कोकणात पुरासोबत इतर संकट देखील डोकं वर काढत आहेत…

मागच्या २ दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूणला पुराचा घट्ट विळखा पडला आहे. सोबतच सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे देखील पुराच्या छायेत आहे. मात्र पुरासोबतच कोकणात आता इतर संकटांनी देखील तोंड वर काढलं आहे.

यात सगळ्यात महत्वाचं संकट आहे ते म्हणजे आरोग्याचं. पूरपरिस्थितीमुळे सध्या लोकांच्या घरात पाण्यानं शिरकावं केला आहे. यामुळे अनेक बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पूराच्या पाण्यामुळे काही रोग तसंच आजार पसरू शकतात. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्याचप्रमाणे डेंग्यू आणि मलेरियाचा धोकाही नाकारता येत नाही.  

तर तिकडे महाड MIDC मधील कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली होती. विनती ऑरगॅनिक कारखान्यात आग लागली आहे. अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आधीच महापूराचं संकट असताना आता कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे महाडवासीयांवर दुहेरी संकट कोसळलं आहे.

पावसासोबतच भूस्खलन आणि दरड कोसळण्याचे देखील संकट आहे. रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे आतापर्यंत ७ बळी गेले आहेत. महाड, पोलादपूरमध्ये या भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. पुरात आणि भूस्खलनातं अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, नेव्हीचे बचावकार्य सध्या युद्धपातळीवर सुरु झाले आहे.

महाडच्या तळीये गावात कोसळलेल्या दरडीत ३२ घरं बाधीत झाली आहेत. ७२ लोक या दरडीत अडकले आहेत.

जवळपास ६ हजार प्रवासी विविध स्टेशनवर अडकले

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

मात्र सध्या रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर सुमारे ६ हजार प्रवासी अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असून तोपर्यंत या प्रवाशांची रखडपट्टी होणार आहे. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

एकूणच आधी निसर्ग चक्रीवादळ, पुन्हा पाऊस, महापूर या संकटामुळे कोकणकर हैराण झालेला असताना आता महापुरानंतरच्या संकटांनी देखील डोकवर काढलं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.