कोलकात्याच्या ताजला इतिहासात पांढऱ्याचं काळं करण्यात आलं होतं

भारतामध्ये खूप सारे आकर्षण आहेत. भारताचं नाव जर विदेशात घेतलं तर ताज महालचं नाव नक्कीच पुढे येतं. पण असाच एक ताज महाल कोलकात्यात सुद्धा आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल असं त्याचं नाव. कोलकात्याला कुणीही भेट द्यायला गेलं की हे ठिकाण त्यांच्या बकेट लिस्टमध्ये सगळ्यात वरती असतं म्हणजे असतंच.

ही विशाल, चमकणारी पांढरी इमारत ‘क्वीन्स वे’ वर असून ती भारत आणि युनायटेड किंगडमची राणी व्हिक्टोरिया यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलं होतं. २२ जानेवारी १९०१ ला राणी व्हिक्टोरिया यांचा मृत्यू झाला तेव्हा लॉर्ड कर्जन यांनी त्यांच्या राज्यकाळाचा सुवर्ण इतिहास लोकांना लक्षात राहावा म्हणून व्हिक्टोरिया मेमोरियल बांधण्याची कल्पना दिली होती. त्यानुसार ४ जानेवारी १९०६ ला ‘प्रिंस ऑफ़ वेल्स’ जॉर्ज पंचम यांनी हे मेमोरियल बांधण्यास घेतलं. आज अनेक लोक हमखास या इतिहासाला डोळे भरून न्याहाळतात.

पांढऱ्या शुभ्र चकाकणाऱ्या अशा या व्हिक्टोरिया मेमोरियलला मात्र एकदा काळ्या रंगानं रंगवण्यात आलं होतं, यावर विश्वास बसेल का!

ही घटना घडली होती जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. दुसरं महायुद्ध तेव्हा जगात सुरू होतं. भारत या युद्धात प्रत्यक्षपणे नव्हता मात्र भारतातील कोलकाता यात आपोआप खेचला गेला होता. कारण कोलकाता त्यावेळी ब्रिटिशांची राजधानी होती.  भारतातील ब्रिटिशांचा मुख्य अड्डा कोलकाता होता.

त्याचमुळे ब्रिटिशांवर हल्ला करताना कोलकात्यावर हल्ले होऊ लागले होते. सर्वप्रथम १९४२ मध्ये कोलकात्यावर पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला. १९४२-४३ च्या दरम्यान जपानी आर्मी एअर फोर्सने कोलकात्यावर हल्ले सुरूच ठेवले. 

जपान हवाई मार्गाने हल्ले करत असे. पण यातील विशेष गोष्ट अशी की, ते रात्रीच्या वेळी हे हल्ले करायचे. याचं कारण असं की, ब्रिटिशांच्या सुरक्षा यंत्रणा दिवसा खूप जास्त मजबूत होत्या आणि त्यांना जपान सामोरं जाऊ शकत नव्हतं. नेहमी नेहमी होत असलेल्या या हल्ल्यांमुळे कोलकात्यावर संकटाचे ढग दाटले होते.

वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे कोलकात्यात मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकार यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात असताना एक विचित्र आयडिया त्यांना सुचली. मात्र हा एकच पर्याय तेव्हा कोलकात्याला वाचवू शकत होता. म्हणून ब्रिटिशांनी तो सर्वत्र लागू केला. हा पर्याय म्हणजे ‘ब्लॅक आउट’.

ब्लॅक आउट म्हणजे रात्री संपूर्ण शहर काळोखात माखून निघेल याकडे लक्ष देणं. रात्री हल्ले होत असल्यामुळे काळा रंग हाच एक रंग होता जो दिसू शकत नव्हता. म्हणून रात्र झाली की कोलकात्यातील सगळ्या लोकांना रंगीत वस्तू काळ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लोकांनी त्यांच्या गाड्यांच्या लाईट्स, घराच्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवल्या. ज्या वस्तुंना रंगवता येत नव्हतं त्यांना काळ्या कापडानं झाकल्या जायचं. अशा प्रकारे संपूर्ण शहर काळोखात जायचं.

पण एक मुद्दा होता तो म्हणजे व्हिक्टोरिया मेमोरियलचा. ही वास्तू इतकी पांढरीशुभ्र आणि चमकदार होती की रात्रीही तिचा प्रकाश जाणवायचा. अशात तिला उध्वस्त होण्यापासून थांबवायचं होतं. खूप विचार केल्यानंतर शेवटी ब्रिटिश सरकारने १९४३ साली एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जपानी सैन्याच्या आक्रमणापासून व्हिक्टोरिया मेमोरियलला लपविण्यासाठी या वास्तुशिल्पीय चमत्काराला पांढऱ्याचं काळं करण्यात आलं. व्हिक्टोरिया मेमोरियलला काळ्या रंगाने रंगवल्या गेलं.

शहराला वाचवण्यासाठी ही ब्रिटिशांची आयडिया जपानी सेनेला कळू नये म्हणून व्हिक्टोरिया मेमोरियल आणि शहराच्या जवळपास फोटोग्राफी करण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आला. आणि म्हणूनच या ऐतिहासिक वास्तूचा इतका मोठा क्षण कुणालाही नजरेनं बघता येत नाही. गूगल तर काय इतिहासातील प्रसिद्ध पुस्तकांतही साधा एक फोटो आपल्याला बघायला भेटत नाही. 

युद्ध संपल्यानंतर व्हिक्टोरिया मेमोरियलला परत त्याच्या मूळ रूपात आणलं गेलं होतं. व्हिक्टोरिया मेमोरियल सोबत घडलेला इतका मोठा प्रसंग इतिहासात दडून राहिला आहे. जो लोकांपर्यंत पोहोचला तर त्यांना आश्चर्य वाटत. पण त्याची साक्ष मागितली तर भेटत नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.