कोल्हापूरची लेक : भारतासाठी पहिला ऑस्कर मिळवणाऱ्या भानू अथैय्या यांच निधन

गांधी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ कॉस्च्युम डिझायनरचा ऑस्कर जिंकणाऱ्या भानू अथैय्या यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बोलभिडू मार्फत त्यांच्यावर यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेला हा लेख.

कोल्हापूरची दुसरी ओळख कलापूर अशी देखील आहे. छत्रपती शाहू महाराजांनी इथे अनेक सामाजिक शैक्षणिक सुधारणा केल्या त्याच प्रमाणे संस्थानात संगीत, गायन, नाटक, चित्रकला, शिल्पकला इ. कलाप्रकारांना प्रोत्साहन दिले.

याच काळात बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर या दोघांच्या प्रयत्नातून कोल्हापूरमध्ये चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली.

बाबुराव पेंटर यांनी अनेक दर्जेदार सिनेमे बनवले. त्यांच्याच मुळे मराठी फिल्मइंडस्ट्रीच मुख्यकेंद्र कोल्हापुरात आलं. गावात शेकडो सिनेमे बनू लागले, कलाकारांना तंत्रज्ञाना द्वार उघडले गेले.

कोल्हापूरकर दिग्गज कलाकारांनी जगभरात आपल्या कलेचा झेंडा रोवला.

यातीलच प्रमुख नाव म्हणजे भानू अथय्या!

भानू अथय्या यांचं खरं नाव भानुताई अण्णासाहेब राजोपाध्ये. करवीर छत्रपती घराण्याच पौरोहित्य त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेल. पण भानू यांचे वडील चित्रकलेतही पारंगत होते.

हाच वडिलांचा वारसा त्यांच्या निधनानंतर भानू यांनी पुढे चालवला. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातच झाले पण चित्रकलेतील आवड पाहून त्यांच्या आईने त्यांना मुंबईला पाठवलं.

तिथं जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये भानू यांनी प्रवेश मिळवला.

जगभरातील मॉडर्न आर्ट फॉर्मची ओळख भानू यांना जेजे मध्ये झाली. तिथं त्यांनी शेवटच्या वर्षात सुवर्णपदक मिळवलं.

इलेस्ट्रॅटेड विकली या सुप्रसिद्ध मासिकात भानूची फॅशन इलेस्ट्रेशन झळकू लागली. ती तरुणाईत प्रचंड फेमस झाली.

भानूच्या डिझाइन्सची प्रसिद्धी एवढी होती की,

त्या मासिकाने स्वतःच फॅशन बुटीक सुरू करून तिथे भानूने डिझाईन केलेले वस्त्रप्रावरणे विक्री साठी ठेवले जाऊ लागले.

अनेकदा इलेस्ट्रॅटेड विकलीमध्ये मॉडेलिंग साठी फिल्मस्टार येत असत, त्यातूनच फिल्मस्टार नर्गिस या भानूच्या डिझायनिंगमुळे प्रभावित झाल्या.

नर्गिसच्या आग्रहामुळे राज कपूरने भानू याना श्री.४२० या सिनेमाचे कॉश्च्युम डिझाईनचे काम दिले.

जुता जपानीवाल्या राज कपूरच्या ट्रंप कॅरेकटरला भानूने वेगळंच रुपडं दिल. लोकांनाही ते भावलं.

तिथून भानूचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून गेल. फॅशन डिझाईनच्या जागी फिल्मइंडस्ट्रीमध्ये कॉश्च्युम डिझाईनच काम त्यांनी सुरू केलं.

फिल्म इंडस्ट्रीशी त्यांचा संबंध कोल्हापूरात असल्यापासून आला होता.

लहानपणी एकादशी महात्म्य’ या सिनेमात त्यांनी बालकलाकाराचं काम केलं होतं. आता गुरुदत्त, राज कपूर, बी आर चोप्रा, यश चोप्रा अशा हिंदी सिनेमातील दिग्गजांसोबत त्यांनी काम करायला सुरुवात केली.

