नानासाहेब पेशवे कोल्हापूरच्या छत्रपतींना संपवणार होते.
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजाचां परिपत्य करून शिवरायांचे मराठा साम्राज्य खतम करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला. पण त्याला जमले नाही. संभाजी महाराजांनंतर धाकटे राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठमोळ्या फौजांनी औरंगजेबाला छळले आणि राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर ही ताराबाई महाराणीसाहेब यांच्या जिद्दी नेतृत्वाखाली मराठ्यांनी हार मानली नाही.
चिवट लढा सुरूच ठेवला. जवळपास पंचवीस वर्षे मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न करत दक्षिणेत राहिलेला औरंगजेब अखेर याच मातीत मेला.
जाताजाता मात्र त्याने मराठा साम्राज्याला एक शाप देऊन गेला. भाऊबंदकी !!
औरंगजेबाने मृत्यू पूर्वी जाताना संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची आपल्या अटकेतून सुटका केली. पुढे राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई व शाहूराजे यांच्यात छत्रपती पदासाठी यादवी युध्द झाले. यातूनच पुढे सातारा व करवीर अशा दोन गाद्यामध्ये मराठा साम्राज्याची शकले झाली. वारणा नदी या दोन्ही राज्यांची सीमा होती.
करवीरच्या गादीवर सन 1714 साली ताराबाईंच्या सवती राजसबाईचे पुञ संभाजी महाराज (दुसरे) हे बसले. या संभाजी महाराजांच्या महाराणी म्हणजे जिजाबाई. त्यांना करवीरकर जिजाबाई म्हणून इतिहासात त्यांची ओळख आहे.
करवीरच्या छत्रपतींच राज्य तसे पाहायला गेलं तर आकाराने लहान मात्र चोहोबाजूंनी शञूंनी वेढलेले. गोव्याच्या पोर्तुगीजांपासून ते निझामापर्यंत. त्यात संभाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या सैन्याची ताकद कमी पडायची.
सातारच्या गादीवरील शाहू छञपतींना शिंदे, होळकर असे एकाहून एक सरदार आणि बाळाजी विश्वनाथ, बाजीराव असे कर्तबगार पेशवे लाभले. त्यांच्या जोरावर उत्तरेतही मराठा साम्राज्याची दहशत निर्माण झाली.
साताऱ्याच्या छत्रपतींचे राज्य देशभर वाढत असता करवीर राज्य वारणेच्या पलीकडे जाऊ शकले नाही. याच काळात सातारकर छञपतींचे महत्वही कमी होत गेले व पेशव्यांचे प्रस्थ वाढत गेले. सातारकर छञपतींचा झेंड्याखाली पेशव्यांनी दौलत वाढवत नेली. करवीरकर छञपतीनीं माञ आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिले.
करवीरच्या संभाजी महाराजांस त्याकाळच्या प्रथेप्रमाणे 7 पत्नी होत्या पण त्यातही चौथी राणी जिजाबाई मोठ्या कर्तृत्ववान व त्यामुळेच महाराजांच्या लाडक्या होत्या. राज्यकारभारात त्या महाराजांना मदत करत.
पुढे 1745 नंतर करवीर राज्याचा सर्व कारभार व धोरण स्वत: ठरवू लागल्या. त्याकाळी सदाशिवराव भाऊ यांना लिहिलेल्या करवीरच्या छत्रपती म्हणतात की कोणतीही मदत हवी असल्यास राणीसाहेबांचा सल्ला घ्यावा.
करवीरकर छत्रपतींचे अनेक शत्रू होते. पण खरा धोका होता तो पुण्याच्या नानासाहेब पेशवे यांचा.
मुळात नानासाहेब पेशव्यांना करवीरकरांचे स्वतंत्र अस्तित्वच मान्य नव्हते. परंतू तसे उघडपणे न दाखवता संधीची वाट पाहत राहिले.
15 डिसेंबर 1749 रोजी सातारच्या शाहू छत्रपतींच निधन झालं. त्यांना मुलगा नसल्यामुळे सातारच्या गादीला वारस नव्हता. त्यांच्यानंतर दोन्ही भोसले घराणे एकत्र करून कोल्हापूरच्या संभाजी महाराजांना मराठा साम्राज्याचा छत्रपती बनवायचे असे अनेकांच्या मनात होते. पण नानासाहेब पेशव्यानी तसे होऊ दिले नाही. त्यांनी कोल्हापूरच्याच ताराराणीसाहेब यांचा नातू आलेल्या रामराजांना गादीवर बसवले.
