आज ४ दिवस झाले तरी अजून पंचनाम्याला तलाठी आलेला नाही : कोकणातील अवस्था

मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये थोडं साठवलेले पैसे आणि थोडं बँकेचं कर्ज असं मिळून घराचं २ वर्षापासून थांबलेलं बांधकाम पूर्ण केलं. पण परवाच्या वादळात रात्रीच्या वेळी दारातलं नारळाचं झाडं कौल फोडून घरात आलं. कर्ज फिटायच्या आत बांधलेलं घर मातीला मिळालं. हि आपबिती आहे कुडाळ तालुक्यातील विश्वनाथ देसाई यांची.

विश्वनाथ यांच्यासारख्या कोकण किनारपट्टीवरच्या शेकडो गावांमध्ये सध्या नुकसानीची अशीचं काहीशी परिस्थिती आहे. 

कोकण म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर नेहमीच अथांग पसरलेला सुंदर समुद्र, हिरवागार निसर्ग, रसाळदार हापूस आंबा. फणस, नारळ, काजू-सुपारीची झाडं, भाताची शेती असं सगळं काही येत. थोडक्यात कोकण नेहमीचा कसा बाप दिसत असतो. पण यंदा मात्र इथली परिस्थिती भयानक आहे, आणि ही भयानक परिस्थिती करण्यास जबाबदार ठरलं आहे

तौक्ते चक्रीवादळ

आज चक्रीवादळ पुढे सरकून ४ ते ५ झाले पण इथलं जनजीवन अजून देखील पूर्वपदावर आलेलं नाही. कोणाच्या घरावर झाड पडलेत, कोणाच्या जनावरांच्या गोठ्यांवर झाड पडून तिथं नुकसान झालं आहे, अनेकांच्या बोटी वाहून गेल्या आहेत.

याच सगळ्या ग्राउंडवरच्या परिस्थितीचा ‘बोल-भिडू’ने स्थानिकांशी बोलून घेतला आढावा…

आता आपल्या महाराष्ट्रातील कोकणची सुरुवात होते सिंधुदुर्ग पासून. म्हणून याच जिल्ह्यापासून सुरुवात केली. त्यासाठी ‘बोल भिडू’ने कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे रहिवासी आणि मागच्या बरेच वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करत असलेल्या नितीन गोलतकर यांच्याशी संपर्क साधला. 

गोलतकर यांनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं, पार धुळदाण झालीय ओ कोकणात. प‍ाहवत नाही लोकांच्या चेहर्‍यावर आणि त्यांच्या उघड्या पडलेल्या संसारावर. याआधी आम्ही अनेक वादळ बघितली पण यंदाचं वादळ खूपचं भीतीदायक होतं. आदल्यादिवशी सुरु झालेलं वादळ ३०-३५ तासांनंतर देखील कायम होतं.

वादळ पुढे सरकारल्यावर परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर जे चित्र बघायला मिळालं ते खूपचं भयानक होतं. अनेकांच्या घरावर दरातील मोठ्ठाली नारळाची आणि बाकीची झाड पडलेत, पत्रे उडून गेलेत. त्यामुळे त्यांचं छप्पर आणि संसार दोन्ही अक्षरशः उध्वस्त झालायं. अनेकांच्या गोठ्यांवर झाड पडून कोण्या जनावरांची पाठ मोडलीय, कोणाचा पाय मोडलाय. तर कोणाच्या गाडीवर झाड पडून त्याचं नुकसान झालं आहे. 

मच्छिमारांच तर होत्याच नव्हतं झालयं. त्यांच्या बोटी, होड्यांना तर जलसमाधीच मिळाली आहे. ज्यांची वाचली त्यांची बोट मोडून त्याची लाकडं पाण्यावर तरंगत आहेत. अनेकांची जाळी वाहून गेली आहे. ज्याच्या जिवावर जीवन जगायच असतं त्यानेच असा पाठिवरुन हात काढलाय.

लाईट तर आमच्याकडे अजून आलेली नाही, आणि अजून पुढचे ४ दिवस तरी येणार नाही, झाड पडल्यामुळे त्यांच्यासोबत लाईटचे डांब आणि वायरी तुटून पडलेत. मागच्या वादळात तर जवळपास २० दिवस लाईट आली नव्हती.

सरकारी मदतीचं तर कौतुक सांगावं तेवढं थोडं आहे. एक तर कोकणातील गाव लहान, त्यामुळे ३ ते ४ गावांना मिळून एक तलाठी. त्यामुळे पंचनामे सुरु होऊन पण आज ४ दिवसानंतर आमच्यापर्यत तलाठी पोहोचलेला नाही. ज्यांच्या पर्यंत पोहोचला त्यांचा वशिला चांगला होता असचं म्हणायचं.

एकदा तलाठी पोहोचला कि पंचनामे होतील, सातबार्‍यावरची नावं शोधली जातील आणि उध्वस्त झालेल्या झाडांचे ६०/७० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली जाईल. पण त्या ६०/७० रुपयांसाठी शेकडो हेलपाटे, शिवाय हातापाया पडावे लागेल ते वेगळचं. त्यामुळे भिक नको पण कुत्र आवर याचा प्रत्यय येईल. कारण नारळाचं नवीन झाड लावायचं म्हंटलं तर २०० रुपये खर्च येतो आणि नुकसान भरपाई मिळणार ६० रुपये.

