कुठलंही काम न लाजता केलं तर काय होतं, हे संतोष पाटलांकडं बघून समजतंय…

घरची परिस्थिती तशी बेताची. अवघं एक तुकडा शेत. शिकावं अन् कुठे तरी नोकरीला लागावं असा त्याच्या डोक्यात विचार. कसबसं एका वर्गातून पुढच्या वर्गात गाडी निघाली होती. पण दहावीला असतानाच नापासाचं सर्टिफिकेट त्याच्या हातात पडलं. गडी इथच खचला. नापासाला कुठं चांगली नोकरी मिळणार असा वाटू लागलं. पुढे शिक्षण घेण्यात ही काही अर्थ नाही असा विचार त्याने केला.

आता घरादाराला आधार द्यावा म्हणुन त्याने शाळेला सोडचिट्ठी दिली अन् कोल्हापुरच्या गोकूळ शिरगाव एमआयडीसीची त्यानं वाट धरली. तो तिथे कामगार म्हणुन राबू लागला. पुढे गार्डनिंगचं काम करु लागला अन् हे काम त्याची आवड बनलं. सोबत दहावीचा फॉर्म भरला आणि तो थांबलाच नाही. एम.ए पर्यत शिक्षण घेत त्याने गार्डनिंग मध्ये ही डिप्लोमा केला.

ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुर्डू येथील संतोष एकनाथ पाटील याची. ‘ग्रीन सिटी गार्डनिंग सर्व्हीसेस’ नावाची फर्म सुरु करत सध्या तो यशस्वी व्यवसायिक ठरला आहे.

संतू शेतकरी कुटूंबात वाढला. परिस्थिती तशी बेताचीच. २०११ साली दहावीच्या परिक्षेत गणित विषयाने दगा दिला अन् संतोषच्या आयुष्याचं गणित बिघडलं. शाळेला राम राम ठोकत तो एमआयडीसीत काम करु लागला. एमआयडीसतल्या मोठ मोठ्या मशिनरीवर याचं रांगडं हात फिरु लागलं. घाम गाळणं सुरुच होतं. पण काय तर जगा निराळं करण्याची या संतू भावाची मनातली इच्छा काय विझत नव्हती.

मावसभावाच्या मदतीने त्याला एका ठिकाणी गार्डनिंगचे काम मिळालं. हे काम त्याला पटलं. शेतीची पार्श्वभूमी अन् आवड असल्यानं संतू गार्डनिंगच्या कामात राबू लागला. एमआयडीसी अन् गार्डनिंग या दोन्ही ठिकाणचा पगार मिळून गुजरान सुरु होती. 

यातूनही आपण शिकावं, निदान दहावी पास तरी व्हावं असं मनोमन संतूला वाटत होतं. त्याने धाडसाने गणित विषयाची दहावीची परीक्षा दिली. भावानं गणितात सक्सेसच मारलं. 

लगेच नाईट कॉलेजला अकरावीसाठी प्रवेश घेतला. अभ्यास सुरु ठेवत त्याचं एमआयडीसीत राबणं सुरुच होतं. पुढं अकरावी अन् बारावीची परीक्षा तो पास झाला. आता मात्र एमआयडीसीत राबणं त्यानं सोडलं आणि एटीएम मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली. 

सोबत गार्डनिंगच्या कामात तो परफेक्ट होत होता. 

या कामातलं काय तर शिक्षण घ्यावं असं संतू ला वाटलं. अँग्रीकल्चर डिप्लोमा करण्याच्या उद्देशाने त्याने कोर्सला प्रवेश घेतला खरा परंतू फी भरायला पैसे नसल्याने तो मध्येच सोडला. नंतर बी.ए ला प्रवेश घेत त्याने गार्डनिंगच्या कामाला तंत्रशुद्धतेची जोड द्यायचे ठरवले. सुभाष पाटील नावाचा मित्र त्याच्या सोबत होता. 

‘संत्या भावा तु शिकायचा चान्स सोडू नको, मी हाय तु भिड.’ असा प्रोत्साहन पर सल्ला सुभाषनं संतूला दिला. संतुनं पुणे विद्यापीठाचा ‘सर्टिफिकेट ऑफ गार्डनिंग’चा कोर्स पुर्ण केला. या कोर्समुळे संतोषला कामातली तंत्रशुद्धा अवगत झाली. या वेळी त्याला या कामातला व्यवसायिक दृष्टिकोन आला.

 ‘ग्रीन सिटी गार्डनिंग सर्व्हीसेस’ नावाची फर्म सुरु करताच त्याला पसंदी मिळाली. विविध फार्म हाऊस, डॉटेल, बंगलो, इंडस्ट्री येथील गार्डनिंगची कामे तो घेवू लागला. ‘गार्डनर’ हा फँमिली मेंबर सारखा असतो. विश्वास संपादन करत तो प्रत्येक ग्राहकाचे काम करत होता. 

सोबतीला अर्थशास्त्र विषयातून त्याने एम.ए पुर्ण केलं. ‘लॅण्डस्केप डिजाइन अँण्ड इंटिरियर स्केप’ असा गार्डनिंग मधील अधिकचे शिक्षण घेतले. इथ त्याचं शिक्षणाचं वर्तुळ पुर्ण झालं. सोशल मीडियावर त्याने फर्मची जाहिरात केली.

संतोष लॉन, वॉटर फॉल, वर्टीकल गार्डन, टेरेस गार्डन, गार्डन लायटींग, पार्कींग गार्डन, किचन गार्डन, चिल्ड्रन पार्क, रॉक, बटरफ्लाय, बर्ड गार्डनची कामे करुन देतो. देशी, विदेशी झाडांचा अभ्यास करुन तो देशी झाडांवर काम करतो. आपल्या रांगड्या हातांनी कोल्हापुरात अनेक बगीचे फुलवले आहेत. 

वृक्ष, वेलींवर तो आत्मियतेनं काम करतो. शास्त्रीय पद्धतीने तो त्यांना माती रुजवतो अन् वाढवतो. सोबतच नेचर डायव्हर्सिटी चे महत्व संतू लोकांना पटवून देतो. सात जणांची टिम घेवून तो हे काम करतो. महिन्याला लाखभर रुपयांची उलाढाल तो या माध्यमातून करतो. त्याने नुकतेच गावाकडे नवे घर ही बांधले आहे. 

कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारशाने कोल्हापूर मध्ये अनेक कलाकार घडले आहेत. गार्डनिंग ही पण एक कलाच आहे. संतूने ही कला आत्मसात केली आहे. संतू बोल भिडूशी बोलताना सांगतो, ‘गरिबीची मला जाण होती. अपयशाने मी कधी खचलो नाही.’

 शिक्षणामुळे माझ्या ज्ञानात वृद्धि झाली. याचा उपयोग मी माझ्या कामात केला. माझ्या यशात मला अनेकांची साथ दिली. नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.’ असा सल्ला द्यायला तो विसरत नाही. भिडू संतोषचे हे यश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.

  • भिडू पै.मतीन शेख

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.