मराठ्यांच्या भितीने महाराष्ट्रापासून २,००० किलोमीटर दूरवर बांधण्यात आलेला मराठा डीच

अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर मराठ्यांची घोडी उधळत होती. दक्षिणेस फत्तेसिंहबाबा भोसले, सरदार रास्ते, पटवर्धन तर उत्तरेस बाजीराव पेशवे, पिलाजीराव जाधव, खंडेराव दाभाडे, मल्हारबा होळकर, राणोजी शिंदे सरदार यांच्या तलवारी पराक्रम गाजवत होत्या..

पूर्वेस मात्र एकच व्यक्ती धुमाकूळ घालत होता..

त्याचे नाव म्हणजे नागपूरकर रघुजी भोसले..

रघुजी आणि त्यांचा सरदार भास्कर पंडित उर्फ भास्कर कोल्हटकर या दोघांनी ओडिशा, बंगालचा प्रांत जिंकून आजच्या बांगलादेशच्या सीमेपर्यंत मराठ्यांचे साम्राज्य नेऊन ठेवले. ओडिशा मधील कोणार्कचे सुर्यमंदिर या भोसल्यांमुळे उजेडात आले.

पुरीची यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आणि बंगाल मधल्या दुर्गा पूजेस राजाश्रय मिळाल्यामुळे तिचे महत्व अबाधित राहिले ते नागपूरकर भोसल्यांमुळेच. या पराक्रमी मराठ्यांच्या भीतीने कलकत्ता शहरात एक खंदक तयार करण्यात आला.

त्याचीच ही गोष्ट..

सन १७४२ च्या एप्रिल महिन्यात भास्करराम कोल्हटकर यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांच्या फौजा बंगाल प्रांतात चौथाईसाठी घुसल्या. त्यावेळी बंगालचा नवाब होता ‘अलीवर्दीखान’. मराठ्यांच्या जबरदस्त माऱ्यापुढे सैन्याच्या रेट्यापुढे त्याचा काहीच उपाय चालला नाही.

मराठ्यांच्या चौफेर हल्ल्याने त्रस्त झालेल्या नवाबाने अखेर पळ काढला आणि तो कटव्याला जाऊन पोचला. मराठे येथेच थांबले नाहीत तर त्यांनी हुगळी शहरावर जोरदार हल्ले करून किल्लाच आपल्या ताब्यात घेतला.

इकडे, आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इंग्रजांना साकडे घालून शहराभोवती एक खंदक खोदण्याची योजना मांडली.

नवाब आणि इंग्रजांच्या मदतीने तब्बल २५ हजार रुपये खर्च करून काम सुरू झाले. किल्ल्याच्या दरवाज्यापासून मोठ्या तलावापर्यंत जाणारा एक खंदक बांधून पूर्ण केला. सुरवातीला ७ मैल लांबीचा खंदक खणण्याचे ठरले. ७००-८०० कामगार ६ महिने खोदकाम करत होते. पण, मराठ्यांनी त्यानंतर कधीच कलकत्तावर हल्ला केला नाही आणि तो खंदक कधीच उपयोगात आला नाही.

पुढे लॉर्ड वेलस्लीच्या आदेशाने तो खंदक बुजवण्यास सुरुवात झाली आणि कालांतराने त्या खंदकावर कलकत्ता शहरातील आधुनिक रस्त्यांचे जाळे उभे राहिले. तब्बल 55 वर्षे तो खंदक तसाच पडून होता.

मराठ्यांनी भरपूर वेळेस बंगालवर स्वारी केल्या. लाखावर सैन्याची कत्तल झाली. प्रचंड महसूल गोळा केला. कलकत्तामध्ये इंग्रजांनी आपले पाय रोवयला सुरुवात केली होती.. त्यामुळे या खंदकाची निर्मिती करण्यासाठी इंग्रजांनी दोन्ही हात मोकळे सोडले होते.

आजही कलकत्त्याला हा भाग ‘मराठा डीच लेन’ म्हणून ओळखला जातो.

आजही या भागात मराठे भरपूर प्रमाणात राहतात. त्यांचे राहणीमान, संस्कृती, भाषा सगळं काही बंगाली असले तरीही त्यांच्या धमन्यातून वाहणारे रक्त पराक्रमाचा वारसाच सांगतात. पुढे, भास्कर पंडितला अलीवर्दीखानाने दग्याने मारले. त्यांच्या मृत्यूनंतर रघुजी भोसलेंनी बंगालवर केवळ 2 ते 3 वेळेस स्वाऱ्या केल्या. या भास्कर पंडितांमुळे मराठ्यांनी आजच्या बांगलादेशमधील ‘ढाका’ शहराच्या अलीकडे 50 किमी पर्यंत मजल मारली होती..

भारतात मराठ्यांपासून सुरक्षित राहावे म्हणून अठराव्या शतकात दोन मोठ्या व्यापारी शहरांमध्ये खंदक खोदण्यात आले. तेही थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळातच. मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती थोरले शाहू महाराज आणि त्यांचे निष्ठावान सेनापती रघुजी भोसले, भास्कर पंडित यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Pradeep Joshi says

    यामुळे तेथील लोक मराठी माणसाला मारणारे समजतात. खुनी म्हणून हिणवले जाते. ४लाख माणसे मारली गेली. त्यामुळे बोरजी अस हिणवले जाते. येव्हडा अत्याचार भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आहे. याचे आपण भान ठेवले पाहिजे. मी तिथे काम केले आहे. तेथील भाषेत यावर कविता केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील लोकांना चांगले असं काही नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.