तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येक घरात “झाडीपट्टीचाच” डंका वाजेल…

प्रत्येक प्रांतानुसार या नाटक कलेचा देखील प्रकार वेगळा आहे. त्या-त्या भागातील कलाकारांनी तो जीवापाड जपला आहे आणि इतक्या अस्सल प्रकारे त्याच सादरीकरण केलं जातं की ठळकपणे त्याचं वेगळेपण आणि त्याचं महत्त्व दिसून येतं. 

यातीलच एक प्रकार म्हणजे…

‘झाडीपट्टी’

हा विदर्भातील नाटक प्रकार आहे. या भागातील शेतकऱ्याचं नाटक, तमाशावर फार प्रेम आहे. म्हणूनच काळानुरूप विदर्भात शहरीकरण वाढलं असलं तरी इथल्या नाट्यसंस्कृतीने आपली प्राचीन परंपरा जपली आहे. गेल्या जवळपास १५० वर्षांपासून लोककलावंत नाटक हा कलाप्रकार सादर करत आहेत.

याच नाटकाची धमाल आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, ‘झॉलीवूड’ या  चित्रपटामार्फत.

तृषांत इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेलाय. ३ जूनला तो प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हे एक क्रांतिकारक आणि प्रबोधनकारक पाऊल मानलं जातंय. कसं?

म्हणत असाल तर झाडीपट्टीबद्दल काही गोष्टी जाणून घ्या… मग तुम्हीच ठरवा…

झाडीपट्टीचा इतिहास आणि सुरुवात 

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वीचं नाव ‘झाडीमंडळ’. तर या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावानं प्रचलित आहे. भगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडी गंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यातूनच नाटकाची उत्क्रांती झाली.

मात्र झाडीपट्टीतल्या या लोककलेला नाटकांची किनार लाभली ती सांगलीकरांच्या नाटक मंडळीतून.

इसवी सन १८८६ मध्ये नागपूरला सांगलीकर नाटक मंडळी आली होती. तेव्हा झाडीपट्टीचे कलावंत नाटकाच्या प्रेमापोटी नागपुरात जात असत. कारण त्यांना त्यांच्या नाटकांमध्ये वेगळेपणा जाणवत होता, जो त्यांना खूप प्रेरित करत होता. याचमुळे मग झाडीपट्टीच्या दंडारकर्मींनी तिथून धडे घेणं सुरू केलं. हळूहळू दंडारीचं रूपांतर नाटकात होऊ लागलं. 

नाटककला सुरु झाली ती सांगलीकरांमुळे मात्र झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकला रुजवली ती ‘कोहळी’ समाजाने. हा कोहळी समाज जमीनदारी आणि मालगुजारी करायचा. मात्र जाम कलारसिक या समाजात होते. त्यांना दंडारी पाहण्याचा छंद होता. त्यातूनच त्यांनी स्वतःचं दंडारमंडळ उभं केलं. त्यानंतर नाटक रुजवण्यासाठी नाट्यमंडळ गावोगावी सुरू केलं. याच प्रयत्नांमुळे झाडीपट्टी रंगभूमी बहरली.

म्हणूनच तर झाडीपट्टी रंगभूमीला अनेक कलावंतांनी उभं केलं आहे, असं म्हटलं जातं. 

झाडीपट्टीचं हटकेपण…

अस्सल झाडीबोली भाषेतील संगीतमयी सांस्कृतिक नाट्यपरंपरा हे कलावंत उराशी बाळगून आहेत. अशाच एका कलाकाराशी आम्ही संपर्क साधला. 

