शालिनी पॅलेस मध्ये भूतय ते लक्ष्मीपुरीतला टांगेवाला, कोल्हापूरात वर्षभर चालू असतात या अफवा.

पुरेपूर कोल्हापूर, भरपूर कोल्हापूर, लय भारी कोल्हापूरी. वगैरे वगैरे वगैरे. कोल्हापूरकारांची गोष्टच वेगळी असते हे आत्तापर्यन्त जगजाहिर झालं आहे. कोल्हापूरकरांच कौतुक करून पुन्हा त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात अर्थ देखील नाही. आत्ता आज आहे एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल करायचा दिवस. थोडक्यात गंडवागंडवीचा दिवस. या जगात एकमेकाला टोप्या घालायला देखील एक दिवस राखून ठेवला जातो म्हणजे बघा आपण किती पुढारलेले आहोत.

पण कोल्हापूरात तस नसतय. कोल्हापूरात प्रत्येक दिवस गंडागंडवीचा असू शकतो. म्हणजे अगदी मनापासून एखाद्याची माप काढण्यात कोल्हापूरचे गडी पटाईत असतात. त्यातून काही अफवा गावभर होतात. लोकं त्या अफवा हळुहळु खऱ्या मानतात. मग हे खरच आहे वो अस अस्सल कोल्हापूरकरांच देखील मत होतं.

असो, तर या पवित्र दिवशी आपण पाहूया कोल्हापूरात कोणत्या अफवा आहे.

१) शालिनी पॅलेसमध्ये भूतय. 

1931 ते 1934 या काळात कोल्हापूरात शालिनी पॅलेस बांधण्यात आला. ज्यावेळी श्रीमंत शालिनीराजे कोल्हापूरचे राजे झाले तेव्हा हा शालिनी पॅलेस बांधला म्हणून त्याच नाव शालिनी पॅलेस. शालिनी पॅलेस आहे तो रंकाळ्याच्या शेजारी. काळ्या दगडांमध्ये असणारी ही वास्तू. सर्वात वरती घड्याळ. आजूबाजूला बदामाची झाडी. आणि पोर्णिमेच्या रात्री शालिनी पॅलेसच रंकाळ्यात दिसणारं प्रतिबिंब. म्हणजे थोडक्यात खूपच रोमॅन्टिक गोष्ट झाली.

पण झालं अस की कोल्हापूरात सांगतात या पॅलेसमध्ये भूत आहे. भूत नेमकं बाईचं की बाबाचं हे माहिती नाही. फक्त भूत आहे एवढं नक्की. त्यात देखील गर्दीच्या ठिकाणी एकदम शांत असणारी वास्तू म्हणून इथल्या अफवा जास्त पसरल्या. कोल्हापूरात नवीन माहिती घेवून येणारा माणूस हळुच कुठं काय दिसतय का याचा शोध देखील घेतो. जून्या काळात भूताटकीच्या वाड्याच शूट करण्यासाठी देखील हा शॅलिनी पॅलेस वापरला गेला. आत्ता खरं काय तर भूत नसतय वो. उगी टेपा मारून कोल्हापूरात नव्यानं आलेल्या माणसांना भ्या दाखवण्याचे धंदे करु नका इतकच.

२) पहिल्यांदा डबल डेकर चालू झाली तेव्हा ती भवानी मंडपात अडकून बसलेली.

खर सांगायचं तर आमची पिढी नव्वदची. ठराविक काळ सांगता येत नाही पण वडिलधाऱ्या माणसांकडून सांगितलेला हा किस्सा वरचेवर चर्चेत असतो. कोल्हापूर शहरात पसरलेली ती सर्वात मोठी अफवा होती असही सांगतात. झालेलं अस की, कोल्हापूरात नुकतीच डबर डेकर बस सेवा सुरू करण्यात आली होती. अगोदर भवानी मंडपातून बस जायच्या. महाद्वाराला बस आली आणि अडकून बसली. भल्याभल्याने ती अफवा गावभर पसरवली आणि सगळा गाव बस बघायला इथे गोळा झाला अशी हि अफवा. पुढे काय. तर पुढे काहीही नव्हतं.

Screenshot 2019 03 31 at 1.11.48 PM
हे महाद्वार याच्यात डबल डेकर बस अडकलेली अशी अफवा पसरली होती.

३) लक्ष्मीपुरीत टांगेवाल्याचं भूत हाय. 

सिनीयर सिटीजन कडून सांगण्यात येणारी अजून एक अफवा म्हणजे लक्ष्मीपुरीतल्या टांगेवाल्या भूताची. त्या काळात टांगे होते. आणि रात्रीच्या वेळी लक्ष्मीपुरीत एक म्हातारा टांगेवाला असायचं. त्या टांग्यात बसंल की तो आपल्याला घेवून जायचा. लक्ष्मीपूरीच्या कोपऱ्यावर आलं की टांगेवाल्याचे दोन्ही पाय मोठ्ठे व्हायचे.

तो सरळ एका झाडावर जावून बसायचां. आणि टांगा तसाच पुढं. जरा पुढं गेल्यावर घोडा पण गायब व्हायचा आणि माणूस बेशुद्ध होवून पडायचा. यामुळे विशेष काही झालं नाही पण तत्कालिन परिस्थितीत टांगेवाल्यांचा बिझनेस बुडाला असणार एवढं नक्की.

४) वडिंग्याचे येडे. 

कोल्हापूरातले शहाणे आजही वडिंग्याचं येडं हा शब्द वापरतात. नुकतच अलिबागच्या कोर्टाने अलिबागसे आऐला हैं क्या म्हणायला बंदि घातली आहे. तसच एकदिवस वडिंग्यास्न आलयस काय? म्हणायला देखील बंदी येणार आहे. तर विषय असा आहे की वडिंगे हे कोल्हापूरला खेटूनच असणारं नदीपलीकडं गावं.

कोल्हापूरात लाईटी सर्वात पहिला महाराजांच्या न्यू पॅलेसवर आल्या म्हणून सांगितलं जातं. एका रात्री टेस्टिंग म्हणून पहिल्यांदा न्यू पॅसेलमध्ये लाईटी लावण्यात आल्या. न्यू पॅलेस रात्रीच्या अंधारात चमकत असलेलं बघून वडिंग्याचा साध्याभोळ्या लोकांना वाटलं की न्यू पॅलेसला आग लागली. माणसं मिळेल त्याच्या पाणी घेवून न्यू पॅलेसची आग विझवायची म्हणून दारावर आले.

शाहूराजे बाहेर आले. प्रेमानं आणि काळजीपोटी आलेल्या या लोकांना लाईट असल्याचं सांगितलं. त्यांना जेवण दिलं. रात्री प्रेमापोटी आलेल्या या लोकांमुळे शाहूराजे गहिरवरले. असा किस्सा सांगितला जातो. हा किस्सा किती खरा किती खोटा हे इतिहासतज्ञांनाच माहिती पण सांगणारे हि अफवा होती असच सांगतात. पण या अफवेमुळे वडिंग्याचं येडं हि म्हण मात्र रुढ झाली हे नक्की.

तर हे असलं अफवांच कोल्हापूर. कोल्हापूरकरांसाठी रोजचाच दिवस एप्रिल फूल असतोय. तुमच्या गावात अशा अफवा असल्या तर पाठवा लिहून. आम्ही काय हितं छापायलाचं बसलोय !!!

1 Comment
  1. Allu says

    1 number…. Lai bhari mahiti dili rao..

Leave A Reply

Your email address will not be published.