कोकण रेल्वे म्हणजे वेड्या माणसांनी पाहिलेलं वेडं स्वप्न होतं.

काजू आंबा नारळानी बहरलेला कोकण एकेकाळी अंधारात पिचलेला होता. ना तिकडे उद्योगधंदे होते आ पश्चिम महाराष्ट्रासारखी हमखास पैसा देणाऱ्या ऊसाची शेती होत होती. नोकरी साठी कोकणातले चाकरमाने मुंबईचा रस्ता धरायचे. एवढच काय कोकणात धड रस्ते होते ना रेल्वे होती. कोकणातील डोंगरदर्‍या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते.

एक माणूस होता ज्याने पहिल्यांदा हे स्वप्न पाहिलं. त्याच नाव अर्जुन बळवंत वालावलकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळच्या वालावल गावचे सुपुत्र. घरची परिस्थिती म्हणजे कोकणातल्या इतर घरापासून काही वेगळी नव्हती. मात्र त्यातूनही जिद्दीन शिक्षण पूर्ण केलं. स्वातंत्र्यपूर्व इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागले. देशभर पसरत चाललेलं रेल्वेच जाळं पाहून त्यांना आपल्या कोकणात रेल्वे येत नाही याचं वाईट वाटत रहायचं.

रेल्वे आल्याशिवाय कोकणी माणूस वर येणार नाही हे वालावलकर यांच्या मनात पक्कं बसल होतं. त्यांनी सर्वप्रथम वर्तमानपत्रातून कोकणात रेल्वे शक्य आहे हे लेख लिहिण्यास सुरवात केली. सुरवातीला त्यांना अनेकांनी टोमणे मारले,

“काय हे खुळेपणा करताहेत; डोंगरदऱ्यांत कोण देणार त्यांना रेल्वे? अरे, काय हा वेडेपणा आहे”

पण कोकणी माणसात असते ती चिकाटी त्यांच्यातही होती. त्यांनी कोकण रेल्वेची मागणी चालूच ठेवली. स्वातंत्र्यानंतर तर त्यांनी कोकण रेल्वेवर एक छोटी पुस्तिकाच छापून आणली.

म्हणतात ना एका छोट्याशा पावलाने देखील खूप मोठी दिशा बदलू शकते. अगदी तसच झालं. वालावलकर यांच्यामुळे कोकण रेल्वे शक्य आहे ही संकल्पना रुजू लागली. कोकणातल्या नेत्यांनी लोकसभेत ही मागणी रेटायला सुरवात केली.

यात पुढे होते बॅरीस्टर नाथ पै.

साधारण १९६९ च्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सरकार लोकसभेत अल्पमतात गेले.

या संधीचा फायदा घेऊन बॅ. नाथ पै यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोकणात रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी तरतूद नाही या कारणास्तव एक रुपयाची कपात सुचविली होती.

संसदीय प्रथेमध्ये एक रुपयाच्या कपात सूचनेला इतके महत्त्व आहे, की ती मंजूर झाल्यास तो सत्तारूढ पक्षाच्या मंत्रिमंडळावर अविश्वास मानला जाऊन मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो, परंतु संघटना काँग्रेसच्या खासदारांनी या कपात सूचनेवर तटस्थता स्वीकारल्याने ही कपात सूचना नामंजूर झाली.

धूर्त इंदिरा गांधी या घटनेने सावध झाल्या. त्यांनी बॅ. नाथ पै यांना तत्काळ बोलावून त्यांचा विचार काय आहे, हे जाणून घेतले आणि तत्काळ कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले.

कोकण रेल्वेच्या गाडीला पहिला धक्का मिळाला. 

मात्र यानंतरही लालफितीच्या कारभारात गाडी पुढे सरकलीच नाही. दरम्यान आणिबाणीचा अंधारमी कालखंड येऊन गेला. त्यानंतर इंदिराजींना हटवून आले जनता पक्षाचे सरकार. नाथ पै यांचा वारसा चालवणारे समाजवादी नेता मधु दंडवते हे केंद्रीय रेल्वेमंत्री बनले. रेल्वेमंत्री या नात्याने त्यांनी लोकसभेला सादर केलेल्या रेल्वेच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आपट्यात अडकून पडलेली कोकण रेल्वे पुढे मार्गस्थ केली.

पुढच्या दशकभरात कॉंग्रेस सरकार आल्यावर परत कोकण रेल्वेला ब्रेक बसला.

कोकण रेल्वे म्हणजे खरोखर एक दिव्य होतं. मुंबईपासून ते मंगळूरपर्यंत भारताची अरबी समुद्रावरची दोन महत्वाची बंदरे जोडणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. अनेक खडतर डोंगररांगा, दरीखोरे, छोट्यामोठ्या नद्या पार करून हा प्रकल्प उभारायचा होता.  शेकडो पूल, बोगदे बांधावे लागणार होते.