आशीष नरखेडकर हे ॲक्टर आहेत ज्यांनी झाडीपट्टीमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या अनुभवातून अजून या विषयाच्या खोलात जाऊया…

मी मूळचा चंद्रपूरचा. म्हणून लहानपणापासूनच झाडीपट्टीच्या सहवासात वाढलो. ललित कला केंद्रात शिकताना जगभरातील नाटक मी तिथे शिकलो. मात्र माझ्याच भागातील झाडीपट्टीचा अनुभव नव्हता. तोच मिळवण्यासाठी २०१० साली मी झाडीपट्टीचे जवळपास ६० प्रयोग केले होते. अनिरुद्ध बनकर यांच्या फेमस ग्रुपमध्ये मी होतो. 

झाडीपट्टीमध्ये एक पॅटर्न असतो की त्यात कॅरॅक्टर ठरलेले असतात. म्हणजे संबंधित कंपनीचा/ग्रुपचा एक व्हिलन असेल तर त्यांच्या प्रत्येक नाटकात तोच व्यक्ती व्हिलनची भूमिका साकारतो. तसं मी तेव्हा व्हिलन म्हणजे निगेटिव्ह रोलसाठी फिक्स होतो. जेव्हा माझा पहिला प्रयोग होता तेव्हा प्रेक्षकांमधून खूप शिवीगाळ झाली होती. 

त्याचं कारण म्हणजे, जी नाटकपद्धती मी बाहेर शिकलो त्यात आणि झाडीपट्टीच्या नाटक स्टाईलमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. 

नाटक करताना आपण इतर ठिकाणी रिअलिस्टिकला खूप भर देत असताना ओव्हरऍक्टिंग, लाऊड असं जे आपण टाळतो, तेच नेमकं झाडीपट्टीत अपेक्षित असतं. तसं नाही केलं तर अगदी आई-बहिणीवरून प्रेक्षकांनी आम्हाला शिव्या घातल्या आहेत. इतकी कनेक्ट असते इथली प्रेक्षक मंडळी या नाटकांशी, कलाकारांशी.

त्यात माझा निगेटिव्ह रोल. अशात हसणं, डायलॉग अजून लाऊड लागतात. शिवाय स्टेजवर एकच माईक असतो. जसं कॅरेक्टर मुव्हमेंट करेल तसं खाली बसलेल्या साउंडवल्याच्या हातात दोरी असायची जी तो काढायचा आणि त्यानुसार माईक स्टेजवर मूव्ह व्हायचा. परत लाइटिंग इफ्फेक्ट इथे महत्वाचा फॅक्टर असतो. निगेटिव्ह रोल करताना तेवढ्या लाऊडली जर हसलो नाही तर लाइटिंग इफ्फेक्टमध्ये ते नकली वाटतं.

नेमकं हेच प्रेक्षकांना नको असतं, नकलीपणा!

कम्प्लिट सेटअप वेगळा असतो. इतर नाटकप्रकार एकीकडे आणि झाडीपट्टी एकीकडे.

लाऊडनेस हेच झाडीपट्टीचं मूळ आहे. 

काळानुसार लाऊडनेसमध्ये थोडे बदल झालेत. मात्र तरी अशी कंपन्यांची संख्या १० ते १५ टक्के आहे. बाकी सगळे पारंपरिक पद्धतीनेच करतात. कारण लोकांना तसंच आवडतं. जर तुम्ही तसं करत नसाल तर तुम्ही ॲक्टर नाही, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. 

रात्री ११ ला सुरु झालेला प्रयोग सकाळी ६ ला संपायचा असं पॅटर्न आहे. याचं कारण असं की, आजूबाजूंच्या गावातून लोक आलेले असायचे. सकाळपर्यंत त्यांना परत गावी जायला कोणतंही साधन नसायचं. गाड्या वगैरे. म्हणून रात्रभर प्रयोग सादर केले जायचे, ते उजाडेपर्यंत.  यात अजून कलाकारांची परीक्षा अशी की, मूळ स्क्रिप्ट तुमची असते फार कमी. मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी हे कलावंत अगदी तरबेज झालेले असतात. ५ मिनिटांचा सिन ते १५ ते २० मिनिट खेचतात.

