अजित दादांनी VAT कमी करूनही CNG चे भाव का वाढतायेत…
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सगळे त्रस्त आहेत. २ दिवस नीट जात नाही की दरवाढ झालेली दिसते. अशातच पंतप्रधान मोदींनी देखील हा मुद्दा नुकत्याच घेतलेल्या ऑनलाईन कॉन्फेरन्समध्ये उचलून धरला. त्यांनी अनेक राज्यांना याबद्दल सुनावलं आणि पेट्रोलवरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन केलं.
त्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. मात्र यामध्ये सामान्य माणसाचे हाल तर होतच आहेत. वाढलेल्या इंधन दराचा फटका अपल्याला बसतोय.
अशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत.
मात्र, आता सीएनजी वापरणाऱ्या लोकांचा दिलासा देखील हिसकावून घेतला जातोय, असं चित्र आहे.
का?
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सीएनजीच्या किमतींमध्ये वाढ होत असताना दिसून येत आहे. पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. काल २९ एप्रिलला सीएनजीच्या दरात २ रुपये २० पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली. यामुळे सीएनजीचा दर ७७ रुपये २० पैसे प्रति किलो इतका झाला आहे. गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही तिसरी वाढ झाली आहे.
तर नाशिकमध्ये… नाशिकमध्ये सीएनजीचा दर ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. नाशकात १ एप्रिलला सीएनजीचे दर ६५.२५ रुपये इतके होते. मात्र, गेल्या २६ दिवसांमध्ये या दरांमध्ये टप्प्या टप्प्याने १५ रुपयांची वाढ झाली आहे.
ही परिस्थिती बघून परत एकदा सीएनजीवर ट्रान्स्फर झालेल्या लोकांनाही मनस्ताप होऊ लागलाय. भाई, काय विचार करून आलो होतो, इथे पण सुख नाही, चंदणंच! असं लोक म्हणायला लागलेत.
मात्र यात एक प्रश्न हा आहेच की, राज्याने व्हॅट कमी करूनही सीएनजीचे दर का वाढत आहेत?
याचं उत्तर जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊ…
पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सीएनजी कारची विक्री यावर्षीच्या सुरुवातीलाच वाढायला सुरुवात झाली. यावर्षीच्या सुरुवातीपासून पेट्रोलच्या किमती वाढताना दिसतायेत. त्यात सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी आहेत आणि सीएनजी कारचे मायलेजही अधिक आहे, हेच चित्र टिपून लोकांचा कल सीएनजीकडे वाढला.
मात्र नवीन वर्ष सुरू होताच मुंबईसारख्या मोठ्या शहरात सीएनजीचे दर वाढवण्यात आले.
त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वायूवर आधारित अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत नैसर्गिक वायू (CNG आणि LNG) आणला पाहिजे आणि भारताच्या ऊर्जा बास्केटमध्ये पर्यावरणस्नेही इंधनाचा वाटा वाढवावा, असं रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या तसेच सरकारी मालकीच्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग संस्थांनी म्हटलं होतं.
यामुळे CNG चे दर कमी होतील, असा त्यांचा अंदाज होता.
मात्र अजूनही नैसर्गिक वायू जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्य व्हॅट, केंद्रीय विक्री कर या इंधनावर लागू आहेत.
म्हणून दर कमी करण्याची आशा होती ती राज्याकडून.
राज्य सरकार यासाठी तयार झालं. एकीकडे महाराष्ट्रात पेट्रोलवर राज्य सरकार सगळ्यात जास्त टॅक्स घेत असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारने CNG साठी VAT कमी करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट पूर्ण १० टक्क्यांनी कमी केलं. आधी व्हॅट होता १३.५% तो कमी करून ३% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली.
हा निर्णय त्यांनी राज्याचं तिसरं अर्थसंकल्प सादर करताना केला. सीएनजीचे दर कमी करण्यावर सरकारचा भर पर्यावरणस्नेही वाहतूकीच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देण्याकडेही आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी हे पर्यावरणास अनुकूल मानलं जातं. यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) स्वस्त होऊ शकतो, असं बोललं जाऊ लागलं.
या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल पासून होईल असं त्यांनी सांगितलं.