प्रचंड मनुष्यबळ, पैसा, आधुनिक तंत्रज्ञानाची साथ लागणार होती, कॉंग्रेसच्या काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही अशक्यप्राय गोष्ट वाटत होती.

कोकणच्या नशिबाने १९८९ साली सरकार बदलले आणि कोकण रेल्वेचे प्रणेते मधु दंडवते अर्थमंत्री बनले. त्यांच्याच विचारांचे कोकणचे सुपुत्र जॉर्ज फर्नांडीस रेल्वेमंत्री बनले.

जॉर्ज फर्नांडीस यांना देखील आपलं मेंगलोर गाव मुंबईशी जोडायचं होतं. त्यांनी कंबर कसली. अर्थ मंत्रालय मधुजींच्या ताब्यात असल्यामुळे कोकण रेल्वेसाठी आता कोणताच अडथळा असणार नव्हता. फर्नांडीस यांनी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केली. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये तिचं मुख्यालय स्थापन केलं.

आणि याच अध्यक्षपद दिलं मेट्रोमन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ई.श्रीधरन यांना.

श्रीधरन यांनी आपली नियुक्ती झाल्या झाल्या परत एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सर्वेक्षण करत होते काही कावासाकी बाईकवर बसलेले तरुण. कोकणातल्या घनदाट जंगलात, खडतर दरीखोऱ्यात रस्ते नसलेल्या प्रदेशात हे कावासाकी बाईकवाले श्रीधरन यांचे शिष्य पोहचायचे. आपल्या सोबत जपून आणलेली मोजमापाची यंत्रे वापरून सर्वेक्षण करायचं.

दिवसाला शंभर रुपये भत्ता आणि बाईकमध्ये पेट्रोल एवढ्या बळावर या तरुणांनी शेकडो किलोमीटर पालथे घातले आणि फायनल सर्वेक्षण पूर्ण केलं. १५ सप्टेंबर १९९० साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

मग सुरु झाली निसर्गाशी लढाई.

श्रीधरन यांचा दांडगा अनुभव, त्यांच्या इंजिनियर्सनी लावलेलं डोक आणि हजारो कामगारांनी घेतलेली मेहनत यामुळे  अशक्य वाटणारी कोकण रेल्वे शक्य वाटू लागली.  रेल्वे उभारणीसाठी येणार्‍या खर्चासाठी कर्जरोखे काढण्यात आले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. यातून ४३ हजार विस्थापीत झालेल्या कुटुंबाना नुकसान भरपाई देण्यात आली.

काही ठिकाणी कब्रस्थानसुद्धा उचलून विस्थापित केली. पेडणे या गावी गावकर्यांना नवीन विहीर बांधून दिली. इतक्या छोट्यामोठ्या गोष्टींचा विचार करून साकार होत असलेल हे एक मानवनिर्मित आश्चर्यच होतं.

भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले.

परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली.

साडेसातशे किलोमीटर लांबीचा हा मार्ग त्यावरअसलेले ९२ बोगदे आणि १८१९ पूल आहेत. सुमारे १० टक्के मार्ग बोगद्यातून जातो. सर्वात मोठा साडेसहा किमी लांबीचा बोगदा रत्नागिरी-संगमेश्वर रेल्वेमार्गावर करबुडे येथे बांधला, तर सर्वात उंच ६५ मीटर उंचीचा पूल रत्नागिरीजवळ पानवल येथे उभारण्यात आला.

कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली.

रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षां ३ महिन्याचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र, गोवा कर्नाटक आणि केरळ या अखंड पसरलेल्या पश्चिम किनाऱ्यावर समांतर धावणारी जगातल्या सर्वात सुंदर मार्गापैकी एक असलेली कोकण रेल्वे हे एक अशक्यप्राय स्वप्न होतं.

पण वालावलकर यांना पडलेलं हे स्वप्न बॅरीस्टर नाथ पै यांच्यापासून ते मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडीस, ई श्रीधरन यांच्या पर्यंत अनेकांच्या प्रयत्नातून साकार झाल.

९ ऑक्टोबर १९९९ रोजी केंद्र सरकारने एबी वालावलकर यांच्या आठवणीखातर तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या हस्ते तिकिटाच प्रकाशन केलं. आज कोकण विकासाच्या रुळावर येतोय यात अशा अनेक महापुरुषांच्या दूरदृष्टीचा सहभाग आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Ravindra Kadam says

    Superb……. Concept…… Nice Kokan

Leave A Reply

Your email address will not be published.