बाळासाहेब होते म्हणून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल उभं राहू शकलं….

क्रिकेटर रिषभ पंतचा अपघात झाला, तो आयसीयूमधून बाहेर आला आणि त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनंही कोकिलाबेन हॉस्पिटलच्या बाहेरचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर शेअर केला, उर्वशी तिथं रिषभला भेटायला गेली होती का ? हा रिषभच्या प्रायव्हसीचा भंग आहे का ? अशा चर्चा एका बाजूला होत असताना, चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल.

मुंबईतील ७४७ बेड्सच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख. अनेक राजकारणी, क्रिकेटर, अभिनेते यांच्यापासून ते गरिबांपर्यंत सगळ्यांना एकाच छताखाली उपचार मिळण्याचं ठिकाण. इंट्रा ऑपरेटिव्ह एमआरआय सूट्स, EDGE रेडिओसर्जरी सिस्टीम, अशा अनेक सुविधा या हॉस्पिटलनं आशिया खंडात पहिल्यांदा उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे हॉस्पिटल जरी उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स एडीए या समूहानं बांधलं असलं तरी प्रत्यक्षात हे हॉस्पिटल उभं राहू शकलं ते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच.

२०१९ मध्ये हॉस्पिटलला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निम्मिताने जो कार्यक्रम झाला होता त्यात अनिल अंबानी यांनी ही आठवण सांगितली होती.

हे हॉस्पिटल बांधण्याची कल्पना तशी प्रसिद्ध हार्ट सर्जन दिवंगत डॉ. नितु मांडके आणि डॉ. अलका मांडके यांची. एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढण्याचं त्यांचं स्वप्न होतं. १९९९ मध्ये त्या दिशेनं तयारी देखील सुरु केली. 

मात्र, डॉ.नीतू मांडके यांच्या या स्वप्नाला २००३ मध्ये खीळ बसली. डॉ. मांडके यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे वर्सोवा, चार बंगला येथील जागेवर आता हॉस्पिटल कोण बांधणार हा मोठा प्रश्न होता. जवळपास २ वर्ष हे काम जैसे थे थांबलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांना कुठून तरी याबद्दल माहिती समजली.

बाळासाहेबांचे सर्वच क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध होते, यात सर्वपक्षीय राजकारणी तर होतेच पण उद्योगपती, अभिनेते, क्रिकेटर अशा क्षेत्रातील लोक देखील होते.

साधारण २००५ च्या दरम्यान बाळासाहेबांनी त्यावेळी उद्योग जगतात आघाडीवर असलेल्या अनिल अंबानी यांना मातोश्रीवर येण्यासाठी बोलावणं धाडलं. अनिल अंबानींना सुरुवातीला कशासाठी बोलावलं वगैरे याची कोणतीच कल्पना बाळासाहेबांनी दिली नाही, त्यामुळे अंबानी देखील काहीसे गोंधळले होते.

ज्यावेळी अंबानी मातोश्रीवर दाखल झाले, त्यावेळी बाळासाहेबांनी अंबानींना या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्यांना सांगितलं,

हा प्रकल्प तू हाती घे, चांगले हॉस्पिटल बांधशील यावर मला विश्वास आहे.

काही दिवस गेले तरी अनिल अंबानींनी यावर काहीच हालचाल केली नव्हती. अंबानींच मत होतं कि, हे हॉस्पिटल बांधणे तशी सोपी गोष्ट नव्हती. इतकी मोठी जबाबदारी पेलू शकेन की नाही याबद्दल आत्मविश्वास नव्हता. तसचं त्यांना वाटलं कि, बाळासाहेब देखील ही गोष्ट विसरले असतील.

मात्र बाळासाहेब ही गोष्ट विसरले नव्हते, यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना फोन केला आणि अनिल अंबानींना घेऊन पुन्हा मातोश्रीवर यायला सांगितलं आणि म्हणाले

“प्रकल्प हाती घे, कसलीही अडचण आली तरी मी पाठीशी आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन कळव.”

यानंतर मात्र अंबानीना दोघांचाही मान ठेवून हॉस्पिटल बांधण्याचा प्रकल्प हाती घ्यावाच लागला, त्यांनी हॉस्पिटल संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रकल्प आपल्या रिलायन्स एडीए समूहाच्या अखत्यारीत आणला, आणि अवघ्या ४ वर्षात तो पूर्णत्वास नेला. २००९ साली या सुसज्ज हॉस्पिटलच उदघाटन देखील झालं.

त्यावेळच्या उदघाटन भाषणात देखील अनिल अंबानी यांनी म्हटलं होतं की, 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे इतके मोठे हॉस्पिटल मी उभे करू शकलो.

२०१६ मध्ये अनिल अंबानी यांनी घोषणा केली होती की, ते रिलायन्स कँसर सेंटरच्या नावानं ग्रामीण महाराष्टात गरिबांसाठी १८ कॅन्सर केअर युनिटची स्थापना करणार आहेत, जे कि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्या नावानं चालवले जातील.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Pankaj says

    Balasheb Thakre he NAV khub mothe ahe. tyancha mule aj kokiala Ben hospital ahe.jar aj aj Balasaheb thakre jiwant aste tar Marathi jantela as bhiraw lagal nasta.doctor and hospital chi lut dambali asti.bas balasahebana ek phone ani Sagal thambhal asat

Leave A Reply

Your email address will not be published.