शेतकरी संघटनेची बिजं रत्नाप्पा कुंभारांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये दडली आहेत.

आज कॉमर्स शिकतोय हे ऐकलं की, समोरच्या व्यक्तीला विशेष असं काही वाटेल असं नाही. म्हणजे तस या शाखेचं एवढं सामान्यीकरण झालं आहे. पण साठच्या दशकात महाराष्ट्रात तशी परिस्थिती अजिबात नव्हती. म्हणजे ग्रामीण भागात तर अशाप्रकारचं शिक्षण घेणं म्हणजे कुठं तरी बॅरिस्टर झाल्यासारखी परिस्थिती होती.

कॉमर्सच शिक्षण देणारी सगळी कॉलेज शहरातच असायचीत. पण कोल्हापूर त्या काळात नवा प्रयोग करायचं ठरवलं गेलं. म्हणजे जिथं कॉमर्स हा शब्दच खूप मोठा होता तिथं त्याच स्पेशल कॉलेज काढण्याचं धाडस दाखवलं होत देशभक्त रत्नाप्पा कुंभारांनी.

निमशिरगावच्या ‘भरमू’ कुंभाराने ज्या जिद्दीने आपल्या पोराला शिकवलं होत, त्याच या जिद्दी पोरानं म्हणजे देशभक्त रत्नाप्पा कुंभारांनी कोल्हापुरातल्या गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडं उघडी व्हावीत याच उद्देशाने कॉलेज काढायचा निर्धार केला होता. किंबहुना कोल्हापुरातल पहिलं कॉमर्स कॉलेज सुरु करणे हा त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न होता.

कोल्हापूरातलं हे पहिलं वहील कॉमर्स कॉलेज कस सुरु झालं आणि त्या कॉलेजात शिकवायला शेतकरी चळवळीचे उद्गाते खुद्द शरद जोशी कसे आले त्याचाच हा किस्सा आहे. 

कोल्हापूरचे प्रसिद्ध काँग्रेस नेते व सहकार महर्षी रत्नप्पा कुंभार यांच्या आधिपत्याखालील लीगल एज्युकेशन सोसायटीने हे महाविद्ययालय सुरु केले होते.  रत्नप्पा कुंभार यांनी कॉलेज सुरु करण्याची सर्व व्यावहारिक जबाबदारी प्राचार्य या नात्याने प्राचार्य भणगे यांच्यावर सोपविली होती. जो कोणी येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाईल या तत्वावर या कॉलेजची सुरुवात झाली.

कारण कॉमर्स कॉलेज हा प्रकारचं कोल्हापुरात प्रथम सुरु होत होता. साधारण त्यावर्षात शे सव्वाशे विद्यार्थी दाखल झाले होते. त्यातले काही वयाने बरच मोठे बारीक सारीक नोकऱ्या करणारे होते. त्या सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणून कॉलेजची वेळ सकाळी साडेसात ते सडे दहा अशी ठेवली गेली.  कॉलेज प्रत्यक्ष सुरु होईस्तोवर ऑगस्ट महिना उजाडला. कोल्हापुरातील बिंदू चौकातील तोफखाना बिल्डिंग नावाची एक जुनाट लांबलचक कौलारू इमारत होती. तिथेच हे कॉलेज भरू लागले. इमारतीच्या आवारातच एक भले मोठे डेरेदार वादाचे झाड होते. व त्याची सावली सगळे कॉलेज कवेत घेणारी होती.

अशा या नव्या कॉलेजसाठी कोल्हापुरात प्राध्यापक मिळणे अवघड होऊन बसले होते. कशीबशी प्राचार्य भणगे यांनी सगळी जुळवाजुळव केली. या कॉलेजात एन. व्ही शिवांगी नावाचे बेळगावला व्यवसाय करणारे चार्टड अकाउंटंट, स्वतः प्राचार्य भणगे, शरद जोशी व एम व्ही कुलकर्णी असे चार जण शिकवत.

पण शरद जोशी या कॉलेजवर मुळात शिकवायला येणारच नव्हते. 

