म्हणूनच १०० वर्षे जूनी कोल्हापूरची चित्रसृष्टी मुंबईच्या बॉलीवूडलासुद्धा पर्याय ठरू शकते.

कोल्हापुरच्या मातीत आणि पंचगंगेच्या पाण्यात कला नांदते अस म्हणतात. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नगरीमध्ये कलाकारांना खरी ओळख मिळवून दिली छत्रपती शाहू महाराजांनी ! त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला, शिक्षणाची संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली, धरणे बांधली, उद्योगधंदे सुरु केले, कुस्तीतले पहिलवान घडवले.

त्याच प्रमाणे संगीत, नाटक,चित्रकला, शिल्प, अशा कलाप्रकारांना व कलाकारांना सुद्धा प्रोत्साहन दिल.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला कोल्हापूरला एक परिपूर्ण सांस्कृतिक नगरी अशी ओळख मिळाली याला कारण ठरले शाहू महाराज. अस म्हणतात कि त्या काळी जर एखाद्या घरात चार मुले असतील तर त्यातील एक तालमीत, एक शेतात,एक नाटकात आणि जमलच तर एक शाळेत अस घरटी एक तरी माणूस कलेच्या क्षेत्रात असणार.

अशातच दोन चित्रकार बंधू फेमस होते. आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या मानापमान नाटकाच्या पडद्याच्या रुपान त्यांनी देदीप्यमान पराक्रम घडवला होता, त्यांचं नाव सर्वदूर झाल होत. मुंबईत त्यांनी विदेशी सिनेमे पाहिले. भारावून जाऊन आपण ही असच काहीस सुरु करायचं त्यांच्या डोक्यात बसल.

कोल्हापुरात त्यांनी प्रोजेक्टरवर सिनेमे दाखवण्यास सुरवात केली.

याच काळात मुंबईत दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय सिनेमा बनवला देखील. ते इंग्लंडातून तंत्र शिकून आले होते. त्यांच्या यशामुळे पेंटर बंधूनी आपला सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कोणतही पूर्वज्ञान नव्हत पण मुळचे चित्रकार,नेपथ्यकार, छायाचित्रकार त्यातून उपजत तंत्रबुद्धी यातूनच स्वतःचा कॅमेरा बनवायची तयारी सुरु केली.

शनिवार पेठेत महाराष्ट्र सिनेमाची सुरवात केली. उद्घाटनाला खुद्द शाहू महाराज आले होते. पेंटर बंधूनी केलेली सजावट पाहून त्यांनी त्याचं प्रचंड कौतुक केल पण सोबतच सल्ला दिला,

“अरे ही तुमची सजावट अंधारात काय दिसणार? हे सगळ वैभव पडद्यावर दिसू द्या की. सिनेमा अंधारात चालतो.”

शाहू महाराजांचे हे शब्द ऐकून आनंदराव व बाबुराव पेंटर जिद्दीला पेटले. अनंत खटपटीतून भारताचा पहिला स्वदेशी व्हिडीओ कॅमेरा बनवला. जवळजवळ सगळी सिद्धता झाली  पण तोवर दुर्दैवाने आनंदराव पेंटर यांचं अकाली निधन झालं. मात्र बाबुराव पेंटर मागे हटले नाहीत. पैशाची प्रचंड अडचण होती पण सुप्रसिद्ध गायिका तानीबाई कागलकरांनी भांडवल दिल.

 १ मे १९१९ रोजी पॅलेस थिएटरमध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरु केली. कोल्हापुरातल्या मातीत चित्रपटाचे बीज रोवले.

सैरंध्री हा कलात्मकदृष्ट्या नितांत सुंदर सिनेमा बनवला. हा चित्रपट एवढा गाजला की त्यातील काही सीन पाहून चिडलेल्या इंग्रज सरकारने त्याकाळी सिनेमासाठी सेन्सॉरशिप सुरु केली. बाबुराव पेंटर यांनी अनेक प्रयोग केले.

त्याकाळी पहिल्यांदाच आउटडोरला शूट करून सिंहगड हा सिनेमा बनवला, सावकारी पाश सारखा सामाजिक विषयावर तयार  झालेला सिनेमा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड होता.

