पुण्याच्या प्रभात फिल्मला टक्कर देण्यासाठी कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ उभा राहिला

कोल्हापुरच्या मातीत आणि पंचगंगेच्या पाण्यात कला नांदते अस म्हणतात. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नगरीमध्ये कलाकारांना खरी ओळख मिळवून दिली छत्रपती शाहू महाराजांनी ! 

त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला, शिक्षणाची संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली, धरणे बांधली, उद्योगधंदे सुरु केले, कुस्तीतले पहिलवान घडवले. त्याच प्रमाणे संगीत, नाटक,चित्रकला, शिल्प, अशा कलाप्रकारांना व कलाकारांना सुद्धा प्रोत्साहन दिल.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला कोल्हापूरला एक परिपूर्ण सांस्कृतिक नगरी अशी ओळख मिळाली याला कारण ठरले शाहू महाराज. अस म्हणतात कि त्या काळी जर एखाद्या घरात चार मुले असतील तर त्यातील एक तालमीत, एक शेतात,एक नाटकात आणि जमलच तर एक शाळेत अस घरटी एक तरी माणूस कलेच्या क्षेत्रात असणार.

या कोल्हापूर नगरीत दोन चित्रकार बंधू फेमस होते. आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर. 

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या मानापमान नाटकाच्या पडद्याच्या रुपान त्यांनी देदीप्यमान पराक्रम घडवला होता, त्यांचं नाव सर्वदूर झाल होत. यातूनच बाबुराव पेंटरांनी कोल्हापुरात १ मे १९१९ रोजी पॅलेस थिएटरमध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरु केली. बाबुराव पेंटर यांनी व्ही.शांताराम, बाबुराव पेंढारकर, फत्तेलाल, दामले, मास्टर विनायक असे अनेक कलाकार घडवले.

या सगळ्या सिनेमाच शुटींग कोल्हापूर, पन्हाळा परिसरात व्हायचं. यातूनच अनेक तंत्रज्ञ, अभिनेते, संगीतकार, वेशभूषाकार कोल्हापुरात उदयास आले. मुंबई नंतर भारतात कोल्हापूर हेच सिनेमानिर्मितीच सर्वात मोठ केंद्र बनलं, यामुळे कानाकोपऱ्यातून कलाकार कोल्हापूरला येऊ लागले.

अशातच कोल्हापूरच्या चित्रपटउद्योगाला पहिला धक्का बसला प्रभातमुळे.

महाराष्ट्र सिनेमातून वेगळ होऊन १९२९ मध्ये व्ही शांताराम, फत्तेलाल, दामले या तरुणांनी स्वतःची प्रभात नावाची फिल्म कंपनी सुरु केली होती. त्यांनी पुण्यात मोठी जागा घेऊन तिथे सर्वगोष्टीनी संपन्न असा प्रभात स्टुडीओ उभारला. मुंबईपासून जवळ अंतर असल्यामुळे त्यांना याचा फायदा देखील झाला. कोल्हापूरला स्पर्धा देण्यासाठी मराठी मध्ये दुसरे सिनेमाकेंद्र उदयास आले होते.

प्रभातमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी १ ऑक्टोबर १९३३ साली कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली.

चित्रसृष्टीला हक्काचं साधन मिळावं आणि कोल्हापूरच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी सिनेटोनची निर्मिती करण्यात आली होती. याची सर्व जबाबदारी महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे सोपवली. त्याकाळी भालजी पेंढारकर हे १९२९ पासून कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. दादासाहेबांनी या स्टुडीओच्या देखभालीची सुत्रं भालजी पेंढारकर यांच्याकडे दिली.

तब्बल तेरा एकर जागेवर हा स्टुडिओ उभा होता. भालजींनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि चित्रीकरण याच स्टुडिओत केलं. 

या स्टुडिओत शो मॅन राजकपूर यांच्या चेहऱ्याला नारदाच्या भूमिकेत पहिला मेकअप लागला. याच भूमिकेच्या मानधनातून त्याने मुंबईला आरके स्टुडिओ उभा केला. कोणत्याही सुविधा नसताना इथे स्क्रिप्ट टू स्क्रिन सिनेमा तयार झाला. पृथ्वीराज कपूर यांच्या पहिल्या बोलपटातली भूमिका याच स्टुडिओत झाली. चंद्रकांत सुर्यकांत या बंधूंना घेऊन भालजी पेंढारकर यांनी शिवचरित्राशी जोडलेले व मराठेशाहीचा इतिहास सांगणारे अनेक सिनेमे बनवले.

ऐतिहासिक सिनेमे बनवण्यासाठी उभारलेले सेट पाहून हॉलीवूडचे तंत्रज्ञ देखील अचंबित राहत होते. मोहित्यांची मंजुळा, जगतजननी महालक्ष्मी असे अनेक चित्रपट याच स्टुडिओत चित्रित झाले.

१४ मे १९४६ साली भालजी पेंढाकर यांनी आपली कमाई पणाला लावत २ लाख १० हजार रुपयात कोल्हापूर दरबारकडून कोल्हापूर सिनेटोन स्टुडिओ विकत घेतला. आणि त्याच नामकरण केलं जयप्रभा स्टुडिओ.

सर्व काही सुरळीत असताना ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी जयप्रभा स्टुडिओची जाळपोळ केली. यात चित्रीकरणाचे अनेक सेट, यंत्रसामुग्री, कॅमेरा प्रिंट जळून खाक झाल्या. यात स्टुडिओचं अतोनात नुकसान झालं. आज जयप्रभा टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणे असे नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवणं आहे. आज जयप्रभा स्टुडिओ ही वास्तू कोणा एका व्यक्तीची नाही तर तो कोल्हापूरचा अनमोल ठेवा आहे.

भारतीय चित्रपट व्यवसायाच्या शंभर वर्षातल्या ९६ वर्षांचा इतिहासात एकट्या कोल्हापूरचा वाटा आहे. यामध्ये जयप्रभा, शालिनी यासारख्या स्टुडिओंनी सिनेमानिर्मितीचा पाया रचून ठेवला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.