मोठमोठ्या सोसायट्यांचे जंगल बनलेलं कोथरूड म्हणजे एकेकाळी खरोखरच जंगल होतं

आज दिवसभरात बऱ्याच घटना घडल्या पण आम्हा मिडियावाल्यांसाठी एक न्यूज मात्र ब्रेकिंग न्यूज ठरली होती, कोथरुडात गवा घुसला. पुण्याचं हार्ट समजल्या जात असणाऱ्या कोथरुडात गवा घुसला तर गवगवा होणारच मान्य आहे की. पण गवा बघायला जमलेल्या कोथरुडकरांनी त्याला इतकं ताणलं की अखेर बिचाऱ्याचा धाप लागून मृत्यू झाला.

मागे एकदा बिबट्या घुसला होता, आता गवा घुसलाय. मोठमोठ्या सोसायट्यांचे जंगल बनलेलं कोथरूड म्हणजे एकेकाळी खरोखरच जंगल होतं.

या कोथरूडचा इतिहास पार शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जाऊन पोहचतो. १६१० सालच्या सापडलेल्या कागदपत्रांमध्ये कोथरूडच नाव वाचायला मिळते. काही जण म्हणतात कोते पाटलांचं गाव म्हणून या गावाचं नाव कोथरूड पडलं. त्याकाळी हे गाव कर्यात मावळात मोडत असे. मुठा, मोसे खोऱ्यात जाण्यासाठी लागणारा रस्ता इथूनच जायचा.

एक काळ असा होता जेव्हा कोथरूड पुणेकरांसाठी खूप दूर वाटायचं.

पूर्वी नदीवर पूल बांधायची पद्धत नव्हती. कमी पाण्याच्या उताराच्या वाटेवरून जायचा मार्ग असायचा. विठ्ठलवाडीच्या इथून लोक नदी पार करायचे आणि कोथरुडास जायचे. १७६१ साली नानासाहेब पेशव्यांच्या काळात लकडी पूल बांधण्यात आला आणि थोड्या फार प्रमाणात ये जा सुरु झाली.

तत्पूर्वी कोथरूड म्हणजे एक जंगलात वसलेलं एक छोटं खेडगाव होतं. असं म्हणतात की गावापासून दूर निर्जन स्थळी कोथरूडमध्ये बाजीराव पेशव्यांनी आपल्या लाडक्या मस्तानीसाठी एक महाल बांधला होता. तिथेच पेशव्यांची एक सुंदर बाग देखील होती.

आज कर्वे रोडने पौड फाटा ओलांडून पुढे गेले की नाल्याचा पूल लागतो, त्यापलीकडे डाव्या हाताला मृत्युंजयेश्वराच मंदिर आहे. इथेच पेशव्याची बाग होती असं सांगितलं जातं. तिथे बरेच पैसे खर्च करून एक महागडा आरसे महाल बांधला होता. मस्तानीला भेटण्यासाठी बाजीराव घोड्यावरून इथे येत असतं अशी आख्यायिका सांगितली जाते. पण याचे निश्चित असे पुरावे सापडत नाहीत.

आरसे महालाचा पहिला उल्लेख पेशवे दफ्तरात १८०७ साली सापडतो. तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी या आरसे महालाची व जलमंदिराची दुरुस्ती केली असं लिहिलं आहे. याचाच अर्थ हा महाल याच्याही खूप आधी पासून तिथे असला पाहिजे पण तशी नोंद आढळत नाही.

१९१९ साली इतिहास संशोधक आबा चंदोरकरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे या बागेत पेशव्याचा दुमजली बंगला धूळ खात पडला होता. त्याला ब्रिटिश पद्धतीप्रमाणे रंगीत काचांची तावदाने होती. शेजारी मोठा पाण्याचा हौद होता.

ही बाग बरीच भपकेबाज होती यात शंका नाही. जलमंदिर हे देखील पेशव्याच्या रसिकतेचं दर्शन घडवत होती. पण पुण्यातही इतक्या बागा असताना ही बाग आणि बंगला का बांधला असावा हा प्रश्न अनेकांना पडतो. पण शहरातील धकाधकीच्या आयुष्यापासून दूर एकांतवास मिळावा व नृत्य गायन यातुन मनोरंजन व्हावे म्हणून हौसेने ही बाग बांधली असावी.

फक्त पेशव्यांची नाही तर त्यांच्या काही सरदारांच्या, सावकारांच्या देखील इथे प्रशस्त बागा होत्या. त्यात बरीच फुलझाडे आणि फळझाडे लावलेली असायची. कोथरूडच्या बागा विलास व विहार यासाठी परिपूर्ण होत्या हे नक्की. 

या बागांचे इंग्रजांनाही खूप अप्रूप होते. त्यांनी यामुळेच पुण्याला गार्डन ऑफ डेक्कन अशी उपाधी दिली होती.