बाबुराव पेंटर यांनी व्ही.शांताराम, बाबुराव पेंढारकर, फत्तेलाल, दामले, मास्टर विनायक असे अनेक कलाकार घडवले.

या सगळ्या सिनेमाच शुटींग कोल्हापूर, पन्हाळा परिसरात व्हायचं. यातूनच अनेक तंत्रज्ञ, अभिनेते, संगीतकार, वेशभूषाकार कोल्हापुरात उदयास आले. मुंबई नंतर भारतात कोल्हापूर हेच सिनेमानिर्मितीच सर्वात मोठ केंद्र बनलं, यामुळे कानाकोपऱ्यातून कलाकार कोल्हापूरला येऊ लागले.

अशातच कोल्हापूरच्या चित्रपटउद्योगाला पहिला धक्का बसला प्रभातमुळे.

महाराष्ट्र सिनेमातून वेगळ होऊन या व्ही शांताराम, फत्तेलाल, दामले या तरुणांनी स्वतःची प्रभात नावाची फिल्म कंपनी सुरु केली होती. त्यांनी पुण्यात मोठी जागा घेऊन तिथे सर्वगोष्टीनी संपन्न असा प्रभात स्टुडीओ उभारला. मुंबईपासून जवळ अंतर असल्यामुळे त्यांना याचा फायदा देखील झाला.

कोल्हापूरला स्पर्धा देण्यासाठी मराठी मध्ये दुसरे सिनेमाकेंद्र उदयास आले होते.

पण कोल्हापूर तोवर तंत्र व इतर बाबतीत प्रचंड पुढे पोहचले होते. अनेक प्रयोग होत होते. अनेक फिल्म कंपन्याची सुरवात झाली होती. खुद्द छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर सिनेटोनची निर्मिती केली होती.

प्रभातमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी शाहू महाराजांची कन्या व राजाराम महाराजांच्या भगिनी श्रीमंत राधाबाई अक्कासाहेब यांनी रंकाळ्याच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकर जागा घेऊन तिथे शालिनी सिनेटोनची सुरवात केली.

श्रीमंत अक्कासाहेब यांनी बाबुराव पेंटर यांच्याकडेच शालिनी सिनेटोनची जबाबदारी दिली होती.

कोल्हापूरच्या संस्थानिकांनी दिलेल्या राजाश्रयामुळे भालजी पेंढारकर यांचा जयप्रभा स्टुडीओ, व्ही.शांताराम यांनी स्वतंत्र झाल्यावर सुरु केलेला राजकमल स्टुडीओ असे अनेक सिनेकंपन्या कोल्हापुरात दर्जेदार सिनेमे बनवत होत्या. अशातच गांधीहत्येनंतर भालजी यांचा स्टुडीओ जाळला गेला मात्र कोल्हापूरची फिल्म इंडस्ट्री नव्याने आपल्या पायावर उभी राहिली.

चंद्रकांत सुर्यकांत या बंधूंना घेऊन भालजी पेंढारकर यांनी शिवचरित्राशी जोडलेले व मराठेशाहीचा इतिहास सांगणारे अनेक सिनेमे बनवले. ऐतिहासिक सिनेमे बनवण्यासाठी उभारलेले सेट पाहून हॉलीवूडचे तंत्रज्ञ देखील अचंबित राहत होते.

स्वातंत्र्यानंतरही कोल्हापूरची फिल्मइंडस्ट्री वाढत राहिली. 

मराठीत त्यांनी अनेक प्रयोग केले. जवळपास प्रत्येक मराठी सिनेमा कोल्हापुरात बनत होता. फक्त मराठीच नाही तर अनेकदा हिंदी फिल्मइंडस्ट्रीच शुटींग सुद्धा कोल्हापुरात होत होतं. कोल्हापूरमध्ये अतिशय कमी खर्चात उपलब्ध होणारे निसर्गरम्य लोकेशन्स, तांत्रिकदृष्ट्या मुंबईच्या तोडीचे कलाकार, तंत्रज्ञ यामुळे जागतिकदर्जाचे सिनेमे इथे बनत होते.