या रामराजांच्या खरोखर भोसलेकुळातील असण्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या. याचंच फायदा घेऊन नानासाहेबाने त्यांना नामधारी छत्रपती ठेऊन सगळा कारभार स्वतःच्या ताब्यात घेतला. त्याचा करवीर संस्थान वरही डोळा होता .
पण कोल्हापूर गादी संभाळणाऱ्या जिजाबाई खंबीर होत्या. त्यांनी पेशव्याना कोल्हापूरमध्ये जास्त नाक खुपसू दिले नाही. उलट नानासाहेबांना हटवून सदाशिवरावभाऊला पेशवेपदी बसवता येईल का याची चाचपणी सुरू केली.
करवीरच्या संभाजी महाराजांनाही मूल नव्हते. पुढे सन 1760 साली त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांची दुसरी राणी कुसाबाई गरोदर होती. त्यांना पुञ होऊन करवीर गादीस वारस होईल अशी आशा जिजाबाईंना होती. पण कुसाबाईंना मुलगी झाली. दरम्यानच्या काळात पेशव्यांनी डाव साधला व करवीर राज्य खालसा करण्यासाठी इचलकरंजीचे घोरपडे, पटवर्धन या सरदारांबरोबर फौजा धाडल्या.
छञपतींचे निधन झाल्याचे ऐकून शोक समाचाराचे साधे पञही न पाठवता त्यांचे राज्यच खालसा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचा स्वार्थीपणा पाहून जिजाबाई संतापून गेल्या. पेशव्यांच्या ताकदीपुढे करवीर सारख्या छोट्या संस्थानाचा निभाव लागणे अशक्य होते.
पण खमक्या जिजाबाईंनी आपल्या फौजेची जमवा जमव केली व पेशव्यांच्या फौजांशी वारणेच्या काठावर लढाई केली!
नवलाची गोष्ट म्हणजे पेशव्यांच्या सरदारांच्या मोठ्या सैन्याला कोल्हापूरच सैन्य पुरून उरल.
याच दरम्यान उत्तरेत पानिपतात मराठे व अफगाणिस्तानचा अहमदशहा अब्दाली यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यात पेशव्यांच्या फौजांचा प्रचंड पराभव झाला. त्यांना मदत करण्यासाठी पुण्याहून निघालेले श्रीमंत नानासाहेब पेशवे रस्त्यात पैठण मध्ये अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यात मग्न असल्यामुळे वेळेत रसद पोहचवू शकले नाहीत. पराभवाच्या धक्क्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यानीं मात्र शहाणपणाचा निर्णय घेतला आणि जिजाबाई राणींना त्यांच्या इच्छेप्रमाणे करवीर राज्यास दत्तक घेण्याची संमती दिली.
सन 1762 साली खानवटकर भोसले घराण्यातील एका पुञास दत्तक घेऊन जिजाबाईंनी त्यास शिवाजी महाराज म्हणून गादीवर बसवले व त्याच्या नावे नंतर 10 वर्षे करवीरचे राज्य केले. जिजाबाईंमुळेच करवीरचे राज्य टिकले अन्यथा नानासाहेब पेशव्यानी ते गिळणकृत केले असते.
छत्रपती भोसले घराण्यातील एका राणीला आपल्या पतीच्या निधनानंतर आपलं राज्य वाचवण्यासाठी पेशव्यांशी युद्ध करावे लागले ही मराठेशाहीच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणावी लागेल.
संर्दभ :- मराठेशाहीचे अंतरंग
लेखक :- डाॅ. जयसिंगराव पवार
हे हि वाच भिडू.
या पोस्ट मधला इतिहास तद्दन खोटा आहे. उलट शाहू महाराजांना संपवण्यासाठी कोल्हापूरकर संभाजी निजामाकडे जाऊन राहिला होता.पेशवे मंडळी स्वामिनिष्ठ होती त्यांनी हे का खपवून घ्यावे?इतिहासाकडे पिवळा चष्म्यातून पाहू नये नाहीतर सगळं पिवळच दिसेल.तुम्ही असल्या मजकूराला प्रसिद्धी देता हे दुर्दैव आहे.ब्रिगेडी इतिहासकारांपासून कृपया दूर रहा