कोटा शहरात लाखों पोरं IIT करायला जातात त्यांच कारण ठरले “बन्सल सर”…

राजस्थानातील कोटा शहर. चंबळ नदीवर वसलेले एक भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक. ऐतिहासिक महाल, पौराणिक संग्रहालय, मंदिर आणि मोठी उद्यान ही कोटा शहराची संपत्ती. दुसरी ओळख सांगायची म्हणजे भारतातील वेगाने औद्योगिकीकरण होणारे शहर अशीही ओळख मिळाली आहे.

एका बाजूला शहरातील पुरातन स्मारक प्राचीनतेशी असलेले नातं सांगतात तर चंबळ नदीच्या तीरावर बनलेले हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट आणि मल्टी मेटल उद्योग हे आधुनिकतेशी ओळख करून देतात. त्यामुळे प्राचीनता आणि नाविन्यता यांचा अनोखा संगम इथे दिसून येतो.

अलीकडेच या शहराला वर्ल्ड ट्रेड फॉर्मच्या यादीत मानवी संख्येच्या बाबतीत जगातील सातवे शहर म्हणून स्थान मिळाले आहे.

आता कोटा शहराची तिसरी आणि सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे देशातील कोचिंग क्लासची पंढरी.

आपल्याकडे जसे MPSC करायची म्हंटले तर पुण्याशिवाय पर्याय नसतो अगदी तसेच JEE – NEET करणाऱ्या मुलांना कोटा शहरातील कोचिंग क्लासेशिवाय पर्याय दिसत नाही. या परिक्षांसाठीचा कोटा पॅटर्न राज्यात यशस्वी आहे. जणू आईआईटी, आणि मेडीकल कॉलेजमध्ये शिरण्याचा राजमार्गच.

त्यामुळे इथल्या सगळ्या कोचिंग क्लासेसची मिळून वार्षिक उलाढाल अंदाजे १ हजार कोटीच्या घरात आहे. आणि कोचिंग क्लास म्हणजे इथला उद्योग झाला आहे.

या हजार करोड रुपयांच्या उद्योगाचा पाया रचला तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून नोकरीला लागलेल्या आणि एका दुर्मिळ आजारामुळे ती सोडायला लागलेल्या,

वी. के. बन्सल यांनी.

इंजिनीअरींग पुर्ण झाल्यानंतर बन्सल १९७१ मध्ये कोटाच्या जे. के. सिंथेटिक फॅक्टरीमध्ये सहायक इंजिनिअर म्हणून रुजू झाले. कालांतराने १९८१ पासून त्यांनी थोडा बदल म्हणून दिवसभर ऑफिसवरून घरी आल्यानंतर ८ वी, १० वी, १२ वी या वर्गांचे घरगुती क्लासेस घ्यायला सुरुवात केली.

हळू हळू त्यांनी इंजिनियरींगच्या मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यातुनच १९८५ साली त्यांचा पहिला विद्यार्थी आयआयटीची परिक्षा क्वालिफाय झाला. बन्सल यांचा आत्मविश्वास देखील वाढला.

सगळं सुरळित चालू असतनाच अचानक १९९० मध्ये बन्सल यांना डिस्ट्रोफी नावाच्या आजाराने गाठले. आणि व्हीलचेअरवर बसून उर्वरित आयुष्य घालवावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सिंथेटिक फॅक्टरी मधून १९९१ साली निवृत्ती घेतली.

त्यानंतर घरी बसून काय करायचे हा प्रश्न सतत पडायचा. यावर मार्ग म्हणून त्यांनी घरातल्या घरात अधिकृत रित्या बन्सल क्लासेस प्रायवेट लिमीटेडची सुरुवात केली.

क्लासच्या चालू केल्याच्या पहिल्या वर्षीच बन्सल यांच्या १० विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी निवड झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या ५० विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी निवड झाली. यानंतर जी सुरुवात झाली ती झालीच ! आज बन्सल यांच्या कोचिंग क्लासचा १६ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे.

