कोल्हापूरमध्ये चर्चा आहे “आमच ठरलंय !”
कोल्हापुरच राजकारण म्हणजे ब्रम्हदेवाला पण कोड्यात टाकणारी गोष्ट झाल्या. आमच्या इथ साधे वाद हुत न्हाईत. एकदम दिल्ली हलवणारे वाद हुत्यात. इथं पक्षाचं राजकारण कमी आणि गटाचं राजकारण मोठ हाय. दुधसंघ, साखर कारखान्यावरण होणारी भांडण कुठल्या महायुद्धापेक्षा कमी असत नाहीत. एक काळ मंडलिक-मुश्रीफ वादाने गाजवलेला आता वेळ मुन्ना-बंटी भांडणाची आहे.
तसं बघायला गेलं तर कोल्हापूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात सगळेच नेते पुरोगामी विचारांचे. एक काळ असा होता भाजपचं अस्तित्व इथं नाममात्र होतं. नाही म्हणायला शिवसेना होती पण त्यांचा खरा जोर गेल्या विधानसभा निवडणुकीतचं दिसला. पण गेल्या काही वर्षात चंद्रकांत दादांना मंत्रीपद मिळाल्यापासन सगळी गणित बदलली.
निम्मी नेतेमंडळी दादांनी उचलून आपल्या पक्षात आणली. त्यात महाडिक घरान पण होतं. काही दिवसापूर्वीची कंडीशन बघितली तर कुटुंबप्रमुख अप्पा महाडिक कॉंग्रेस आमदार, त्यांचा पुतण्या मुन्ना राष्ट्रवादी खासदार, मुलगा भाजपा आमदार पुढ जाऊन सून भाजपाची जिल्हापरिषद अध्यक्ष.
मागच्या लोकसभेवेळी आपला कॉलेजपासनचा वाद माग ठेवून सतेज उर्फ बंटी पाटलांनी मुन्ना महाडिकांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणायला मदत केली, आघाडी धर्म पाळला. पण विधानसभेत महाडिकांच्या चुलत भावांन बंटी पाटलांना घरी बसवलं. मुन्ना महाडिकांनी भाजपाचा खुला प्रचार केला होता.
सतेज पाटलानी आयुष्यात ही गोष्ट इसरणार नाही अशी खूणगाठ बांधली. तिथन पुढं जिद्दीन महानगरपालिका ओढून आणली, खुद्द महादेवराव महाडकानां विधानपरिषदेवर पाडलं. गोकुळच्या सभेत स्वतः जाऊन बसले. तिथ राडा झाला. परवा परवा महाडिकानी जिल्हापरिषद निवडणुकीत बंटी पाटलांवर मात केली.
तर आज घडीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या डी.वाय. पाटलांचे चिरंजीव सतेज उर्फ बंटी पाटील कॉंग्रेस मध्ये आहेत. तर एकीकड अख्खं कुटुंब भाजपमध्ये पोहचलंय तरी मुन्ना महाडिकनी यावेळी सुद्धा लोकसभेला राष्ट्रवादीकडून तिकीट आणलंय. त्यांच्या विरुद्ध यावेळी सुद्धा आहेत प्रा. संजय मंडलिक. त्यांचे वडील माजी खासदार स्व. सदाशिवराव एकेकाळी कट्टर पुरोगामी विचारांचे पण तरी संजय सर शिवसेनेकडन उतरलेत.
कोल्हापूरच्या राजकारणाचा सगळाच झांगडगुत्ता झालाय. नेते कार्यकर्ते सगळ्यांचीच गोची झालीया. पक्ष, आघाडी धर्म कधीच गुंडाळून माळ्यावर टाकलाय. आता कुठल्या पण पेठेत कुठल्या पण गल्लीत जावा कोणाला मत कोणाला देणारं ईचारल्यावर एकच म्हणत्यात,
“आता आमचं ठरलय !!”
नुसत कार्यकर्तेचं न्हाई तर नेते कोणच उघड सांगना की काय ठरलंय. तरी पण बोल भिडूनं कानोसा घ्यायचं ठरवलं. तर बघूया विधानसभा मतदारसंघ वाईज कोणाच काय ठरलंय?
