“चांगभलं” का म्हणतात..? अशी आहेत दख्खनचा राजा जोतिबाची ११ वैशिष्ट्ये..!!!

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं…!

असा गजर करत आजच्या विषयाची सुरुवात करूया. विषयच तसा आहे, तो म्हणजे कोल्हापुरात पार पडत असलेली ज्योतिबाची यात्रा.

ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्व आहे तितकंच धार्मिकदृष्ट्या देखील आहे. येथील  दक्खनचा राजा श्रीज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. ज्योतिबांवर श्रद्धा असल्याने अनेक भाविक शुभ कामांची सुरुवात ज्योतिबांच्या दर्शनाने करतात.

अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाबद्दल आणि ज्योतिबा यात्रेबद्दल अशा ११ महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे.

१) सर्वात पहिलं बघूया या मंदिराचा परिसर.  

श्री ज्योतिबा क्षेत्र कोल्हापूरच्या ३३३ मीटर उंच एव्हड्या ज्योतिबा डोंगराला ‘वाडी रत्नागिरी’ असेही म्हणतात. आधी इथं छोटेसं देवालय होतं. आज जे मोठं मंदिर इथे आहे ते १७३० मध्ये ग्वाल्हेरचे राणोजीराव शिंदे यांनी बांधलं.

दुसरं जे केदारेश्वराचे मंदिर आहे ते १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं. ज्योतिबा व केदारेश्वर मंदिराच्या मध्यभागी चोपडाईचे मंदिर देखील आहे ते प्रीतिराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी बांधलंय. 

तिसरे रामेश्वराचे मंदिर जे १७८० मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधलंय. या मंदिराच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई, दत्तात्रय आणि उत्तरेकडे काळभैरव आहेत. याशिवाय महादेव मंदिर, गायमुख तलाव, दक्षिण दरवाजा, देवबाव व यमाई मंदिर, पालखी सदर, नगारखाना, हत्तीमहाल असं सगळं आहे. एकूणच या मंदिराचा परिसराला  हा तटबंदीने मंदिस्त असून परिसरात दगडी फरशी आहे.

२) श्रीज्योतिबा मूर्तीचं वैशिष्ट म्हणजे, 

निळसर पाषाणाची  चार हात असलेली तीन फूट उंचीची हि मूर्ती आहे. श्रीज्योतिबा मूर्तीचा १९३५, १९८५, २००६ मध्येही वज्रलेप करण्यात आला होता.  कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणाभिमुख असत नाही, पण ही मूर्ती मात्र दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे.

श्रीज्योतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली म्हणून अंबाबाईने ज्योतिबाला विनंती केली की तुमची दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. श्रीज्योतिबाने ही विनंती मान्य करून आपले मुख अंबाबाईकडे वळवले. तेव्हापासून ते दक्षिणेकडे आहे…

३) ज्योतिबाचे वाहन घोडा. 

ज्योतिबा मानाचा ‘उन्मेष’ नावाचा घोडा ज्याचं अलीकडेच हृदयविकाराने निधन झालं. त्यानंतर मानाच्या घोड्याचा शोध सुरु झाला. अखेर यात्रेच्या तोंडावर जय नावाच्या घोडा खरेदी करण्यात आला. आता जोतिबाच्या घोड्याचा शोध घेणं सोप काम नसतं कारण देवाला घोडा अर्पण करत असताना काही वैशिष्ट्ये बघावी लागतात.

१) हा घोडा आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्तच असावा लागतो.

२) हा घोडा पूर्णत: पांढराशुभ्र असावाच लागतो.

३) घोड्याच्या संपूर्ण शरीरावर फक्त दोनच भौरे असावेत.

४) त्या घोड्याला दागिने, तोफ आणि गर्दीची सवय असावी.

५) सर्वात महत्वाचं म्हणजे घोड्यावर कुणीही बसलेलं नसावं. 

