कोमागाटा मारू प्रकरण ज्याबद्दल कॅनडाच्या पंतप्रधानांना माफी मागायला लागली होती…

२०१८ ला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते खासकरून अमृतसर गेले होते. आता तुम्ही म्हणाल असे कित्येक विदेशी नेते भारतात येऊन गेलेत, त्यात नवीन काय?

तर नवीन काही नाही पण, ते अमृतसरला गेले होते या मागे १०० वर्षापेक्षा जास्त जुनी घटना आहे. याच घटनेबाबत २०१६मध्ये ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत अधिकृतपणे माफी देखील मागितली होती.

हि घटना होती कोमागाटा मारू.

तर झालं असं होत की,

भारतीय वंशाचे सुमारे १४ लाख आज घडीला लोक कॅनडामध्ये राहतात, परंतु स्वातंत्र्यापूर्वी मात्र भारतीयांना तेथे स्थायिक होण्याची परवानगी नव्हती. भारतीय तिथं कामाच्या शोधात तर जायचे, पण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथं जाण्याची परवानगी नव्हती.

आशियाई आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांना येथे येण्यापासून रोखण्यासाठी त्यावेळच्या कॅनेडियन सरकारने कायदे केले होते.

हा कायदा होता ‘कंट्यूनिअस पॅसेज ऍक्ट’. म्हणजेच, जर एखादे जहाज समुद्रात न थांबता कॅनडाच्या किनारपट्टीवर पोहोचले, तरच त्याला कॅनडामध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.

१९१४ मध्ये, कोमागाटा मारू नावाच्या जहाजात ३०० हून अधिक भारतीय प्रवासी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया किनाऱ्यावर पोहोचले. हे जहाज गदर पक्षाशी संबंधित असलेल्या गुरदीत सिंगने भाड्याने घेतले होते.

हाँगकाँगहून थेट प्रवास करून हे जहाज कॅनडाच्या ब्रिटिश राजवट असणाऱ्या भागात पोहोचले. भारतीयांचा विश्वास होता की, ते त्यांच्या उपजीविकेसाठी ब्रिटिश राजवट असलेल्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळेच लोक कॅनडाला त्या भागात पोहोचले.

  पण वंशवादाचे पुरस्कर्ता असणाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या लोकांना इथे येऊ द्यायचे नव्हते.

२३ मेला व्हँकुव्हरला आलेले हे जहाज तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर दोन महिने ठेवण्यात आले होते आणि त्यांना कॅनडामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. कोमागाटामध्ये असलेल्या ३७६ भारतीय प्रवाशांपैकी फक्त २४ जणांना कॅनडा सरकारने व्हँकुव्हरमध्ये उतरण्याची परवानगी दिली.

१९१३ मध्ये, कॅनडा आणि अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी भारतीयांच्या गदर पार्टीने कॅनेडियन सरकारवर दबाव टाकला की, त्यांनी तिथल्या प्रवाशांना खाली उतरवावे, तरीही दोन महिने किनाऱ्यावर ठेवल्यानंतर त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. समुद्रात सुमारे सहा महिने प्रवास केल्यानंतर जहाज कोलकाताच्या बंदरावर पोहोचले.

कोमागाटा मारू समितीच्या तपास अहवालानुसार हे जहाज सप्टेंबर १९१४ मध्ये कोलकाताजवळील बुज बुज बंदरात पोहोचले. बंगाल सरकारच्या प्रशासनाने ठरवले की जहाजावरील सर्व लोकांची आधी ओळख पटवली जाईल. यासाठी त्यांना हावडा आणि कलकत्त्यात न पाठवता ट्रेनने पंजाबला नेले जाईल.

पण त्यासाठी फक्त ६२ प्रवाशांनी तयारी दर्शवली. बाकीच्यांनी विरोध केला आणि नंतर २९ सप्टेंबर १९१४ रोजी प्रवासी आणि पोलीस यांच्यात गंभीर संघर्ष झाला.

ही चकमक इतकी भीषण होती की, लष्कराला पाचारण करावे लागले. प्रवाशांवर गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये २० शीख यात्रेकरू ठार झाले. या चकमकीत एक पोलीस अधिकारी, एक रेल्वे अधिकारी, पंजाब पोलिसांचे दोन अधिकारी, दोन भारतीयांचाही मृत्यू झाला.

कोमागाटा मारू घटनेवर बराच गदारोळ झाला. एक समिती स्थापन करण्यात आली ज्याने डिसेंबर १९१४ मध्ये आपला अहवाल सादर केला. यात ३२१ प्रवाशांचा उल्लेख आहे जे कोमागाटा मारूहून बुज बुजला पोहोचले होते. यानुसार, ६२ लोकांना रेल्वेने पंजाबला पाठवण्यात आले. २० प्रवासी ठार झाले. २११ प्रवाशांना अटक करण्यात आली तर २३ प्रवासी फरार झाले.

पण या संपूर्ण तुकडीचे प्रमुख गुरदीत सिंग यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात ब्रिटिश सैनिकांनी केली. 

त्यांनी लिहिले,

‘आम्ही सर्व प्रार्थनेसाठी जमलो होतो. गुरु ग्रंथ साहिब मध्यभागी ठेवण्यात आले. पण एका पोलिसाने मध्येच घुसून काठी चालवली. त्यावर सरदार कमल सिंह यांनी त्यांच्याकडून काठी हिसकावली. हे पाहून आणखी एक पोलीस जमावाकडे पोहचला, ज्याला ग्रंथीने गुरु ग्रंथ साहिबपर्यंत पोहोचण्या पासून रोखले. त्यानंतर तिसऱ्या पोलिसांनी गोळीबार केला. कोणताही इशारा न देता गोळीबार करण्यात आला.

या घटनेनंतर ब्रिटीश राजवटीविरोधात भारतीयांमध्ये प्रचंड संताप होता. असे म्हटले जाते की, या कोमागाटा मारूच्या घटनेने स्वातंत्र्यलढ्याला अधिक तीव्र केले होते.

याच घटनेबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सभागृहात माफी मागितली होती.

कोमागाटा मारूवर स्वार असलेले प्रवाशांचे वंशज आणि शीख समुदायाची माफी मागताना ते म्हणाले की, ते ज्या वेदना आणि दुःखातून गेलेत त्यांना कोणताही शब्द मिटवू शकत नाहीत. त्यांनी या घटनेसाठी तत्कालीन कॅनेडियन सरकारच्या कायद्याला जबाबदार ठरवले आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूबद्दल त्यांना खेद असल्याचे म्हंटले.

कॅनडा सरकारने कोमागाटा मारू घटनेच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीटही जारी केले होते.

हे ही वाचं भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.