गांगुली-कोहलीच्या वादात आता चेतन शर्मामुळं नवा ट्विस्ट आलाय
गेल्या काही दिवसात भारताच्या क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होती, ती म्हणजे कॅप्टनशिप. तसा भारतीय क्रिकेटला कॅप्टनच्या निवडीवरुन होणाऱ्या राड्यांचा संदर्भ तसा नवा नाही. जेव्हा भारताची टीम आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली, तेव्हा प्लॅनिंगनुसार संघाचे कर्णधार होते पोरबंदरचे महाराज. पण ऐनवेळी सीके नायुडू यांच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आणि भारतीय संघ टेस्ट क्रिकेट खेळायला उतरला.
त्यानंतर, कधी सिनिअर-ज्युनिअर खेळाडूंमधला वाद, कधी फेल गेलेला कॅप्टन, कधी अचानक घेतलेली रिटायरमेंट असे अनेक किस्से भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले. पण या सगळ्या भाऊगर्दीत कॅप्टनसीवरचा एक पिक्चर सुपरहिट ठरला, तो म्हणजे विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातला.
दोन्ही कार्यकर्ते भारताच्या यशस्वी कॅप्टन्सपैकी एक. गांगुली आणि कोहलीमधला एक समान दुवा म्हणजे, आक्रमकता. दादानं भारतीय क्रिकेटला आक्रमकता शिकवली, समोर ऑस्ट्रेलिया असो किंवा पाकिस्तान. समोरच्यानं अरे केलं, तर का रे करायचंच हे दादानं टीममध्ये रुजवलं. युवराज, कैफ, भज्जी, झहीर, नेहराजी अशा अनेक भिडूंना घेऊन दादानं ताज्या दमाची टीम बनवली.
दादानंतर भारताचं नेतृत्व, द्रविड आणि धोनीनं सांभाळलं. दोघांचं क्रिकेट आक्रमक असलं, तरी स्वभाव मात्र एकदम बर्फाळ. त्यामुळं भारतीय टीमचा आक्रमक सूर काहीसा थंडावला होता. मात्र या रागानं पुन्हा एकदा पकड घेतली, ती विराट कोहलीच्या नेतृत्वात.
समोरच्या टीमनं अरे म्हणायची वाट न बघता, सध्याची भारतीय टीम डायरेक्ट नडते. ऑस्ट्रेलिया असुद्या, इंग्लंड असुद्या आपली टीम राडे करण्यात कमी पडत नाही. टीम कमी पडली, ती आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात. नुकत्याच पार पडलेल्या टी२० वर्ल्डकप आधी विराट कोहलीनं आपण टी२० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आणि तो त्या पदावरुन पायउतारही झाला.
पुढे साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघ घोषित झाला, तेव्हा कोहलीच्या जागी रोहित शर्माची निवड झाली असल्याचं घोषित करण्यात आलं. पुढे दौऱ्याआधीच्या पत्रकार परिषदेत विराटनं आपलं वनडे कर्णधारपद काढून घेण्याबद्दल आपल्याला दीड तास आधी सांगण्यात आलं, हे जाहीरपणे सांगितलं. सोबतच टी२० चं नेतृत्व सोडण्याचा आपला निर्णय हसत हसत स्वीकारण्यात आला, असंही तो म्हणाला.
त्याआधीच सौरव गांगुलीनं कोहलीला कॅप्टन्सी न सोडण्याबाबत सुचवलं होतं, असं सांगितलं. कोहलीचं वक्तव्य याच्या अगदी विरुद्ध होतं आणि त्यामुळे बीसीसीआयमध्ये फूट पडल्याच्या, कोहली आणि दादाचं पटत नसल्याच्या बातम्यांना उधाण आलं.
बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी आफ्रिकेच्या वनडे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्मा दुखापतीमुळं बाहेर असतानाही विराट कोहलीऐवजी केएल राहुलची कॅप्टन म्हणून निवड झाली. यावेळी शर्मा यांनी कोहली-गांगुली प्रकरणावरही मौन सोडलं.
ते म्हणाले, ‘वर्ल्डकप आधीच्या बैठकीदरम्यान विराट कोहलीनं अचानकच आपण नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली. आम्हा सर्वांसाठी हा धक्काच होता. बैठकीत उपस्थित असलेल्या आम्ही सगळ्यांनीच त्याला विनंती केली, की त्यानं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तिथे बीसीसीआयचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते, तुम्ही कुणालाही विचारु शकता.’
त्याचवेळी विराटला वनडे कर्णधारपदाबाबत का सांगितलं नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘तेव्हा वर्ल्डकप तोंडावर होता. असं काही सांगितलं असतं तर खेळावर परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही गोष्टींना वेळ दिला. टेस्ट मॅचच्या आधी तयारी करण्यासाठी आम्ही हा निर्णय जाहिर केला.’
आता चेतन शर्मांच्या या वक्तव्यामुळं या वादाला नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण शर्मांच्या म्हणण्यानुसार दोघांपैकी कोणतरी एक खोटं बोलतंय. कोहली नो कमेंट्स म्हणत विषयाला बगल देणार का अशी चर्चाही सुरु आहे. पण अजून काही दिवस टीमचा खेळ सोडून हे वादच चर्चेत राहणार हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- भारतीय क्रिकेटमधले सगळे राडे, विराट-रोहितच्या दोस्तीवर येऊन थांबतात
- कोहलीला एकमेव आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भिडू, टीम इंडियामध्ये पक्कं स्थान मिळवू शकला नाही
- पुढं जाऊन क्रिकेटचा देव ठरलेलं पोरगं, त्यादिवशी शून्यावर आऊट झालेलं