त्यानुसार एक एप्रिलपासून, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले. नव्या दरानुसार सीएनजीमध्ये सहा रुपयांची तर पीएनजीमध्ये साडेतीन रुपयांची घसरण झाली. मुंबईत सीएनजीची किंमत साठ रुपये प्रति किलो झाली.
मात्र काहीच दिवसात चित्र अगदी उलट झालं. राज्याने VAT कमी केला तरी दर वाढतानाच दिसत आहेत.
कारण काय?
राज्याने व्हॅट कमी करताच कंपन्यांकडून दर वाढवण्यात आले. म्हणून नागरिकांना स्वस्त सीएनजीचा आनंद फार काळ घेता आला नाही.
मग कंपन्यांनी दर का वाढवले? हे आम्ही शोधलं. तेव्हा सापडलं…
ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत भारतात घरगुती गॅसचं अपुरं उत्पादन हे भाववाढीचं प्रमुख कारण आहे, असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात भारताचीच मागणी तिपटीने वाढली आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या इनपुट कॉस्टमध्येही वाढ झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला.
भारत कतार, मस्कत आणि इतर अरबी देशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून २० डॉलर प्रति सिलिंडरने गॅस खरेदी करत होता. दुसरीकडे, रशिया-युक्रेन युद्धाचा किंमतींवर परिणाम झाला आहे.
तर तिसरं म्हणजे सीएनजीच्या मिश्रणात एक विशिष्ट गॅस जोडला जातो, जो बाहेरून आयात केला जातो. या विशिष्ट वायूची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दुप्पट करण्यात आली आहे, असं दारूवाला यांनी नमूद केले.
मग आता यावरून दिसतंय की, सगळं काही बाहेरून होतंय. बाहेरची, आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूची परिस्थितीच ठीक नाही म्हणून सर्व होतंय.
पण एक कारण आहे ज्याला देशातील केंद्र सरकार देखील कारणीभूत आहे.
कसं?
सीएनजीचे दर नैसर्गिक वायू वितरक कंपन्यांवर जास्त अवलंबून असतात. भारतातील अग्रगण्य नैसर्गिक वायू वितरण कंपन्यांपैकी एक म्हणजे महानगर गॅस लिमिटेड, (एमजीएल). गेल (GAIL India) लिमिटेड ही भारत सरकारची महारत्न कंपनी आहे एमजीएलची प्रमोटर आहे.
या एमजीएलने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एका निवेदनात म्हटले आहे की…
‘देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या विक्री दरात केंद्राने ११० टक्के वाढ केली आहे. सीएनजीसाठी घरगुती गॅसच्या उपलब्धतेतील कमतरता भरून काढण्यासाठी मिसळल्या जाणाऱ्या रिगॅसिफाइड एलएनजीची (regasified LNG) किंमत ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळीवर आहे. त्यामुळे आम्ही किंमती वाढवण्यास बांधील आहोत’
म्हणजे देशांतर्गत सीएनजीचे दर वाढण्याला दोन फॅक्टर कारणीभूत आहेत.
एक म्हणजे अंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणि दुसरं म्हणजे केंद्राने केलेली भाववाढ.
आता पेट्रोलमध्ये जेव्हा भाववाढ झाली तेव्हा केंद्राने राज्यांना सुनावत त्यांनी टॅक्स कमी करावा असं सांगितलं. मात्र आता जेव्हा सीएनजीचे भाव वाढत आहेत, तेव्हा राज्याने आधीच स्वतःचे प्रयत्न केले आहेत. तब्बल १०% VAT कमी केला आहे.
तेव्हा आता या भाववाढीला आळा घालायचा असेल तर ते केंद्राच्या हातात आहे. केंद्राने मुळात नैसर्गिक वायूच्या दरात वाढ न करता ते कमी कसे करता येईल, याचे पर्याय शोधणं गरजेचं आहे.
तेव्हाच कुठे सामान्यांना या वाढत्या सीएनजी दरातून आधार मिळणार आहे.
हे ही वाच भिडू :
- मोदीजी म्हणाले ते खरय, पेट्रोलवर देशात सर्वाधिक टॅक्स “महाराष्ट्र सरकार” घेतय..
- पेट्रोल, डिझेल तुतू-मीमी करत राहिले आणि लिंबाने दराचा विक्रम केला
- गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल, गहू, डाळी : निकालानंतर या ७ गोष्टींच्या किंमती वाढल्यात..