कलकत्त्याच्या वेश्यांना रातोरात फ्रेंच्यांच्या वसाहतीत का पळून जावं लागलं होतं?

देहविक्रय हा जगातील सगळ्यात जूना व्यवसाय आहे. जगातल्या प्रत्येक संस्कृतीत याच्या पाऊलखुणा सापडतात. त्याला अटकाव घालण्याचा प्रयत्नही अनेक देशांनी केला पण तो यशस्वी झाला नाही. पण यामुळे इतिहास मात्र बदलला.

यातच येतो ब्रिटिशांनी रोगराईच्या काळात काढलेला कायदा.

कोरोनाकाळात देशात काही नियमांसह वेश्याव्यवसाय करायला नुकतीच परवानगी देण्यात आली होती. अशाच रोगराईच्या काळात भारतात ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी बनवलेला कायदा हा कोलकाता आणि चंदननगरची डेमोग्राफी बदलून टाकणारा होता. त्यामुळेच १८६८ साली कलकत्त्याच्या वेश्यांना रातोरात चंदननगरला पळून जावं लागलं होतं.

बंगालच्या हुबळी जिल्ह्यात नदीच्या किनारीच वसलेलं शहर म्हणजे चंदननगर. इथलं वेगळेपण म्हणजे फ्रेंचांच्या ताब्यात असताना त्यांनी बांधलेल्या नितांतसुंदर इमारती, चर्चेस आणि बंगले. पण अजून एका गोष्टीसाठी चंदननगरचं नाव घेतलं जातं ते म्हणजे इथला लक्ष्मीगंज बाजार!

५०० मीटर रस्त्यावर विस्तीर्ण पसरलेला हा रोड इथल्या रेड लाईट एरियासाठी ओळखला जातो. बाकी काहीही विशेष नाही तरीही लोकांच्या ओठावर याचं नाव सतत असतं आणि म्हणूनच या रस्त्याची चर्चा बंगालभर असते. कारण या नावामागे ब्रिटिशांच्या राज्याचा एक क्रूर इतिहास जोडलेला आहे.

इंग्रजांच्या राज्यात छळ झालेल्या वेश्यांचे आश्रयस्थान बनलेला हा रस्ता इतिहासात आपली एक वेगळी ओळख बाळगून आहे.

जुन्या फ्रेंच घरांची वाताहत झाली तरी हा रास्ता मात्र अजूनही आपली तीच ओळख जपून आहे.

१७ व्य शतकात चंदननगरला फ्रेंचांनी आपली वसाहत स्थापन केली. पुढची एंक वर्षे यावर नक्की कुणाची मालकी असेल यावरून ब्रिटिश आणि फ्रेंच्यांच्यात संघर्ष चालला. पण यात फ्रेंचांची सरशीझाली आणि लक्ष्मीगंज बाजार बाजार या सगळ्या घडामोडीत आपल्या लाल उजेडासह सतत सूरु राहिला. इथल्या वेश्यांची संख्या सदोदित वाढत राहिली.

पण त्याची अचानक प्रचंड वाढ होण्याचं कारण ठरलं ते म्हणजे १८६८ चं वर्ष. चौदाव्या कलमानुसार आपल्यावसाहतीत ब्रिटिशांनी भारतीय साथीच्या रोगांचा कायदा लागू केला. या कायद्यानुसार त्यांच्या राज्यातील सगळ्या वेश्याना आपली तपासणी करून घेणे आणि नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. पण याची परिणती वेश्याना टोकाचा त्रास देण्यात झाली.

या कायद्याला स्थानिक बंगाली जनतेत चोडू आईन असं नाव पडलं होतं. प्राणकृष्ण दत्त यांनी त्या वेळच्या या परिस्थीतीचे वर्णन आपल्या लेखनात केलं आहे.

सुरोजीत सेन यांच्या मते हा कायदा अगदी अन्यायकारक होता. कोणताही विचार न करत त्याची अंमलबजावणी करण्यात अली. त्यामुळं समाजातील कनिष्ठ वर्गातील लोकांवर याचा अतिशय वाईट परिणाम झाला.