हजार करोड रुपयांचा उद्योग कसा उभा राहिला. 

बन्सल यांना मिळालेले यश पाहून कोटा मध्ये एका पाठोपाठ एक कोचिंग क्लासची सुरुवात झाली. त्यामुळे आज हेच शहर कोचिंग क्लासचे देशभरातील मुख्य केंद्र बनले आहे. इथे देशातील अनेक भागातुन मुल इंजिनीअर आणि डॉक्टर होण्याची स्वप्न घेवून येतात.

इथल्या प्रसिद्ध कोचिंग संस्थानचे रेजोनेंसचे मॅनेंजिग डायरेक्टर आर. के. वर्मा सांगतात,

कोरोनापूर्वी पर्यंत कोटामधील वेगवेळ्या कोचिंग क्लासमध्ये सव्वा चार ते चार लाख मुलं शिकत होती. एका मुलाची सरासरी फी १ लाख रुपये आहे. 

आर. के. वर्मा हे आपल्या करिअरच्या सुरुवातीला म्हणजे १९९५ पासून बन्सल यांच्या क्लासमध्ये फिजीक्स विषय शिकवत होते.

२००१ मध्ये त्यांनी काळाची पावलं ओळखत नोकरी सोडली आणि रेजोनेंस नावाचा आपल्या कोचिंग क्लासची सुरुवात केली. त्यांना देखील बन्सल यांच्या सारखेच यश मिळाले. आज त्यांच्या कोचिंगच्या देशभरातील तीस शहरांमध्ये शाखा आहेत. ज्यात ६० हजार विद्यार्थी शिकत आहेत.

वर्मा यांची आता कोटामध्ये स्वतःची खाजगी युनिर्व्हसिटी सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे एका कोचिंग क्लासचे रुपांतर एका संस्थेमध्ये जागा मिळेल.

पॅरलल बिझनेसचे मॉडेल…

कोटामध्ये छोट्या – मोठ्या क्लासेसची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे सहाजिकच खाजगी शिक्षकांसाठी हे एक बिझनेस मॉडेल बनले आहे.

मोठ्या क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना मोठी – मोठी पॅकेजेस मिळतात. यात अगदी वार्षिक २५ लाखापासून ते १ कोटी रुपयांचा समावेश असल्याचे रेजोनेंसचे वर्मा सांगतात.

आता क्लास आला म्हणजे पुस्तक विक्रेते आले. कोटा शहराच्या गल्ली गल्लीत पुस्तकांची दुकान उभी राहिली आहेत. दुसऱ्या बाजूला रिअल इस्टेटच्या व्यवसायाने देखील जोर पकडला. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल्स बांधण्यासाठी बिल्डर्समध्ये चढाओढ लागलेली असते.

जवाहरनगर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी भगवंतसिंह हिंगड सांगतात,

त्यांच्या एरियातील राजीव गांधी नगरमध्ये ५२५ हॉस्टेल्सच्या बिल्डींग आहेत आणि तिथे २५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी राहतात. सोबतच अनेक जण पेइंग गेस्ट म्हणून देखील राहतात.

आता हॉस्टेल्स सोबतच मेस मस्ट आहे. नाहीतर मुलं खाणार काय? त्यामुळे मेसचा व्यवसाय उभा राहिलाय.
सोबतच किराणा दुकानदार आणि इतरांनी आपल्या समांतर व्यवसायाची घडी बसवली आहे.

पत्रकार प्रद्युमन शर्मा सांगतात,

कोचिंगने या शहराच रुपडंच पुर्ण पालटलं आहे. हॉस्टेल्सवाल्यांपासून ते ॲटोरिक्शावाल्यापर्यंत सगळ्यांच नशिब चमकलं आहे. कोटाची आख्खी अर्थव्यवस्थाच कोचिंगवर डिपेंड असल्यासारख झालं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.