सगळ्या राड्यात कोल्हापूरकर खूषायत, परत एकदा मुन्ना Vs बंटी सामना बघायला मिळणार..!

तुम्ही विशाल भारद्वाजचा मकबुल पिक्चर बघितलाय का. त्यात एक डॉयलॉग आहे. पिक्चरमधला नसरुद्दीन शहा म्हणतो,

शक्ती का संतुलन बहुत जरूरी हैं संसार मैं…

काल रात्री जेव्हा धनंजय महाडिक राज्यसभेच्या निवडणूकीत विजयी अशी पाटी वाचली असेल तेव्हा कोल्हापूरच्या लोकांना आठवून हाच डॉयलॉग डोक्यात आला.

महाडिक जिंकले..महाडिक यांच्या घरात गुलाल लागला..

आत्ता कोल्हापूरात पुन्हा मुन्ना विरुद्ध बंटी सामना बघायला मिळणार.. आत्ता तुम्ही म्हणाल सामना आणि संघर्ष याची काय गरज आहे. विकासाच राजकारण झालं पाहीजे, तर भावांनो इतिहास सांगतो समजून घ्या मग कळल सामना बघायची एवढी उत्सुकता का आहे ते…

तर कोल्हापूरचं महाडिक कुटुंब म्हणजे एकेकाळी ३ पक्ष घरात ठेवून असलेलं कुटुंब.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात महाडकांच्या घरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडी असे ३ पक्ष आणि एक स्थानिक आघाडी होती. महादेवराव उर्फ आप्पा महाडिक हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार होते. तर त्याचवेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अप्पा महाडिकांचे पुतणे धनंजय उर्फ मुन्ना महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोल्हापूरचे खासदार झाले होते.

तर २०१४ मधेच अप्पा महाडिक यांनी आपला मुलगा अमल महाडिक यांना भाजपकडून आमदार बनविले होते. इतक्यावरच थांबल नाही तरआप्पा महाडिक यांची सून शौमिका महाडिक या भाजपकडूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या..

थोडक्यात काय तर २०१४ पर्यन्त कोल्हापूरात सबकुछ महाडिक होतं..

पण सबकुछ महाडिकमध्ये एकजण जोरात फाईट देणारा माणूस होता अन् तो म्हणजे सतेज ऊर्फ बंटी पाटील..

२०१४ ला मोदी लाट आली अन राजकीय समीकरण बदलू लागली. मोदी लाट असतानाच राष्ट्रवादीने कोल्हापूरातून मुन्ना महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली. अशा वेळी बंटी पाटलांनी सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला, तो म्हणजे मुन्ना महाडिकांना लोकसभेसाठी मदत करण्याचा. मुन्ना महाडिकांना खासदार बनवायला मदत करायची म्हणजे ते नंतर आपल्याला आमदारकीला मदत करतील.

मुन्ना महाडिक २०१४ ला मोदी लाट असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून खासदार झाले..

आत्ता पैरा फेडायची वेळ आली आणि दगा झाला. बंटीच्या विरोधात विधानसभेला अमल महाडिक यांना उतरवण्यात आलं. बंटी हारले आणि वासेपूर स्टाईल बदल्याचं राजकारण सुरू झालं.

बंटी पाटलांनी पहिला घाव घातला थेट अप्पा महाडिक यांच्या आमदारकीवर. विधानपरिषदेवर सलग १८ वर्ष निवडून जाणाऱ्या अप्पा महाडिक यांच्या विरोधात बंटी पाटील २०१५ निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत आमचं ठरलय ची घोषणा देवून बंटींनी मुन्ना महाडिक यांचा पराभव घडवून आणला. लगोलग २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आपला पुतण्या ऋतूराज पाटील यांना अमल महाडिक यांच्या विरोधात उभा करून अमल महाडिक यांचा पराभव घडवून आणला.

बंटी पाटलांनी २०१४ नंतर महाडिक यांच्या घरातल्या दोन आमदारकी, एक खासदारकी आणि सर्वात महत्वाच गोकुळ घालवलं…

२०१४ च्या विधानसभेच्या निकालानंतर कोल्हापूरात चर्चा होती ती बंटी संपल्याची.. मात्र जेव्हा त्यानंतर खासदारकी, आमदरकी, जिल्हा परिषद आणि गोकुळ गेलं तेव्हा कोल्हापूरात चर्चा सुरू झाली ती महाडिक संपल्याची…

पण राज्यसभेचा निकाल मुन्ना महाडिक यांच्या पथ्यावर पडलाय. तिकडं राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपचं काहीही होवो. पण हिकडं मुन्ना विरुद्ध बंटी हा सामना परत सुरू होणार याचा आनंद कोल्हापूरकरांना म्हणलो ते याचसाठी..

जाता जाता विशाल भारद्वाजच्या मकबुल सिनेमातलाच दुसरा एक डॉयलॉग सांगतो…या सिनेमात ओम पुरी म्हणतो,

आग के लिए पाणी का डर बनें रहेना चाहिए…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.