उद्धव ठाकरेंनी विचारलं “बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते..?” हे आहे उत्तर…

महाराष्ट्रात सध्या दोनच गोष्टी गाजतायेत. एक – राज ठाकरे… दुसरे – त्यांच्यावरच्या टीका, विरोध.

राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं की त्यावर सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतातच. आणि त्यात परत ते म्हणतात ‘आम्ही राज ठाकरेंना इतकं महत्व देत नाही’. असो, तो विषय वेगळा. मात्र राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेने अनेकांना आक्षेप असल्याचं कळतंय आणि ज्याप्रकारे राज ठाकरे त्यांची भूमिका दाखवतायेत त्यावरून तर अजूनच कल्ला होतोय.

राज त्यांची कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका इतकी प्रखरपणे मांडतायेत की त्यावर उद्धव ठाकरेंना सभा घेऊन बोलावं लागल्याचं दिसतंय.

“मनसे आणि भाजपचं हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा”, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

तर त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे…

“बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला.

यावरूनच प्रश्न पडतोय की, उद्धव ठाकरे असं का विचारतायेत? राज ठाकरे कुठे होते त्यांना माहित नसेल का? नक्की या प्रश्नाचा अर्थ काय? हे जाणून घेण्याचं आम्ही ठरवलं.

त्यासाठी खरंच बाबरी मस्जिद जेव्हा पाडली गेली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? हे आम्ही शोधायला सुरु केलं. 

यासाठी आम्ही वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांशीही संपर्क साधला. सगळ्यात पहिले आम्ही बोललो ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांच्याशी. त्यांनी दिलेली माहिती अशी की…

बाबरी मस्जिद पाडली गेली ६ डिसेंबर १९९२ साली. राम मंदिरासाठी १९८४-८५ मध्ये विश्व हिंदू परिषद या संघ परिवारातील संस्थेने आंदोलन सुरू केलं, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यात नव्हता. त्यानंतर १९८७ साली मुंबईच्या विलेपार्ले इथे पोटनिवडणुकांच्या वेळी बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा नारा दिला.

‘गर्व से काहो हम हिंदू है’ हा नारा त्यांनी मुंबईत पॉप्युलर केला आणि त्यांचा उमेदवार निवडून आला.

त्यानंतर प्रमोद महाजन यांच्या लक्षात आलं की बीजेपी जर राम जन्मभूमीच्या आंदोलनात सामील झालं नाही तर सगळे मत शिवसेनेकडे जातील. तेव्हापासून बीजेपी ॲक्टिव्ह झाला मात्र शिवसेना आधीपासून ॲक्टिव्ह होती आणि अर्थातच राज ठाकरे देखील ॲक्टिव्हचं होते.

मूळ मुद्दा असाय की, उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न विचारण्याचं काहीच कारण नाही की १९९२ साली राज ठाकरे कुठे होते. हा प्रश्न पूर्ण गैरलागू आहे. 

उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाने तरुणांना असं वाटू शकतं की, राज ठाकरे मंदिर पाडण्याच्या विरुद्ध होते की काय? पण हा सर्व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली नव्हती की, मंदिर पाडू नका म्हणून. ते शिवसेनेत होते आणि सेनेचा राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा होता. 

दुसरं म्हणजे बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा राज अयोध्येला गेले होते का? असं त्यांना म्हणायचं असेल तर… उद्धव ठाकरे तरी गेले होते का? बाळासाहेब स्वतः गेले होते का? तर नाही. मात्र शिवसेनेचे काही नेते आणि कार्यकर्ते गेलेच होते. शिवाय जेव्हा बाबरी नक्की पाडली कुणी? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा सुंदरसिंग भांडरींनी सांगितलं की भाजपने नाही पाडली आणि हात झटकले. 

मात्र बाळासाहेबांनी त्यांच्या बेधडक स्वभावानुसार जबाबदारी घेतली. त्यांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आणि राज तेव्हा शिवसेनेत असल्याने त्यांचीही भूमिका. तेव्हा या प्रश्नाचं काहीच अर्थ नाहीये. उद्धव ठाकरे जिथे होते तिथेच राज ठाकरे होते, असं प्रकाश अकोलकर म्हणालेत. 

यानंतर आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं… 

शिवसेनेचा बाबरी मस्जिदीच्या प्रकरणात फारसा मोठा रोल देखील नाहीये. फक्त एक पथक गेलं होतं त्यांचं. तर राज ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते आणि भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होते. राज तेव्हा अगदी तरुण होते. उद्धव ठाकरेंच्या आधी ते शिवसेनेत कार्यरत झाले होते. 