पण पेशवाई नंतर त्यांनी पुण्यातील बागांची निगा राखली नाही. तेव्हा झालेल्या वाताहतीमध्ये ही बाग देखील नष्ट झाली. एकोणिसाव्या शतकात पेशव्यांचा आरसे महाल इंग्रजांनी लिलावात काढून एका पारशी माणसाने विकला. या बागेच्या मध्यातूनच मुठेचा कालवा काढल्या मुळे पुढे ही बागच अंतर्धान पावली. पेशव्याच्या प्रमाणे इतर बागाही नष्ट झाल्या. 

हळूहळू या जागेत शेती होऊ लागली. ज्या काही बागा शिल्लक होत्या त्या पाहायला पुण्यातून शाळेच्या सहली यायच्या. अशातच एक घटना घडली आणि अचानक कोथरूड पुण्याच्या दिशेनं सरकलं.

१९६१ सालची पानशेतची धरणफुटी.

या धरणफुटी नंतर पुण्याचं नभुतो नभविष्यति असं नुकसान झालं. अख्ख गाव वाहून गेलं. लोकंचे संसार उघड्यावर आले. जीविताचेही नुकसान झाले. याच महापुराला घाबरून काही पेठेतल्या मध्यमवर्गीय पुणेकरांनी नदीच्या पलीकडे सुरक्षित अंतर बघून जागा घेण्यास सुरवात केली.

साठच्या दशकात हिरवेगार जंगल आणि शेतांनी वेढलेल्या कोथरूडमध्ये प्लॉट पडण्यास सुरवात झाली. तुरळक बंगले उभे राहू लागले. हिंगणे येथे महर्षी कर्वेंनी उभारलेल्या शिक्षणसंस्था होत्या. डेक्कन ला जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय हे त्यातल्या त्यात गजबजलेला भाग. आजचा कर्वेरोड तेव्हा एक मातीचा कच्चा रस्ता होता. वेताळटेकडीच्या पायथ्याशी प्रभात स्टुडिओ, विधी महाविद्यालय, भांडारकर इन्स्टिट्यूट या संस्था होत्या.

१९८४ साली नळस्टॉपला जोडणारा म्हात्रे पूल झाला आणि याच काळात कोथरूडने वाढण्याचा स्पीड पकडला.

१९८० ते १९८५ या पाच वर्षात कोथरूडचे अक्षरशः रुपडे पालटून गेले. अनेक हौसिंग सोसायटी उभ्या राहिल्या. सिमेंटच्या इमारतींचे जाळे उभे राहू लागले. कमिन्स, किर्लोस्कर, वनाझ यासारख्या कंपन्या उभ्या झाल्या. याच काळात पौड फाट्याजवळ पुण्यातले पहिले खाजगी इंजिनियरिंग कॉलेज एमआयटी उभे राहिले.

कात्रजवरून थेट मुंबईला जाणारा बायपास हायवे देखील कोथरूडच्या विकासात  दगड ठरला.

नव्वदच्या दशकात तर आयटी कंपन्या येऊ लागल्या तशात कोथरूडने आपल्या वाढीचा टॉप गियर टाकला. तत्कालीन महानगरपालिकेच्या कारभाऱ्यांनी कोथरूडच्या वाढीला सुनियोजित विकासाचे बंधन देखील घातले. याचाच परिणाम कोथरूड पुण्याचं सर्वात मोठं उपनगर बनलं.

इतकंच नाही तर आशियातील सर्वात वेगाने वाढलेलं उपनगर म्हणून देखील गिनीज बुकात याची नोंद झाली असल्याचं कोथरुडकर छातीठोकपणे सांगतात.

आज कोथरूड हे कोरेगाव पार्क कॅम्प इतकं मॉडर्न नाही आणि पेठेप्रमाणे अगदीच इतिहासात रमलेलं नाही. तरी मध्यमवर्गीय शहरी तोंडवळा घेऊन नव्या आणि जुन्याचं संगम असलेलं कोथरूड अभिमानाने उभे आहे.इथेचांगल्या शाळा,कॉलेजेसआहेत,मॉल्स आहेत, कोथरूड स्टॅन्ड, कोथरूड डेपो असे सर्व गावाला कनेक्ट करणारे बस स्टॉप आहेत. 

आता मेट्रोसुद्धा उभी राहतीय. कितीही आधुनिकता आली तरी अजूनही चांदणी चौकाच्या पलीकडे एनडीए वगैरेमुळे जंगल आणि प्राण्यांचं जग देखील सुरक्षितपणे लपलेलं आहे हे नक्की. आता भुकेलेला माणूस प्राणी त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करू लागला तर ते कितपत टिकेल हा देखील प्रश्न शेवटी उरतोच.

संदर्भ- हरवलेलं पुणे डॉ.अविनाश सोवनी  

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.