नाशिकचा कोंडाजी चिवडा खाऊन पंतप्रधान देखील हरखून गेले होते.

चिवडा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं प्रकरण. दिवाळी आहे खा चिवडा, पाहुणे आलेत खा चिवडा, शाळेतून आलेल्या कार्ट्याला भरव चिवडा. प्रवासाला जायचं आहे बांध चिवडा. चिवडा  म्हणजे सर्वमान्य सर्वव्याप्त झालेला पदार्थ.

पण या चिवड्याला साता समुद्रापार पोहचवलं ते नाशिकच्या कोंडाजी चिवड्याने. 

गोष्ट आहे १९१८ सालची. नाशिकमधल्या भद्रकाली भागात  कोंडाजी गुणाजी वावरे हे एका टोपलीत पोह्याचा मसाला चिवडा विकायचे. तिथेच जाधव  वाड्यात त्यांचं घर होतं, घरी खमंग चिवडा बनवायचा आणि दारोदारी नेऊन विकायचा असा त्यांचा नेहमीच शिरस्ता.

अतिशय चमचमीत व चटकदार असलेल्या या चिवड्याने अल्पावधीत नाशिक मध्ये ओळख निर्माण केली. लोक कोंडाजी कधी चिवडा घेऊन आपल्या भागात विकायला येतात याची वाट पाहू लागले. त्यानंतर गंगा घाट, गाडगे महाराज पुलावर हा चिवडा मिळू लागला. 

कोंडाजी वावरे यांनी चिवड्याची चव आणि गुणवत्ता याची एक परंपरा निर्माण केली. त्यांच्या पुढच्या पिढीने ती जोपासली, एवढंच नाही तर मार्केटिंग करून या चिवड्याला नाशिकच्या बाहेर नेऊन पोहचवलं.

याबाबतची एक आठवण सांगितली जाते.

१९५० साली गुजरातच्या गांधीनगर येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन भरले होते. देशभरातून काँग्रेस वासी या अधिवेशनासाठी गोळा झाले होते. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील होते. नाशिकचे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब हिरे म्हणजे महाराष्ट्र  काँग्रेसचे मोठे प्रस्थ. मुख्यमंत्री पदा साठी त्यांची दावेदारी सांगितली जायची.

या भाऊसाहेब हिरे याना आपल्या नाशिकच्या कोंडाजी  चिवड्याचं  भारी अप्रूप होतं . आपल्या चिवड्याची चव देशभर पोहचावी असं त्यांना वाटायचं. यासाठी काँग्रेसचं अधिवेशन हा चांगला मौका आहे हे त्यांनी ओळखलं. गांधीनगर ला येताना ते वावरे यांना कोंडाजी चिवडा घेऊन सोबत यायला सांगितलं.

भाऊसाहेब हिरे यांनी त्या अधिवेशनात खुद्द नेहरूंना हा आपला नाशिकचा चिवडा खाण्याचा आग्रह धरला.

पंतप्रधानांनी चिवड्याची चव चाखली, त्यांना तो खमंग चिवडा प्रचंड आवडला. नेहरूंनी स्वतःच्या खिशात हात घालून पैसे काढले व वावरे याना तिथे उपस्थित असलेल्या सर्वाना चिवडा खाऊ घालायला सांगितले.

 कोंडाजी चिवड्या मुळे नाशिकला नवीन ओळख मिळाली.

आज नाशिक मसाला चिवडा, नाशिक मखमल चिवडा , मका पोहा चिवडा, दल-मठ,भेल, अशा विविध प्रकारात उपलब्ध आहे. कोंडाजी चिवड्याच्या चटकदार चवीमुळे त्याचे नाव देशभर पसरले आहे. चिवडा तयार करण्यासाठी विविध ठिकाणाहून कच्चा माल आणला जातो.घोटीवरून भाजके पोहे सिन्नरहून काटेरी पोहे, सुरतहून मका पोहे , सांगलीहून भडंग पोहे आणि जळगावहून डाळ्या अशी आयात केली जाते. मात्र यासाठी लागणारा मसाला ते स्वतःच तयार करतात.

फक्त कोंडाजी नाही तर माधवजी का बढिया चिवडा, गडकरी चिवडा ,मकाजी चिवडा असे अनेक चिवडे फेमस झाले. नाशिकला तीर्थाटनाला येणार प्रत्येक भाविक, कामासाठी येणारे नोकरदार चिवडा घेऊनच आप आपल्या घरी जातात.

इतकेच नाही तर परदेशी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बॅगेत कोंडाजी चिवड्याची पाकिटे हमखास असतात. आता तर कोंडाजी चिवडा ऑनलाईन मिळू लागलाय. एकेकाळी टोपलीतून विकला जाणाऱ्या चिवड्याची ओळख एक ब्रँड बनली आहे आणि ती सातासमुद्रापार पोहचली आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.