शिवाय पक्षात ते काही प्रॉमिनंट पदावर नव्हते. ते काही शिवसेनेचं धोरण वगैरे ठरवत नव्हते. अख्ख्या शिवसेनेत आवाज फक्त बाळासाहेबांचा होता. त्यामुळे आज हे विचारणं की तेव्हा राज ठाकरे कुठे होते? हे राजकीय कुरघोडी करण्यासाठी म्हणून बोललं जातंय. 

यात त्यांचा सांगण्याचा मुद्दा असा की, शिवसेना आधीपासून हिंदुत्ववादी होती आणि आहे आणि राज ठाकरे आता ती भूमिका घ्यायला लागले. फक्त राजकीय फायद्यासाठी आणि मतांसाठी आता राज यांनी हिंदुत्वाची शाल ओढलीये, असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय. 

मग याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयदेव डोळे सरांशी संपर्क साधला…

उद्धव ठाकरेंना कदाचित म्हणायचं असेल  की, आता राज ठाकरे अयोध्येला जायचं म्हणतायेत मात्र जेव्हा खरी वेळ आली होती तेव्हा ते कुठे होते? आता त्यांना पुळका आलाय, तेव्हा तो कुठे गेला होता. 

मात्र बाबरी पाडली गेली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? तर शिवसेनेत होते…. आणि बाळासाहेबांसमोर त्यांचं नेतृत्व नव्हतंच कधी. स्वतंत्र असं अस्तिव नव्हतं त्यांचं. तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही लहान होते, तरुण होते. 

यानंतर आम्ही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले…

राज ठाकरे कुठे होते म्हणजे मला काय प्रश्नंच नाही कळला त्यांचा. १९९२ साली राज साहेब कुठे होते हे तर उद्धव साहेबच चांगलं सांगू शकतील. त्यांचं मेमरी कार्ड इरेज झालंय की काय झालंय, हेच कळेना. हा प्रश्नच कसा विचारू शकतात ते. कारण ज्यावेळी उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर सभा घेत फिरत होते.

हे असं आहे की, राज ठाकरेंच्या सभांना महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून प्रतिसाद मिळतोय. म्हणून सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून कदाचित गोंधळलेल्या मनस्थितीत मुख्यमंत्री साहेब आले आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्यानंतर आम्ही शिवसेनेच्या एखाद्या नेत्याकडून नक्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं आहे? हे जाणून घेण्याचं ठरवलं.

त्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या…

१९९२ साली राम मंदिर-बाबरी मस्जिद हा विषय होता. त्यावेळी शिवसैनिक सक्रिय होते. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेत होते ठीक आहे, मात्र त्यांचा या विषयाशी काही संबंध नव्हता.

आता बोलायचं झालं तर राम मंदिर होतंय. म्हणजे हा खरा विषयच नाहीये. मग आता ते अयोध्येला का जातायेत? यावरून विषय आलाय. त्यांना नक्की काय अचिव्ह करायचं आहे आता तिथे जाऊन? आपण खरे हिंदुत्ववादी आहोत, असं ओढून-ताढून ते हिंदुत्व दाखवतायेत. आणि हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून करतायेत.

त्यांच्या मनाचा सध्या गोंधळ झाला आहे आणि राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचा आहे. भोंगा, हनुमान चाळीसा मग मध्येच अयोध्येला जाणं हा त्यांचा मानसिक गोंधळ दिसतोय. यातून त्यांना राजकीय अस्थिरता निर्माण करायचीय. 

या सर्वांशी बोलून ‘बाबरी पाडली गेली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’ या उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न आम्ही केला.

राज ठाकरेंचं अयोध्येला जाणं आणि सभा घेणं यावरून त्यांची हिंदुत्वाची भूमिका अचानक समोर आलीये आणि त्याचंच शिवसेनेला आश्चर्य वाटतंय. त्यात त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून शिवसेनेला त्यांचं हिंदुत्व कदाचित हलताना दिसतंय, म्हणून आमचं हिंदुत्व कसं योग्य आहे, हे दाखवण्यासाठी ते धडपड करतायेत, असं दिसतंय. 

बाकी राज ठाकरे तेव्हा कुठे होते? याचं वस्तुतः उत्तर तर मिळालंच आहे. आणि आज ते कुठे आहेत? हे तर अख्या देशाला ठाऊक आहे. 

तुमचं उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाबद्दल काय म्हणणं आहे? तुमचा तर्क काय सांगतो? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.