४) श्री ज्योतिबा पालखी सोहळ्याचे उंट

सोहळ्याचे उंट असोत वा घोडे हे यात्रेच्या आधीच जून महिन्यापासून पोहाळेतील ‘थट्टी’ या ठिकाणी ठेवले जातात. डोंगरावर थंडीवाऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यापासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांना पोहाळ्यात ठेवले जाते.

गेल्या ५०-६० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. जूनमध्ये ठेवलेले हे उंट व घोडा नवरात्र उत्सव सुरू करण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुन्हा डोंगरावर आणले जातात.

५) आता हे माहिती असू द्या कि ‘श्रीज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ असं का म्हणतात ?

‘चांगभलं’ हा श्रीज्योतिबाचा गजर. ‘चांगभलं’ हा गजर ‘चंगा भला’ या पंजाबी शब्दावरून आला असे काही संदर्भ सांगतात. कारण पंजाबी भाषेत कोणतेही कार्य चांगले झाल्यास ‘चंगा भला’ असे म्हणतात. ज्या वेळेला भारतात राक्षसांनी अनेक अत्याचार करून देवांना त्रास दिला, त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश करून ज्योतिबांनी सर्वांचे संकट नाहीसे करून चांगले केले याचीच आठवण म्हणून ‘चंगा भला’ हा उत्साहवर्धक गजर सुरू झाला.

६) ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी का म्हणतात ?

ज्योतिबा डोंगराला पूर्वी ‘वैतागवाडी’ म्हणायचे. पण या वैतागवाडीस वाडी रत्नागिरी’ हे नाव पडलं त्यामागे २ आख्यायिका आहे. त्यातली एक म्हणजे, 

संत सावता माळी हे आपल्या पत्नीसह श्री ज्योतिबाच्या दर्शनास आले, त्यांच्या पत्नीस खूप भूक लागली. भुकेने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नीने आकांड तांडव सुरू केले. तेव्हा सावता माळी यांनी “या डोंगरावर रत्नेच रत्ने आहेत. त्यांपैकी तुला पाहिजे तितकी घेऊन ये आणि तुझा चरितार्थ चालव” असे सांगितले.

हे ऐकताच ती डोंगरावर फिरली, पण रत्ने मात्र दिसली नाहीत, म्हणून ती जास्तच वैतागली. तिने आपल्या नवऱ्याचे म्हणणे खोटे आहे, हे सिद्ध करण्यासाठी डोंगरावर सापडतील ते खडे आपल्या लुगड्याच्या पदरात घेतले व वैतागाने नवऱ्याच्या पुढे ओतले. तोच आश्चर्य हे की खरेच ती रत्ने झाली. तेव्हापासून या वैतागवाडीला ‘वाडी रत्नागिरी’ असे नाव प्राप्त झाले, अशी एक आख्यायिका आहे.

दुसरी आख्यायिका अशी की, 

‘रत्नासुर’ नावाचा शूर राक्षस जो महाकालिकेचा भक्त होता. तो मोहिनी विद्येत पारंगत होता. एकदा रत्नासुराने सर्व देवांना युद्धाचे आव्हान दिले. हे आव्हान ज्योतिबाने स्वीकारले व प्रत्यक्ष युद्ध आषाढी अमावस्येला सुरू केले असले, तरी ते पुढे सात दिवस चालले.

तरीही रत्नासुर शरण येण्याचे चिह्न दिसेना. म्हणून ज्योतिबांनी आपले आयुध ‘त्रिशूळ’ रागारागाने फेकले, पण ज्योतिबाच्या हातातील अमृतकलशातील जे थेंब खाली पडत, ते थेंब रत्नासुराच्या अंगावर पडत असल्याने रत्नासुर पुन्हा जिवंत होई.