१८०० साली कोलकात्यात वेश्याव्यवसाय अचानक भरभराटीस आला होता. देशोदेशीहून बंदर आणि व्यापार यात येणाऱ्या लोकांमध्ये त्याची खाती वाढत होती. तवायफ म्हणून राजेरजवाड्यांच्या काळात असणाऱ्या कला जपणाऱ्या स्त्रियांपेक्षा याचे स्वरूप वेगळे होते. सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत या वेश्यांना कोणतेही स्थान नव्हते.

भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून कोणताही आधार नसणाऱ्या स्त्रिया कलकत्त्याची वाट धरत आणि तिथं जाऊन या व्यवसायात सामील होत असत. इंगलंडमध्ये हा काळ विकटोरियन म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळं समाजात सोवळं वागणे आणि टापटीप राहणे जवळपास नियमांचे भाग झाले होते. पण यामुळे वेश्याव्यवसाय हा गुन्हा ठरवला गेला होता.

पण विरोधाभास असा कि ब्रिटिश सैनिकच या व्यवसायाचे सगळ्यात मोठे भागीदार होते. भारतात आलेले सैनिक इथे येऊन सार्वजनिक वेश्यालयांमध्ये सातत्याने जात असत.

पण त्याकाळी अनेक साथीचे रोग सुरु झाले होते. या सैनिकांच्या सर्व खर्चाची आणि आजारपणाची जबाबदारी कंपनीलाच करावी लागे. त्यामुळे सैनिकांना ताकीद दिली जात असे  कि त्यांनी सार्वजनिक वेश्यालयांमध्ये जाऊ नये. पण सैनिकांनी हि सूचना कधीच पाळली नाही. त्यामुळे सैनिकांमध्ये रोगराई वाढत गेली.

ईस्ट इंडिया कंपनीने यावर एक जालीम उपाय सुचवला तो म्हणजे सैनिकांना रोखणे. काही सैनिकांना याबद्दल दंड ठोठावले जाऊ लागले. पण अनेक सैनिक लपूनछपून या वेश्यालयांना भेटी देत असत.

१८५७ नंतर याचा करभार वृत्तांच्या राजसत्तेने आपल्या हातात घेतला. त्यामुळं त्यांनी कडक निर्बंध लढायला सुरुवात केली. याचाच भाग म्ह्णून १८६४ साली कॅन्टोनमेन्ट कायदा करण्यात आला.

रेंजमेंटच्या वसतिस्थळाजवळच्या भागात थेट वेश्यालये चालवणे बेकायदेशीर आहे अशी तरतूद या कायद्याने करण्यात आली.

पण हा कायदा इतका जोरात आदळला कि विचारता सोय नाही. कॅन्टोनमेन्ट भागातून सैनिक पायपिट करून सहाराच्या इतर भागांमध्ये जाऊ लागले. कॅन्टोनमेन्टमधून सैनिकांना थेट तिकडे नेण्यासाठी स्थानिक लोकांनी व्यवस्था सुरु केल्या. अनेकदा सैनिक कॅन्टोनमेन्टपेक्षा सहाराच्या इतर भागांमध्येच जास्त दिसत. त्यामुळे संसर्गजन्य आणि गुप्तरोगाचे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढलं.

इंग्लंडमध्ये १८६४ पासून एक कायदा सुरु करण्यात आला होता. त्यानुसार इंग्लंडमध्ये वेश्याव्यवसाय बेकायदेशीर ठरवण्यात आला होता. (रणांगण कादंबरीत चक्रधरला पॅरिसमध्ये भेटलेली म्हतारी वेश्या आठवत असेल. तिला लंडनमधून याच कायद्यामुळे हाकलण्यात आलं होतं.)

या कायद्याला जसाच्या तसा उचलून १८६८ साली कोलकात्यात लादण्यात आलं.

या कायद्यामुळे प्रत्येक देहविक्रय करणाऱ्या स्त्रीला नोंदणी करून परवाना काढणे बंधनकारक करण्यात आले. तिची मेडिकल तपासणी होऊन तिला कोणताही रोग नाही ना याची चाचपणी केली जाऊ लागली. जर या चाचणीत त्यांना संक्रमण झाल्याचे दिसून आले तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असे आणि बरे झाल्यानंतरच व्यवसाय करू दिला जाई.