गुरुदत्त यांच्या सीआयडी पासून ते ‘साहिब, बीबी और गुलाम’पर्यंत देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘आम्रपाली’, शम्मी कपूर यांचा ‘ब्रम्हचारी’ इ. अनेक हिंदी चित्रपटांतून वेषभूषेचे काम केलं.

मध्यंतरीच्या काळात गीतकार सत्येंद्र अथैय्या यांच्याशी त्यांचं लग्न झालं व

भानू राजोपाध्येची भानू अथैय्या झाली.

हिंदी सिनेमासृष्टीतील सर्वात फेमस वेशभूषाकार म्हणून भानू अथय्या यांना ओळखलं जातं होतं.

भारतात वेशभूषेला ग्लॅमर आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

अशातच एकदा भानू याना इंग्लंडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ऑफिसमधून ऑडिशन साठी बोलवण्यात आलं.

रिचर्ड अ‍ॅटेनबरो आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाकांक्षी सिनेमा बनवत होते, “गांधी”

त्यांनी या सिनेमासाठी बरेचसे कलाकार हॉलिवूड मधून आणले होते मात्र पन्नास वर्षांपूर्वील भारतीयांचे राहणीमान, त्यांची वेशभूषा तंतोतंत उभरण्यासाठी भारतीय कॉस्च्युम डिझायनर लागणार हे त्याला ठाऊक होते.

अवघ्या 15 मिनिटाच्या भेटीमध्ये त्याने भानू अथय्या यांना फायनल केलं. गांधीजींचा जीवनप्रवास व काळानुरूप प्रदेशानुरूप बदलत गेलेल्या त्यांच्या वेशभूषा,सोबतच्या हजारो व्यक्तिरेखाचे कपडे  तो काळ उभा करण्यासाठी भानू अथय्या यांनी प्रचंड कष्ट घेतले, अभ्यास केला.

याचाच परिणाम म्हणून १९८२ सालचा वेशभूषेसाठीचा  ऑस्कर अवॉर्ड भानू यांना मिळाला.

जगातला हा सर्वोच्चं पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. साडी नेसून ऑस्कर अवॉर्ड स्वीकारणाऱ्या भानू अथैय्या चूल व मूल यात अडकून पडलेल्या भारतीय महिलेच्या स्वातंत्र्याच प्रतीक होत्या.

त्यांच्या यशामुळे भारतच नाही तर सगळं जग थक्क झाल होतं.

भानू अथय्या यांनी शेकडो सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझाईनचे काम केलं. ऑस्कर नॉमिनेशन मिळवणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांच्या लगान सिनेमाच्या वेशभूषा भानू अथय्या यांनी बनवल्या होत्या.

वयाची ऐंशी वर्ष उलटूनही त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत राहिल्या.

२०१२ मध्ये त्यांनी ऑस्कर देणाऱ्या अकॅडमीला आपला पुरस्कार परत केला आणि देशभरात खळबळ उडाली. पण भानू अथय्या यांनी स्पष्टीकरण दिल,

“आता माझं वय झालं आहे. ही ट्रॉफी सांभाळणे माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबाला शक्य नाही. सरकार सध्याचे सरकार किंवा वस्तू संग्रहालये देखील हे काम करू शकतील याबद्दल मला विश्वास नाही.  हा पुरस्कार गहाळ होऊ नये म्हणून मी हा पुरस्कार परत करत आहे.”

भारतातला हा पहिला ऑस्कर अवॉर्ड. आपल्यासाठी हा अमूल्य ठेवा. त्याचा सांभाळ करणे ही तेव्हाच्या सरकारची जबाबदारी होती पण त्यात ते अपयशी ठरले.

त्यांच्या उदासीनतेचा एक प्रकारे निषेध करत भानू अथय्या यांनी हा पुरस्कार परत केला.

त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पुढील पिढीस व्हावी यासाठी सरकारने त्यांचा ऑस्कर परत भारतात आणावा व कोल्हापुरातील वस्तू संग्रहालयात मानाने विराजमान करावा अशी मागणी अनेकजण करताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.