तेव्हा चर्पटांबिकेने रत्नासुराचे रक्त वरचेवर चाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेरीस रत्नासुर श्रावण शुद्ध षष्ठीस जमिनीवर कोसळला. सर्व भागातील जनतेचे संकट टळले, म्हणून जनतेने ‘चांगभलं’ अश्या आरोळ्या ठोकल्या. रत्नासुराच्या नावावरून व त्याच्या शेवटच्या इच्छेवरुन या ठिकाणास ‘रत्नागिरी’ नाव प्राप्त झाले.

७) येथील गावांना राक्षसांची नावं आहेत. 

ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केल्यानंतर युद्धातून इतर राक्षस पळून गेले. तेव्हा ज्योतिबांनी त्या राक्षसांचा पाठलाग करून त्यांनाही ठार केले. ज्या राक्षसांना ज्या ठिकाणी मारले, त्या ठिकाणी त्यांच्या नावाची गावे वसली आहेत.

उदा. देवलाक्ष राक्षस जेथे मारला तेथे देवाळे गाव आहे. दानासुर जिथं मारला गेला ते दानोळी गाव, कोथळासुर जिथे मारला ते कोथळी, केसी मेला तिथे केसापूर, कुंभासुर मारला गेला तिथं कुंभोज, महिषासुर जिथं मारला तिथे मसाई पठार, याशिवाय संदळ-मंदळ-सादळे-मादळे, गंगासुर सांगरुळ, बोभाट – बोरपाडळे, जाज्वला जाफळे अशी नावं या गावांची आहेत.

ज्योतिबांनी रत्नासुर राक्षसाचा मंडप कोसळून पाडला, ते ठिकाण मनपाडळे, रत्नासुराचा टोप जेथे पडला, तेच टोप गाव. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठी कंदासुराचा वध केला ते ठिकाण कांदे व मंगलासुराला ठार मारले ते गाव मांगले होय. ही गावे वाडी रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत

८) श्री ज्योतिबाचे उपासक आणि येथील उत्पन्न

महाराष्ट्रातील सर्व जाती-जमातींचे लोक ज्योतिबाचे उपासक आहेत. त्यामध्ये मुस्लीम व जैनधर्मीय अनुयायांचाही समावेश आहे. अनेक घराण्यांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ग्वाल्हेरचे शिंदे व कोल्हापूरचे हिंमतबहाद्दर चव्हाण या दोन मातब्बर घराण्यांची ज्योतिबावर विशेष श्रद्धा आहे. राजाज्ञा घराण्याने आपल्या मुद्रेवर ज्योतिबाचे नाव कोरलेय.

शिंदे, चव्हाण आणि राजाज्ञा घराण्यांनी ज्योतिबाची उपासना सातत्याने चालण्यासाठी अनेकगावांतून शेकडो एकर जमिनीचे उत्पन्न देवाकडे लावून दिले आहे. या उत्पन्नात पूर्वीच्या कोल्हापूर राज्यातील ३६४ गावांच्या जमिनींचा समावेश होता. याशिवाय मिरजमळा व बुधगाव येथील जमिनी ज्योतिबा देवस्थानास इनाम दिल्या होत्या.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी पहिले यांनी राजाज्ञा घराण्याला  त्यांच्या छत्रपतींच्या सेवाचाकरीबद्दल कुशिरे, पोहाळे व वाडीरत्नागिरी ही तीन गावे बक्षीस म्हणून दिली होती. परंतु राजाज्ञा यांनी ही तीनही गावे श्री ज्योतिबांच्या नावाने दान करून दिली होती.

९) आता महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीज्योतिबांची यात्रा

चैत्री पौर्णिमेला वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबांची फार मोठी यात्रा भरते. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या मोठ्या यात्रा भरतात त्यातली महत्वाची यात्रा म्हणजे ज्योतिबांची यात्रा. या यात्रेत कर्नाटक, ग्वाल्हेर, इंदूर, तामिळनाडू तसेच महाराष्ट्राच्या सर्व भागांतून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. 