मुंबईतल्या अनेक बड्या कलावंतांनी केवळ झाडीपट्टीत काम करण्यासाठी या भागात हजेरी लावलीये. एका गावात तर दिवसाला १८ ते १९ नाटकं एकाच दिवसाला असतात. या गावाची ती प्रथाच झाली आहे. इतकी नाटकं ‘ॲट अ टाइम’ सुरु असतात आणि प्रत्येक प्रयोगाला दीड ते २ हजार पब्लिक असते.

झाडीपट्टीचं वेगळेपण असं की, कलाकार म्हणून आपण जितकं प्युअरली काम करतो त्यापेक्षा जास्त उत्साही आणि आनंदी प्रेक्षक असतात.

झाडीपट्टी नाटक आहे तर प्रेक्षक येतील की नाही याची चिंता करण्याची गरजच नसते.

यानंतर आम्हाला घावले असे कलाकार जे सध्याही झाडीपट्टीत काम करताय. ज्यांचा अनुभव तर अंगावर काटा आणणारा आहे. हे कलाकार म्हणजे…

मुन्नाभाई बीके

झाडीपट्टीचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ‘लाईव्ह परफॉर्मन्स’

इथे सगळं काही लाईव्ह हवं असतं प्रेक्षकांना. बॅकग्राउंड म्युझिकसाठी तबला वगैरे सगळे वाद्य लाईव्ह वाजणार. तुम्ही चुकलात तरी पब्लिक ॲक्सेप्ट करते सर्व, अट एकच सर्व लाईव्ह हवं. १५० वर्षांची ही परंपरा आहे. काम करताना खूप त्रास होतो कलावंतांना. आधी लोक बैलगाडी, सायकलने जायचे. त्यात अजूनही साधी मेकअप रूम नसते. शेतात वगैरे प्रयोग असल्याने मोठ्या दगडांवर बसून कलाकार मेकअप करतात. 

तरी बेस्ट काम देतात. 

त्यात मुंबई-पुण्यावाल्यांनी आमच्यावर ताशेरे ओढले आहेत की, झाडीपट्टीवाले फार लाऊड बोलतात. मात्र याचं कारण एकच आहे की, माईक असतो एकच. आधीपासून ही प्रथा कायम आहे. टेक्नॉलॉजि आलेली असली तरी प्रेक्षकांना ते मान्य नाही. सवय झाली आहे त्यांना. अशात दीड हजाराच्या पब्लिकमध्ये शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज जाण्यासाठी लाऊड बोलावं लागतं. 

यात एक गोष्ट सांगू म्हणजे, माझी स्वरनलिका फाटली आहे. ज्यामुळे डॉक्टरने मला झाडीपट्टीत काम करायलाच मनाई केली आहे. कारण माझ्या धमण्या फाटल्या आहेत. जर मी असंच काम सुरु ठेवलं तर माझा आवाज कायमचा जाण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांआधीच मला सांगितलं आहे. तरी मी काम करत आहे. ओढच अशी आहे झाडीपट्टीची. प्रेक्षकांच्या टाळ्या नवीन उत्साह भरतो अंगात. 

कारण प्रेक्षक देखील इतका त्रास सहन करतात की विदर्भ म्हणजे भयानक थंडी. तरी अशा थंडीत लोक शाल, पांघरून घेऊन येतात घरून आणि बसतात अशा थंडीत. तेव्हा त्यांना बघून उभारी येते. इतकी गर्दी होते की तंबू देखील सगळा उघडावा लागतो. 

यात बसण्याची व्यवस्था देखील हटके असते. जमिनीत खड्डा खोदला जातो आणि तिथे खुर्च्या लावल्या जातात. तिथे पुरुष बसतात. तर वरती जो कट्ट्यासारखा भाग असतो तिथे स्त्रिया बसतात. आणि खड्ड्यातील मातीपासून स्टेज तयार होतं. मग त्यावर तंबू उभारला जातो. हा तंबू इतका उंच बांधतात की प्रत्येक कंपनीच्या ग्रुपमध्ये असा एक मुलगा घेतला जातो ज्याला उंचातील उंच झाड चढता येतं. कारण तिथे जाऊन तंबू बांधतात. 

