गाड्यांच्या गर्दीत सायकल दिसली आणि लयभारी वाटलं.

आज मुहूर्त आहे. आम्ही ज्योतिष्याकडं चौकशी केली तेव्हा तो म्हणाला आजचा दिवस चांगला आहे म्हणून सगळे नेते आज फॉर्म भरायला लागलेत. आत्ता आपण घरात गाडी घेवू नायतर मोबाईल घेवू प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर करतो. एखादा म्हणू शकतो पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत का? पण भिडूंनो तस नसतय. श्रद्घा नावाची देखील एक गोष्ट असते. जस काहीतरी चांगल करताना देवाला जातात तसच चांगला दिवस बघतात एवढी साधी गोष्टय ती. 

असो पण विषय तो नाही. वेगवेगळी नेतेमंडळी वेगवेगळा स्टंट करत आज फॉर्म भरतील. कोणी किती माणसं गोळा केली हा कौतुकाचा विषय ठरणार आहे. यात कोणताच प्रश्न नाही.

पण मुद्दा आहे अर्ज करताना कोण काय करतय ?

आम्ही चौकशा चालू केल्या, तेव्हा समजल.

कोल्हापूर दक्षिणचे कॉंग्रेसचे उमेदवार ऋतूराज पाटील सायकलवरून फॉर्म भरायला जाणारायत.

हे वाचून काय वाटलं. लोक म्हणतील हा स्टंट आहे. काहीजण म्हणतील, मग रोजच सायकल वापरायला काय होतय. काहीजण म्हणतील बातम्यात येण्यासाठी स्टंट चालूय. आमच्या ऑफिसवरच्या एका बोलभिडू कार्यकर्त्याने देखील अशीच प्रतिक्रिय दिली मग विचार केला लोकांना सायकल कळली पाहीजे…!!

अर्ज भरायला जाणं याच्यातच एक बातमीमुल्य असतं. त्यामुळे बातमी व्हावी म्हणून अस काही करण्याची सहसा गरज नसते. महत्वाचा मुद्दा असतोय तो अर्ज भरायला जाताना उमेदवार कसा जातो. त्यावर तो कुठल्या गटाच, कोणत्या लोकांच प्रतिनिधित्त्व करतो हे तो ठामपणे लोकांपुढे मांडू शकतो. 

म्हणजे उमेदवार कसा आहे तो पुढच्या लोकांकडे कसा बघतो, त्याची विचारसरणी काय आहे हे लोकांपर्यन्त ठसठशीतपणे घेवून जावू शकतो. 

तसाच इथे सायकलचा विषय आहे. ऋतूराज पाटलांनी सायकलच का निवडली तर त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी क्रिडानगरी असणाऱ्या कोल्हापूरच प्रतिनिधित्त्व करतो. कोल्हापूरची ओळख कुस्ती सोबतच कित्येक खेळात आहे. भारतातला सर्वाधिंक आर्यनमॅन असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. इथे तरुणाच पहिलं लक्षण म्हणजे फिट असणं हे असतय.

थोडक्यात सांगायचं झालं तर फिट आणि हिट हे कोल्हापूरकरांच समीकरण आहे. 

मग सायकलच का..? 

सायकलच का. आत्ता मग काय पुशअप मारत जायचं का? इथे विषय प्रवासाचा आहे. माणूस घरातून निघून कलेक्टर ऑफिसला जातोय. कोल्हापूरातला शहरातला प्रवास. अशा वेळी प्रदूषण न करणारी सायकल वापरली तर भारीच आहे. प्रत्येक गोष्टीला सायकल समर्पक उत्तर आहे. 

आत्ता याबद्दल अधिक चांगल कोण सांगेल म्हणून आम्ही सायकल रिपब्लिकच्या अभिजीत कुपाटे यांना फोन केला. त्यांना सांगितलं कोल्हापूरचे ऋतूराज पाटील आज सायकलवरून फॉर्म भरायला जातायत, 

तेव्हा अभिजीत कुपाटे म्हणाले, 

” मी गेली सात ते आठ वर्ष सायकल वापरतोय. मी पण मुळचा कोल्हापूरचा. आज हिंजवडी पासून घर असा माझा रोजचा चाळीस किलोमीटरचा प्रवास होतो. गाडीवरून मला दिड तास लागायचे. सायकलवरून मी पाऊण तासात पोहचतो. सायकलच्या नादामुळे माझे महिन्याचे पेट्रोलचे कित्येक रुपये वाचले आहेत पण इतके वर्ष सायकल चालवल्यामुळे एक गोष्ट लक्षात येतेय की फिट राहिलो त्याला कारण फक्त आपली सायकल आहे. “

तर हे अस असतय सगळं. पण हे कळणारा नेता असणं देखील तितकच महत्वाच असतय. तरुण असल्यामुळे तरुणांना काय सांगितल पाहीजे आणि काय नाही असा नेता असावा. ऋतूराज पाटलांनी नेमकं हे कृतीतून करुन दाखवलय. कोल्हापूरात सायकल वापरण्यास लोकांनी सुरवात केलीच होती पण ऋतूराज पाटलांसारख्या विचारी तरुणामुळे त्याला बळ मिळतय. 

Satej D. Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 2, 2019

ऋतूराज पाटील कोल्हापूरातल्या तरुणांच संघटन बांधण्यसाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षीपासून ते आणि त्यांचे काका सतेज ऊर्फ बंटी पाटलांनी मिळून ब्रॅण्ड कोल्हापूरचा संकल्प हाती घेतला. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कोल्हापूरची ओळख सातासमुद्रापार घेवून गेलेल्या तरुणांना ब्रॅण्ड बनवण्यात आलं. कोल्हापूरची हि ओळख काका पुतण्याने मिळून पुढे आणली.

नको तिथे टांग मारून राजकारण करण्याच्या जमान्यात ऋतूराज पाटील सायकलवर टांग मारून आपल्या तरुणांना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत असतील तर त्याच मनापासून कौतुक करावं वाटतं.

आमचं तर असच मत आहे की, यापुढे प्रत्येक नेत्याने सायकल वापरायला हवी. अडीअडचणीला का होईना एखाद्या नेत्याला किमान दोन किलोमीटर सायकल चालवता येत असेल तर तो तुमच्यासाठी धावून येईल म्हणायला हरकत नाही. निवडणुकीच्या नियमात किमान दोन किलोमीटर सायकल चालवून दाखवण्याचा नियम देखील घालून द्यायला हरकत नसावी.

आत्ता ऋतूराज पाटलांच या भन्नाट कामासाठी कौतुक, आणि एक इच्छा.

ते विजयी झाले तर विजयी मिरवणूक देखील अशीच सायकलवरून काढावी. कारण अशा राजकारणाची खरच पोरांना गरज आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.