जीवात जीव असेपर्यंत कोकासंगीतावरच जगणार

एका हातात कोकासंगीत हे वाद्य, तर दुसऱ्या हातात झोळी अशा अवतारात कोल्हापूर आणि आस पासच्या गावात फिरणारा अवलिया म्हणजे शिवाजी गोसावी होय. केवळ अनुभवाच्या जीवावर समाजातील वास्तव्याचे चित्र उभं करत आपला उदरनिर्वाह करणारे शिवाजी मामा गेल्या पन्नास वर्षांपासून आपला छंद जोपासत आहेत. या छंदातूनच ते समाज प्रबोधनही करत आहेत.

कचरा, भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करणारी गोसावी समाजाची व्यथा.

उजाडल्यापासून दिवस मावळेपर्यंत कचऱ्यात फिरून दिसेल ते कचरा उचलून तो विकून त्यावर जगणारा हा गोसावी समाज. मात्र, याला फाटा देत शिवाजी गोसावी यांनी या संगीताच्या जीवावर आपला संसाराच गाडा चालवण्याचा निर्णय घेतला.

आपली संस्कृती, आपला अभिमान आपल्या छंदांद्वारे वाढवला. वयोमानामुळे त्यांना दृष्टीदोष आहे. मात्र, आजही विशीतल्या तरुणाला लाजवेल या स्पिरीटने ते गाणं गातात. वास्तवाचे भान आणि आपला छंद यांची सांगड घालत त्यांनी आपलं संपूर्ण कुटुंब या कोका संगीतावर उभे केले.

कोल्हापूरच्या महापुरचे हृद्यद्रावक चित्र मांडणारा हा पाळणा शिवाजी यांनी रचलाय. कोकासंगीताच्या आवाजावर त्यांनी हा पाळणा अनेक ठिकाणी सादर केला आहे.

दिला वाघानं दणका गं लई.. म्हाताऱ्या पावसाचा दणका ग लई..बाळा जोजो रे.

महापूर सोडलं गंगेला लई…येडा घातला चिखलीला बाई..

वर्दी कळालं मंत्र्यांना बाई बाळा जो जो रे…सरकारला इचार लई..

आंबेवाडी चिखली जगत न्हाई..बाळा जो जो रे…

 

कोणतेही शिक्षण नाही. घरी तर चार घर मागून खाण्याची परिस्थिती. तरीही गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन करणारे हे शिवाजी मामा ग्रामीण भागात प्रसिद्ध आहेत. वळीवडे, उचगाव यासारख्या गावात फिरून ते गाणी म्हणत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

त्यांच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही मात्र पोटाची आग त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

गोसावी समाजातील या कलाकाराला मानणारे अनेक लोक आहेत. वेळेप्रसंगी ते त्यांच्या मदतीला धावून येतात. कधीच कोणाकडे काहीच न मागता समोरील व्यक्ती देईल त्यावर खुश राहणारे शिवाजी मामा यांनी अनेक माणसे जोडली आहेत.

शिवाजी मामा केवळ हाच पाळणा नव्हे तर एखाद्याच्या नावावरून त्याच्या स्वभावावरून त्याचा पाळणा बनवतात. शिवाजी मामा रेणुका देवी, शिवाजी महाराजांचा पाळणा अशा धार्मिक कथा त्यांनी रचल्या आहेत. शिवाजी मामा कोल्हापूरच्या प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल नजीक झोपडपट्टीत राहतात. त्यांना मोबाईल वापरता येत नाही.

गेल्या तीन पिढ्यांपासून कोका संगीत आम्ही गात आहोत. मात्र, हे संगीत भविष्यात कुणी गाणार नाही, ते लोप पावेल याचं मला खूप दुःख होते.

पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी हे संगीत गाऊन भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करणार आहे.

अशी खंत शिवाजी मामा यांनी व्यक्त केली…

त्यांना शिवाजी मामा म्हणण्याचे कारण अस की, मी लहान असल्यापासून ते माझ्या घरी येतात. आजवर अनेक गाणी मी त्यांची ऐकली आहेत. अतीशय साधे जीवन व्यतित करणारा हा मामा आज वयाच्या 70 व्या वर्षीही तेच जीवन जगतो याच खर तर दुःख होत. आयुष्यभर मनोरंजन करून भिक्षा मागून झोपडीत राहूनही इतकी चांगली कला जोपासणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला माझा सलाम…

  • पूजा कदम

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.