यात बदल झालेच आहेत. मात्र अजूनही लाईट सोर्स बदलेला नाही. तो सीमितच आहे. कारण इतर नाट्यगृहांसारखी प्रशस्त जागा इथे नसते. अगदी १५ बाय १६ चा स्टेज एरिया असतो. म्हणून जागेच्या बंधनामुळे त्या हिशोबाने लाईट आणि सर्व गोष्टी परंपरागत रूपाने सुरु आहेत.

दिवाळीपासून सुरु होणारे प्रयोग गुढीपाडव्यापर्यंत सुरु असतात.

अनेक कलावंत फक्त याच वेळेतील कमाईवर उपजीविका करतात. त्यात गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा देखील फटका बसला आहे. अशात काही जण असेही आहेत जे इतरांच्या शेतात काम करून उपजीविका भागवतात. मात्र खरे कलावंत हा उपाय देखील टाळतात, ज्यांची संख्या जास्त आहे.

तिकीटबद्दल सांगायचं तर गाववाले लोक ते पैसे घेतात. त्यांनी तिकीट लावलेले असतात. कारण गाववाले कंपन्या विकत घेतात. त्यांचे प्रयोग फिक्स करून त्यानुसार ते तिकीट ठरवतात. मग यात गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे कोरोनाआधी बाल्कनीतील म्हणजे खुर्चीवरील प्रेक्षकांना १२० वगैरे तिकीट असायचं. तर वरती बसलेल्याना ५० च्या पुढे.

एका प्रयोगात चार लेडीज, ५ जेन्टस आणि वाजवणारे ३-४ जण असतात.

मी ७ वर्षांचा असताना झाडीपट्टीत काम सुरु केलं आणि आज माझं वय ५० च्या जवळ आहे. या वर्षांत प्रेक्षकांची आवडनिवड बदलली आहे. आधी प्रयोग सुरु होण्याआधी कधीच तालीम होत नसायची. कलाकाराला डायरेक्ट स्क्रिप्ट दिली जायची आणि ते ठरलेल्या वेळी येऊन आपला परफॉर्मन्स द्यायचे. कधीच चर्चा देखील होत नसायची.

अशात कधी चूक झाली. झापड जरी योग्यवेळी न जाता जरा उशिरा गेली. तरी काही हरकत नसायची. शिवाय प्रेक्षकांना प्रॉम्प्टर काही वाटायचं नाही आधी. त्याचा आधी आवाज यायचा मग कलाकाराचा. प्रेक्षक काही म्हणत नसायचे. 

मात्र आता प्रॉम्प्टर देखील प्रेक्षकांना नकोय. ‘पाठ करून आला नाही का’ असं म्हणतात. म्हणून अनेक कंपन्या तालीम करतातच. 

एकंदरीतच काय तर, झाडीपट्टी हा पूर्णतः प्रेक्षकांसाठीचा कलाप्रकार आहे. त्यांना जे हवंय तेच कलाकार इथे देतात, अगदी त्यांच्या शिव्या देखील खातात. का? कारण प्रेक्षक तितकं प्रेम या कलाकारांना देतात. खुलून त्यांना साद देतात. प्रेक्षक हाच झाडीपट्टीचा आत्मा आहे.   

म्हणून तर ‘मजुरी’  नाटकाच्या प्रयोगादरम्यान बीके काकांना दुसऱ्या कलाकाराने जोरात ढकलण्याचा सिन होता. तेव्हा इतक्या जोरात ढकलल्या गेलं की खाली पडल्याने त्यांच्या कमरेचं हाड तुटलं होतं. तरी ते आजही कार्य करत आहेत आणि आयुष्यभर करणार असं म्हणतात.