कोलकात्याच्या वेश्यांमध्ये या कायद्याबद्द्दल राग होता. यात त्यांची छळवणूक केली जाई. परवाना नसेल तर त्यांना तुरुंगात डांबण्यात येत असे. दवाखान्यात जास्त दिवस थांबवून त्यांच्या कमाईवरही याचा विपरीत परिणाम होत होता.

अनेक गरीब स्त्रियांनादेखील या कायद्याचा जाच झाला. त्यामुळे या स्त्रियांनी कोलकता शहर सोडून जाण्याचे ठरवले. १८८७ साली जवळपास ५० % स्त्रियांनी कोलकाता सोडले अशी नोंद इतिहासात आढळते.

त्यांनी आसरा घेतला १७०० सालापासून चंदननगरमध्ये सुरु असणाऱ्या लक्ष्मीगंज पेठेचा. तेथे ब्रिटिश वसाहत नव्हती आणि फ्रेंचांचे राज्य होते. त्यामुळे तेथे जाणे वेश्याना  सोईचे ठरले. या महिलांचा चंदननगरमध्ये एवढा ओढा वाढला कि त्यानंतर फ्रेंच शासनाने त्यांच्याकडून कर गोळा करायला सुरुवात केली.

अनेक वर्षांनी १९८० मधये येथे कम्युनिस्ट सरकार आल्यानंतर इथल्या वेश्यांची पुन्हा वाताहत झाली. त्यांना हि जागा सोडावी लागली असे इतिहास अभ्यासक सांगतात.

त्यामुळे चंदननगरमध्ये देहविक्रयाचा दर अचानकपणे घटला आणि अतिशय कमी पैशांमध्ये हा व्यवहार होऊ लागला. अघोर चंद्रघोष या तत्कालीन कवीने याचे वर्णन करताना म्हंटले आहे कि

“आठ पैसार मोजूर जरा खेजुर चाताय टाके

खाटपलंगी खाशा बिछाये सुचे लाखे लाखे”

अर्थात ‘आठ पैशाच्या मोलाचा मजूर आधी झावळ्यांच्या चटईवर झोपत असे. पण आता त्याला उत्तमोत्तम देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या आरामी खाटेवर झोपता येऊ लागले.’

तिकडे कोलकात्यात रोज जवळपास १२ स्त्रियांना कायदा मोडल्याचा नावाखाली अटक करण्यात येत होती. युरोप आणि इंग्लंडहून आलेल्या वेश्या मात्र आपला व्यवसाय निर्धोकपणे चालवत होत्या.

आत्तापर्यन्त हा कायदा घरंदाज लोकांना चांगला वाटत होता पण त्याचा वापर करून इंग्रजांनी जुलुमजबरदस्ती सुरु केल्यानंतर लोकांनी हा कायदा मागे घेण्यासाठी खटपट केली.

हळूहळू लोकांनी याला विरोध केला. काही स्थानिक भारतीय लोकांनीही याविरुद्ध बोलायला सुरुवात केली. जोसफीन बटलर या इंग्रज बाईने १८८६ मध्ये ब्रिटनमधून हा कायदा काढून टाकला. तिने लेडीज नॅशनल असोसिएशन संस्था बनवली.

या  लेडीज नॅशनल असोसिएशनने आपले लक्ष भारताकडे वळवले आणि इथंही कायदा काढून टाकण्याची मागणी केली. स्थानिक लोक विरोधात जाऊ लागल्याचे बघितल्यावर ब्रिटिशांनाही याची जाणीव झाली.

अखेरीस सप्टेंबर १८८८ मध्ये हा कायदा ब्रिटिशांनी रद्दबातल केला. पण २० वर्षांहून जास्त काळ कोलकात्यातील वेश्यांना समुद्रमार्गे रातोरात पळून जावे लागले होते. त्यांनी तेथून परत न येणेच पसंत केले.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.