घर आणि परिसरच नुकसान समजून घेतल्यानंतर कोकणचा सगळ्यात महत्वाचा दुसरा भाग म्हणजे इथली शेती आणि शेती मधला महत्वाचा घटक आंबा. या नुकसानीबद्दल समजून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावच्या मिथिलेश देसाई यांच्याशी संपर्क साधला.  

मिथिलेश यांनी अगदी सविस्तर शेतीचं कसं आणि काय नुकसान झालं याबद्दल सांगितलं. ते म्हणतात, कोकणची जवळपास सगळी शेतीचं मुळात फळांची. त्यामुळे राज्यातील इतर भागासारखी ही दोन ते तीन महिन्यांच्या पिकांसारखी शेती नसते.

कोकणात सिझन हा प्रकार प्रचंड महत्वाचा असतो. जो कि नोव्हेंबरनंतर जून पर्यंत असतो. आणि नेमकं याच काळात कोकणात आंब्याला २ वेळा फटका बसला.

पहिला फटका सुरुवातीलाच बसला नोव्हेंबरच्या अवकाळी पावसानं. त्यामुळे उत्पादनात इतर वर्षीपेक्षा तब्बल ७० टक्क्यांची घट झाली. परिणामी ज्या ५ डझन आंब्याची पेटी पुणे, मुंबईमध्ये २ हजार रुपये पोहोच मिळायची त्या पेटीचा दर ३ हजार ५०० रुपयांवर गेला होता. यात जसा ग्राहकाला तोटा होता तेवढाच तोटा शेतकऱ्यांना पण होता. पुढे बल्कमध्ये आंबा आल्यानं दर पुन्हा २ हजार ५०० पर्यंत खाली आले होते.

आता साधारण याच दरातील १५ मे नंतर बाजारात येणार आंबा शिल्लक होता. पण या वादळामुळे आणि पावसामुळे पूर्ण आंबा गळून पडला आहे, जवळपास संपल्यातच जमा आहे म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. आता यातून पण जर काही आंबा बाजारात आला तर त्याचा दर १ हजार ५०० यापुढे जाणार नाही. 

अगदी अशीच काहीशी अवस्था काजू बी ची आहे. आता सध्या काजू बी ला दर नसल्यामुळे अनेकांनी साठवणूक करुन ठेवली होती. पण आता ज्यांच्याकडे स्टोअरेज फॅसिलिटी नव्हती त्यांच्या पूर्ण मालाला पाणी लागलं, परिणामी आता मोईश्चर असलेलं बी कोणी घेणार नाही. २ ते ३ ऊन दिल्यानंतर त्यातला ओलावा कमी येईल पण पूर्वीचा दर नक्कीच भेटणार नाही.

फणसाला देखील वरुन पाणी लागल्यामुळे फळाची जी क्वालिटी मिळते ती मिळतं नाही. किनारपट्टी भागात गेल्यानंतर आपल्याला नारळ-सुपारीची झाड उन्मळून पडलेली दिसतील. त्यामुळे जवळपास सगळ्याच पिकांचं पूर्णपणे नुकसान झालं आहे हे नक्की. आता पुढच्या सिझनलाच कोकणातील शेती पुन्हा बहरेल अशी आशा आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारी मदतीची काय पावलं उचलणं आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या पत्रकार पंकज दळवी यांच्याशी संपर्क केला. ते म्हणतात, 

सध्या सरकारी पातळीवर पंचनामे सुरू आहेत, पण हे झाल्यानंतर मागच्या निसर्ग वादळावेळी ज्याप्रमाणे आपत्ती निवारण कायद्यामधील दुरुस्ती करून मदत करण्यात आली होती, तिचं लागू करण्याची सध्या आवश्यकता आहे. यात मग काही उदाहरण सांगायची झाली तर अन्न-धान्यसाठी ५ हजार भेटायचे ते १५ हजार पर्यंत वाढवलं होतं. कपड्यांसाठीची मदत वाढवली होती. अशीच मदत पुन्हा व्हावी.

सोबतच कोकणातील लागवड क्षेत्र निसर्ग व तौक्ते या दोन्ही वादळांमुळे बाधित झालेलं असल्याने १९९१ ची फलोद्यान लागवड योजना पुन्हा लागू करण्याची गरज आहे. त्याही पुढे जाऊन ही आपत्ती पूर्ण कोकणाने आपली समजून शासकीय धोरणांमधील आवश्यक बदलांसाठी आग्रही रहण्याची गरज आहे.

सध्या मदतीच्या बाबतीत सरकार कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने  दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांना संपर्क केला. त्यांच्याकडे दापोली आणि मंडणगड असे तालुके येतात. ते म्हणाले,

निसर्ग चक्रीवादळामध्ये या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, बऱ्यापैकी झाड पडली होती.  पण या वादळात जास्त नुकसान झालेलं नाही. ज्या गावांमध्ये नुकसान झालं आहे अश्या ६० ते ७० टक्के गावांचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित ३० ते ४० ज्या गावांमध्ये अद्याप पंचनामे झालेले नाहीत तिथले पंचनामे आज आणि उद्यापर्यंत पूर्ण होतील.

एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला वादळ असे संकट असलं तरी आमच्या विभागातील सगळ्यांचे लसीकरण झालं असल्याने काम व्यवस्थित सुरु आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.