या यात्रेस गावोगावच्या सासन काठ्या येतात, पारंपारिक वाद्यांचा गजर होतो, गुलाल-खोबऱ्याची उधळण होते, ‘ज्योतिबाच्या नावाने चांगभलं’ या गजराने सारा डोंगर दुमदुमून जातो. 

आसमंत दरवळून टाकणारा दवण्याचा सुगंध हे सारे ज्योतिबांचे राजवैभव या यात्रेत पाहायला मिळते.

ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर अंबाबाई व जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानीचे दर्शन घेण्यास कोल्हापुरात येतात. छत्रपती शिवरायांचे स्मरण सतत व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराज अनेक उपक्रम राबवत असत.  राजर्षी शाहूंनी ज्योतिबा यात्रेच्या कालावधीतच शिवरायांचा रथोत्सव सुरू केला. रथोत्सव तीन दिवस चालत असून ज्योतिबांचे भाविकही यामध्ये सहभागी होत असतात.

१०) आणखी एक म्हणजे, या यात्रेतला सासनकाठ्या.

ज्योतिबाच्या या यात्रेत सासनकाठ्यांची मिरवणूक निघते. यावेळी चांगभलंच्या गजरात भाविक सासनकाठी घेऊन नाचत असतात. सासनकाठी म्हणजे ३० ते ३५ फूट उंचीचा लांबलचक वेळू. त्याच्या शेंड्याला एक चांगले वस्त्र व तुरा बांधलेला असून वेळूच्या तळापासून साधारणपणे चारपाच फुटांवर एक आडवी फळी असते.

तिच्यावर ज्योतिबांचे वाहन असलेला घोडा बसवलेला असतो. ताशा- सनईच्या नादात आणि चांगभलंच्या गजरात भाविक सासनकाठ्या इतक्या सुरेखपणे नाचवितात की पाहणाऱ्यांची मती गुंग होते. अश्यावेळी भाविक कितीही दमले, तरी यमाईची भेट घेऊन ज्योतिबाची पालखी आत जाईस्तोपर्यंत हातातील सासनकाठी खाली ठेवत नाहीत.

११) शेवटची माहिती म्हणजे श्री ज्योतिबा आणि ग्वाल्हेरचे शिंदे घराणं.

मराठेशाहीतील कर्तबगार सरदार व महान मुत्सद्दी महादजी शिंदे यांची, कुलदैवत ज्योतिबांवर फार श्रद्धा होती. पेशवाईच्या उत्तरार्धात महादजींनी उत्तरेकडे आपला इतका दरारा निर्माण केला होता की बादशाही तख्तावर कोणाला बसवायचे, हे महादजींच्या इच्छेवर अवलंबून होते; पराक्रमी सरदार महादजी शिंदे म्हणतात,

“आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलूखगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळविली आहे हे खरे आहे. तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा ज्योतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा व आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने रहाणारी दौलत आम्ही कस्पटासमान मानतो”

याचा अर्थ महादजी शिंदे यांची ज्योतिबांवर नितांत श्रद्धा होती. महादजींच्या वारसांचीसुद्धा ज्योतिबांवर नितांत श्रद्धा होती.

शिवाजीराजे शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर व इतर राज्याचे एकीकरण करून मध्यप्रदेश निर्माण होणार होता. तेव्हा शिंदे यांनी आपल्याकडील एक अधिकारी ज्योतिबा डोंगराला पाठविला.

त्यांनी एकीकरणासंदर्भात ज्योतिबांचा प्रसाद घेतला आणि नाथांची एकीकरणासाठी आज्ञा आहे याची खात्री करून घेऊनच एकीकरणासाठी संमती कळविली होती. ज्योतिबा डोंगर येथे शिंदे सरकारचे ऑफिस असून कुलपरंपरेने ज्योतिबांची पूजाअर्चा चालू असते.

असे हे ज्योतिबा देवस्थान.. !

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. Royal omkar says

    Correct✅ information boll bhidu

Leave A Reply

Your email address will not be published.