी यासाठीचं मार्गदर्शन करतं. मात्र हे ॲप सध्या फक्त हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे.

६. शेतकरी

शेतकरी मित्र हे भारतातील शेतकऱ्यांसाठी बनवलेले मल्टी-फंक्शनिंग म्हणजे अनेक कामं करणारं मोबाइल ॲप आहे. हे सरकारी योजना, पीक व्यवस्थापन, कृषी-व्यवसाय आणि मार्गदर्शक तत्त्वे, बाजारभाव याची माहिती देतं. शिवाय याठिकाणी कृषी क्षेत्रातील यशोगाथा याबद्दल देखील माहिती दिली जाते. ज्याद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं.

अशाप्रकारे हे ६ सगळ्यात जास्त वापरले जाणारे आणि वापरण्यासाठी सहज सोपे असे ॲप्स आहेत ज्यांचा वापर करून शेतकरी त्यांच्या शंकांचं निरसन स्वतःचं करू शकतात. 

मात्र याही पलीकडे जाऊन जर थेट माहिती हवी असेल तर कुठे संपर्क साधता येऊ शकतो का? हे आम्ही शोधलं तेव्हा समजलं की,

‘किसान कॉल सेंटर’ ही सुविधा शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

यासाठी एक टोलफ्री क्रमांक सरकारने दिलेला आहे. १८००-१८०-१५५१ असा तो क्रमांक आहे. यावर संपर्क साधल्यास कृषी विभागाचे तज्ज्ञ तुम्हाला हवी ती माहिती देतात. ज्याने तात्काळ शंकेचं निरसन होण्यास मदत होते. आम्ही देखील शेतीसंबंधित माहिती देणाऱ्या ॲप्स प्रमाणे काही साईट्स आहेत का? हे जाणून घेण्यासाठी  किसान कॉल सेंटरला कॉल केला. तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार…

केवळ ॲप्सच नाही तर अशा काही वेबसाईट्स देखील आहे जिथे तुम्हाला शेतीसंबंधित शासनाकडून जरी होणारी सगळी माहिती मिळू शकते. जसं की https://www.msamb.com/ ही वेबसाईट शेतकऱ्यांना बाजारभाव संबंधित माहिती देते. सगळ्या प्रकारचे पिकं या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. msamb चं ॲप देखील आहे जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं.

दुसरी वेबसाईट आहे krushi.maharashtra.gov.in…. यावर तुम्हाला सगळ्या पिकांची संपूर्ण माहिती मिळू शकते. हवामानसाठी imd ही साईट आहे. या साईट्स मराठी, हिंदी अशा भाषांमध्ये उपलब्ध असल्याने समजण्यास सोप्या आहे. फक्त आपल्याला हवं असलेलं पीक निवडण्याची गरज असते.

शेतीच्या वेगवेगळ्या घटकांबद्दल माहिती देणारे असेच काही ॲप्स आता केंद्र सरकार एकत्र करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप ठेवण्याची किंवा साईट्स बघण्याची गरज भासणार नाही. केवळ ते एक सुपर ॲप तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न सहज सोडवू शकाल.

तोपर्यंत तुम्ही वरती सांगितलेले ॲप नक्कीच वापरून बघू शकतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.