यातूनच कल्पना आली की मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीप्रमाणे कोल्हापुरात देखील चित्रनगरी सुरु केली जावी,

चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध असणार होत्या. प्रचंड खर्च वाचणार होता. अनेकांना रोजगार देखील मिळणार होता. जगभरात मोठे मोठे फिल्मसिटीचे प्रयोग झाले होते त्याच धर्तीवर कोल्हापुरातही फिल्मसिटी व्हावी ही मागणी सुरु झाली. चित्रनगरीइन्स्टीट्युट नावाची संस्था स्थापन करून हे आंदोलन सुरु करण्यात आले.

दिग्दर्शक अनंत माने, द.स. अंबपकर, चंद्रकांत, सुर्यकांत, आय बारगीर, सुभाष भुरके, वसंत शिंदे, शंकर सावेकर यांचा यात प्रमुख सहभाग होता. 

पण मध्यंतरीच्या काळातील राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती न दाखवल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकत नव्हता. अखेर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनल्यावर या कामाला प्रगती मिळाली. त्यांनी कोल्हापूर जवळील मोरेवाडी येथे ७७ एकर जमीन शासनाने खरेदी केली व कोल्हापूर चित्रनगरी कॉर्पोरेशन या संस्थेची निर्मिती केली.

२५ सप्टेंबर १९८४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मोरेवाडीच्या माळावर कोल्हापूर चित्रनगरीचा नारळ फोडला.

पुढे राजकीय स्थित्यंतरे झाली, वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कोल्हापूरची चित्रनगरी उभी राहण्यास १९९० हे साल उजाडले. सुरवातीला तिथे जोरदार शुटींगही सुरु झाली, मात्र आधुनिक यंत्रसामुग्रीची कमतरता, शासकीय पातळीवर झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे कोल्हापूर चित्रनगरी हळूहळू बंद झाली.

जागतिकीकरणाच्या नंतर भारतीय सिनेमात अनेक बदल झाले, अनेक नवे तंत्रज्ञान येऊ लागले पण पूर्वीचा राजाश्रय उरला नसल्यामुळे कोल्हापूर या स्पर्धेतून मागे पडले. मध्यंतरी कलासक्त मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चित्रनगरीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी प्रयत्न केले पण वांरवार होणार्या नेतृत्व बदलामध्ये याचा पाठपुरावा झाला नाही.

याच वेळी हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीसारखे नवे ऑप्शन उभे राहिले. हिंदी मराठी निर्मात्यांनी  कोल्हापूर ऐवजी वाई सारख्या ठिकाणी ग्रामीण लोकेशन म्हणून शुटींग साठी प्राधान्य देण्यास सुरवात केली.कोल्हापुरातील इतर स्टुडीओदेखील काळाच्या ओघात बंद पडले,

नुकतीच कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला १००वर्षे झाली. रया गेलेल्या इमारती, तुटलेले गेट याच्या स्वरुपात तिच्या गत वैभवाचे साक्षीदार जागोजागी उभे आहेत.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळातील अर्थसंकल्पात दहा कोटींचा निधी चित्रनगरीसाठी जाहीर केला होता. या रकमेतून पाटलाचा वाडा, न्यायालय, दवाखाना, कारागृह आणि चित्रीकरणासाठीचा मोठा हॉल अशा काही वास्तूंची निर्मिती झाली. पण काहीना काही कारणास्तव हे सर्व काम रखडत गेले.

आजही कोल्हापूर चित्रनगरीत शुटींग साठी ३२ लोकेशन्स तयार आहेत. 

गेल्या काही महिन्यापासून कोव्हीड१९ व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तर कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा तर कणाच मोडून गेला आहे. सर्व ठिकाणी शुटींग थांबले आहे. सिनेमागृह बंद असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

अशावेळी कोल्हापूर हा कमी खर्चात दर्जेदार सिनेमा निर्मितीसाठी पर्याय ठरू शकतो. फक्त सिनेमाच नाही तर कोल्हापूर व परिसरात टीव्ही सिरीयल, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म यांचे नवीन शुटींग करता येते. मुंबईच्या चित्रपटसृष्टीला तोडीस तोड चित्रनगरी असल्यामुळे हे सहज शक्य आहे फक्त गरज आहे त्या दृष्टीने प्रयत्नाची.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.