त्याकाळी मुंबई आणि पुण्यापलीकडच्या ग्रामीण महाराष्ट्रात उच्चशिक्षणाचे प्रमाण कमीच होते. कॉमर्स शाखेला तसाही वाव कमीच असायचा. त्यामुळे कोल्हापूरसारख्या ठिकाणी एखादे कॉमर्स कॉलेज सुरु करणे हि कल्पनाच जोशींना हास्यास्पद वाटली. पण तिथले प्राचार्य भालचंद्र भणगे स्वतःच पूर्वी सिडनहॅममध्ये शिकवत होते व जोशी त्यांचेच एक विद्यार्थी होते. केवळ हे कॉलेज सुरु करण्यासाठी म्हणून प्रा. भणगे यांनी आपली मानाची नोकरी सोडली होती. अशा आपल्या गुरूंना नकार देणे जोशींना अवघड होऊन बसले होते.

त्यात आणि जोशींना कायम व्याख्याता म्हणून नोकरी करायची नव्हती. प्रश्न फक्त स्पर्धापरीक्षा आणि त्यानंतरच्या मुलाखतीचा होता. कोल्हापूर मधून प्रा. भणगे यांचा प्रस्ताव यायच्या आधी जोशींना मुंबई विद्यापीठात व्याख्याता पदासाठी अर्ज केला होता. तिथून काहीच उत्तर न आल्याने आणि कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेज सुरु होणार असल्याने त्यांनी कोल्हापुरात शिकवायला होकार कळवला.

पण पुढं एक पेच निर्माण झाला. कोल्हापूरातलं कॉलेज सुरु होऊन जेमतेम दोन तीन दिवस झाले असतील आणि अचानक मुंबई विद्यापीठातील तीन व्याख्याते पदासाठी निवड झाल्याच्या तीन तारा त्यांना एकाच दिवशी मिळाल्या. कुठलं पद स्वीकारायचं हा निर्णय विद्यापीठाने त्यांच्यावर सोपवला होता. जोशी ह्यांची पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती झाली. जोशींना सोडून जायचा बराच मोह झाला. पण भणगेंनी पुन्हा काकुळतीने मनधरणी केली. मुंबई विद्यापीठाला तुमच्यासारखे इतर अनेक व्याख्याते मिळतील पण आम्हाला इथं माणसं मिळवणं खूप अवघड झालं आहे. एकदा तुम्ही इथं यायचं कबुल केल्यावर व त्या भरवश्यावर आम्ही कॉलेज सुरु केल्यावर तुम्ही आम्हाला असं मध्येच सोडून जाणं अन्यायाचं होईल. नैतिकदृष्ट्या त्यांचं म्हणणं बरोबरच होत. शेवटी जोशींनी कोल्हापुरातच राहायचा निर्णय कायम केला.

शरद जोशी  जेमतेम एक वर्ष कोल्हापुरात राहिले. पण त्यांना शेतकऱ्यांच्या पोरांना खूपच जवळून बघता आलं.  याविषयी ते ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र’ या लेखात लिहितात,

पिढ्यानपिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठी आले नव्हते. महाविद्यालयचा परिस अंगाला लागला तर शेतीच्या खात्याऱ्यातुन सुटू या आशेने ते आले होते. एखाद्या पुढाऱ्याची मुलं सोडल्यास वसतिगृहात मुलांना ठेवण्याची शेतकरी आई बापाची परिस्थिती कधीच नसते. बिचारे इकडे तिकडे उसनवार करून आणि अक्षरशः आपलं पोट आवळून घेऊन पोरांना वसतिगृहात ठेवतात. पण त्यांच्या मुलांची वसतिगृहात काही कमी कुचंबणा होत नाही. पुढाऱ्यांच्या आणि शहरातल्या मुलांच्या सामानाचा झगमगाट पाहून त्यांचे डोळे दिपुनच जातात. थंडी वाजू नये म्हणून आईने बळेच दोन गोधड्या दिलेल्या असतात. घरी एक कमी पडत असूनसुद्धा………. आणि पुढं बरंच काही शरद जोशी या पत्रात लिहितात.

शेतकऱ्यांच्या पोरांचं दुःख जवळून पाहण्याची संधी शरद जोशींना मिळाली ती फक्त आणि फक्त कॉमर्स कॉलेजमुळे. आणि कदाचित शेतकऱ्यांविषयी आत्मीयता वाटून शेतकरी संघटनेचा एवढा मोठा लढा उभारण्यासाठी जी ठिणगी पडावी लागते ती सुद्धा इथंच पडली असावी….कदाचित.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.