१.कोल्हापूर दक्षिण-
इथले सध्याचे आमदार आहेत अमल महाडिक. पक्ष भाजप. पण भावासाठी युती सोडून राष्ट्रवादीचा प्रचार करणार हे नक्की. महादेवराव महाडिक, शौमिका महाडिक हे सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन धनंजय महाडिक यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसच्या सतेज पाटलांच मोठ वर्चस्व आहे. मात्र ते यावेळी धनंजय महाडिक यांचा प्रचार करत नाही आहेत. उद्या त्यांचा वाढदिवस आहे पण आजचं पेपरात त्यांच्या शुभेच्छा प्रसिद्ध झाल्यात. त्यात लिहिलंय आमच ठरलंय.
सतेज पाटील यांनी आपल्या इशाऱ्यातून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की कोणाला मदत करायची. आज तरी असं चित्र आहे की बंटी पाटील गट संजय मंडलिक यांच्या पाठीशी खंबीर उभा ठाकला आहे.
२. कोल्हापूर उत्तर-
सध्याचे आमदार राजेश क्षीरसागर. पक्ष शिवसेना. क्षीरसागर यांचे महाडिक गटाशी संबंध चांगले आहेत आणि शिवाय त्यांचा भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी उभा दावा आहे. तरी याच मतदारसंघातून दोनवेळा आमदार झालेल्या क्षीरसागर यांना माहित आहे यंदा सेनेसाठी ही जगण्यामरण्याची लढाई आहे. त्यामुळे ते प्राध्यापक मंडलिक यांच्या पाठीशी उभे आहेत असं म्हणतात.
या मतदारसंघात चंद्रकांतदादा पाटील यांचं आणि पर्यायाने भाजपाचेही काही प्रमाणात वजन आहे. महाडिकांशी दादांचा घरोबा चांगला आहे. ते अप्रत्यक्ष रित्या महाडिक यांच्या पाठीशी असल्याच सुचवतात पण युती धर्मामुळे त्यांना मंडलिक यांना साथ द्यावी लागणार आहे.
3. करवीर-
एकेकाळी इथे कॉंग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघात सध्याचे आमदार आहेत शिवसेनेचे चंद्रदीप नरके. मात्र नरके गटाचेच काका अरूण नरके गोकुळचे माजी अध्यक्ष आणि महाडिक गटाचे कट्टर समर्थक आहेत. तरीही आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्टपणे सांगितलंय की गद्दारी आपल्या रक्तात नाही कितीही झालं तर शिवसेना बरोबरच राहणार.
तर कॉंग्रेसचे पीएन पाटील यांचा शिवसेनेशी उभा दावा आहे. त्यामुळे ते धनंजय महाडिक यांना मदत करणार हे उघड आहे. पी एन पाटलांचे कार्यकर्ते हे आघाडी धर्माला पाळतात की स्वतःचं स्वतः ठरवतात यावर महाडिक यांचं भवितव्य अवलंबून आहे.
करवीर मतदारसंघामध्येच येणाऱ्या गगनबावडा तालुक्यामध्ये मात्र सतेज पाटील गटाचा जोर आहे. त्यामुळे हा तालुका संजय मंडलिक गटाच्या पाठीशी राहिलं असाच अंदाज आहे.
४.कागल-
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतला सर्वात महत्वाचा मतदारसंघ. मंडलिक गटाचं स्वतंत्र अस्तित्व या मतदारसंघात आहे. इथले आमदार आहेत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मुश्रीफ. मुश्रीफ यांनी गेली काही वर्ष सतेज पाटलांशी जुळवून घेऊन महाडिक गटाशी पंगा घेतला होता. राष्ट्रवादीचे खासदार असून पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप मुन्ना महाडिक यांच्यावर केला जात होता.