फक्त मराठी मंडळीच नाही तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना देखील या नाटकांनी पार वेड लावलं होतं. त्यांना मराठी भाषा समजत नसल्याने भाषांतरकाराची मदत घेऊन ते मराठीचे हिंदी, इंग्रजी भाषेत रूपांतर करून घ्यायचे. 

झाडीपट्टी नाट्यचळवळीचा सुवर्णकाळ १९३० ते १९६२ हा होता. त्यावेळी मालगुजार तसंच सधन शेतकऱ्यांमार्फत नाटकांचे खास आयोजन केले जायचे. मात्र १९९५ नंतर झाडीपट्टीच्या शास्त्रोक्त नाटकांना उतरती कळा लागली, जी काहीच काळ होती. २००२ नंतर ‘झाडीपट्टी रंगभूमी’ नव्या दमाने फुलारून आली.

झाडीपट्टीच्या प्रत्येक नाटकात मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन पेरलेलं असतं. विषयही तसेच अनेकविध असतात. दारू, व्यसन, पैशांचा हव्यास, स्त्रीवरील अत्याचार, अन्याय, नातेसंबंध, प्रेम, माणुसकी, मैत्री, देशभक्ती, समाजाप्रती बांधिलकी, नागरिकांचे कर्तव्य, दहशतवाद वगैरे वगैरे. 

झाडीपट्टी नाटकाचा उल्लेख ‘पडद्याचं नाटक’ असाही काही जणांकडून केला जातो. 

१९६० सालापर्यंत स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करायचे, तेव्हा नाट्यप्रयोगाला तिकिट नसायचं. प्रेक्षकच खुशीने पैसे द्यायचे. पण जेव्हापासून नाटकात स्त्रिया काम करू लागल्या तेव्हा त्यांना मानधन द्यावं लागलं. नाटकाच्या इतर खर्चांचे बजेटही वाढू लागले. म्हणून नाटकांना तिकिट लावणं भाग पडलं.

ल.कृ. आयरे, गणेश हिर्लेकर, कमलाकर बोरकर, आप्पासाहेब आचरेकर, के.डी. पाटील, हरिश्चंद्र बोरकर, रामू दोनाडकर, राजेंद्र बनसोड, सिद्धार्थ खोब्रागडे, बाबुराव मेश्राम अशा अनेक जुन्यानव्या लेखकांनी झाडीपट्टी रंगभूमीसाठी लेखन केलेलं आहे.

कलावंतांनी उभ्या केलेल्या या रंगभूमीने देखील हजारो कलावंत आजवर घडवले आहेत. 

“पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत झाडीपट्टी कोणत्याही बाबतीत कमी नाही. झाडीपट्टी ही कलावंत निर्माण करणारी फॅक्टरी आहे. अनेक दर्जेदार कलावंत तिने घडवले आहेत. मात्र, पार्श्वभूमीच्या अभावाने इथले स्थानिक कलावंत उपेक्षीत आहे. जर या कलावंतांना पार्श्वभूमीबरोबरच पुढे जाण्याची उभारी मिळाली तर पुणे-मुंबईच्या चंदेरी दुनियेतही झाडीपट्टीचाच डंका वाजेल”

असा विश्वास चित्रपट ‘मी सिंधुताई सपकाळ बोलतेय’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत बोपचे यांनी व्यक्त केला होता.

अशी ही रंगभूमी झॉलीवूडमधून पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. तेव्हा त्यांना हा समृद्ध वारसा कळावा म्हणून हा अट्टहास असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक तृषांत इंगळे यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. स्वतः तृषांत यांनी झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

‘झॉलीवूड’ या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

जर चित्रपट रिलीज होण्याआधी इतके पुरस्कार घेतोय आणि त्यातही तुम्ही आता झाडीपट्टीबद्दल खरेखुरे अनुभव वर बघितले आहे, तर तुम्हीच सांगा… हा कलाप्रकार मराठीसृष्टीसाठी प्रबोधनकारक आहे की नाही!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.