पण यंदाही पवारांनी धनंजय महाडिक यांना तिकीट दिल यामुळे मुश्रीफ गटाची अडचण झाली आहे. एका सभेत धनंजय महाडिक यांचं भाषण बंद पडण्यापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांची मजल गेली होती. पक्षाचा उमेदवार म्हणून यावेळीही मुश्रीफ धनंजय महाडिक यांच्या पाठीशी उभे राहतील पण त्यांचे कार्यकर्ते महाडीकांना मतदान करतील का हा प्रश्नच आहे.
याशिवाय या मतदारसंघात शिवसेनेचे संजय घाटगे, भाजपा प्रवेश केलेले समरजित घाटगे यांचं देखील मोठ वजन आहे. मात्र हे दोन्ही गट संजय मंडलिक यांना मदत करतील अशीच शक्यता आहे. गडहिंग्लज तालुक्यातल्या श्रीपतराव शिंदे वगैरे नेत्यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
५. चंदगड-
सध्या इथे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर. त्यांनी धनंजय महाडिक यांचा प्रचार सुरु केलेला आहे. माजी मंत्री भरमू पाटील हे देखील धनंजय महाडिक यांच्या पाठीशी आहेत.
मात्र कुपेकराचे पुतणे संग्राम कुपेकर हे शिवसेनेबरोबर आहेत. शिवाय राजेश नरसिंगराव पाटील आणि त्यांचे मामा भाजप नेते गोपाळराव पाटील यांना ‘मेहुण्या-पाहुण्यां’साठी म्हणून मंडलिक यांची पालखी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. या बरोबरचं सतेज पाटील यांचासुद्धा प्रभाव या मतदारसंघात दिसून येतो.यामुळे चंदगड मधील कॉंग्रेस कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी राहतील.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संजय मंडलिक यांना मोठी लीड मिळाली होती. पण त्यांच्यासाठी इथे आताची परिस्थिती थोडी बिकट आहे. यावेळी धनंजय महाडिक त्यांना इथे चांगली टक्कर देऊ शकतात.
६. राधानगरी-
सध्या राधानगरीचे आमदार आहेत शिवसेनेचे प्रकाश आबिटकर. हा सुद्धा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र केपी पाटील यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराला पाडणारे प्रकाश आबिटकर लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराबरोबरचं असलेले दिसून येत आहे. तर केपी पाटील हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या म्हणजेच महाडिक यांच्या पाठीशी राहणार आहेत.
हे सोडून कौलवकर गट, भाजपमध्ये प्रवेश केलेले राहुल देसाई गट, डोंगळे गट हे सगळे महाडिक यांच्या मागे तर कॉंग्रेसचे सतेज पाटील यांना मानणारे कार्यकर्ते मंडलिक यांच्या सोबत उभे असलेले दिसून येत आहे.
एकूण काय तर कोल्हापूरची यावेळची निवडणूक नेहमीपेक्षापण गुंतागुंतीची झाल्या.भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचा प्रचार आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करत आहेत आणि तेही ठरवून !!
खर बघायला गेलं तर ही लोकसभा निवडणूक शिवसेना राष्ट्रवादी मध्ये नाही तर ही लढाई आहे जिल्हाभर पसरलेल्या धनंजय महाडिक यांच्या युवाशक्ती गटाची आणि सतेज पाटील यांच्या सहकाराच्या जाळ्यातून निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांची.
महादेवराव महाडिक आणि डी.वाय. पाटील या जुन्यापिढीच्या गटापेक्षा मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांनी स्वतःच्या कामातून स्वतःची ओळख नवा गट उभा केला आहे. ही लोकसभा निवडणूक या नव्या दमाच्या नेत्यांच्या ताकदीचीचं परीक्षा असणार आहे . आता बघू यातन पण कोण बाजी मारतंय आणि अख्खा जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व सिद्ध करतंय.
हे ही वाच भिडू.
- सुजय की संग्राम ? सोशल मिडीयावर कोण किती पाण्यात आहे..
- यंदा खैरे येणार काय रे ?
- वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर खरंच संघाचे आहेत का ?
- शालिनी पॅलेस मध्ये भूतय ते लक्ष्मीपुरीतला टांगेवाला, कोल्हापूरात वर्षभर चालू असतात या अफवा.