आबा, आज्ज्यापासून ऐकताय कोयना धरण फुटणार, आम्ही सांगतो खरं काय होणार..?
कृष्णेच्या पट्ट्यात नदीकाठी असणाऱ्या गावात ठराविक जागा आहे. कोण म्हणत गव्हरमेंटनं ते दगड आणून टाकलेत. कारण काय तर कोयना फुटलं तर कुठंपर्यन्त पाणी येईल हे सांगणारी ती दगड आहेत. कराडच्या टॉवरवर बसुन कावळा पाणी पिणारं इतकं पाणी कोयना फुटल्यावर येणारं हि सामान्यांची चर्चा.
थोडक्यात काय तर आमच्या आबा, आज्यापासून कोयना फुटणार याच चर्चा ऐकत आम्ही मोठ्ठ झालो.
प्रशासनाने वेळोवेळी कोयना धरणाला काहीही होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना धरण फुटल्यावर पाणी कुठंपर्यन्त येणार हाच अंदाज बांधण्यात इंटरेस्ट होता. लोकांनी आजवर जे अंदाज बांधले ते यंदाच्या पुरात वाहून गेले. महापूर आल्यावर इतकं पाणी येत तर कोयना फुटल्यावर किती पाणी येईल याचे नवे अंदाज सुरू झाले.
आत्ता जिथं अफवा तिथं बोलभिडू हे गृहितक आहे. अफवा पसरवणाऱ्यांना कोण थांबवणार. मग आम्ही मात्र कोयनेला धक्का लागणार नाही हे ठामपणे सांगतो.
त्याचं कारण कोयनेच्या उभारणीत, आणि जून्या लोकांच्या प्रामाणिक काम करण्याच्या वृत्तीत आहे.
कोयना नदीवर धरण बांधावे ही कल्पना पहिल्यांदा टाटांच्या मनात आली. १९१० साली तस सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलं. उंचावरून खाली कोसळणार महाप्रचंड पाणी अडवलं तर आसपासच्या भागात शेतीलाही पाणी मिळेल आणि शिवाय त्यातून वीजनिर्मितीही करता येईल हा हिशोब होता.
टाटांनी तेव्हाच हे धरण बांधलं असत पण परकीयांच सरकार, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यामुळे आलेली मंदी यामुळे त्यांना निधी उभारणे अशक्य झालं. १९४५ मध्ये भूगर्भात विद्युत केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मुंबईच्या इलेक्ट्रिक ग्रिड विभागाने मांडला.
पण हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी स्वातंत्र्य उजाडाव लागलं. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोयनेच्या धरणाच काम प्रायरीटीने सुरू करण्यात आलं. यशवंतरावाना ठाऊक होते हे धरण जर तयार झाले तर आपला संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम होईल.
तेव्हाचे मुंबई इलख्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते नारळ फोडून धरणाच्या बांधकामास सुरवात करण्यात आली. या कामी स्विट्झर्लंडचे सल्लागार तज्ञ मदतीस होते. नुकत्याच सुरू झालेल्या सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातील तरुण इंजिनियर्स ना देखील या कामावर संधी देण्यात आली.
भारतातला हा सगळ्यात पहिला जलविद्युत प्रकल्प असणार होता.
हे काम १६ जानेवारी १९५४ रोजी सुरू करण्यात आले. जागतिक बँकेकडून १२ कोटी रुपयांचे कर्ज या कामी घेण्यात आले होते. महाबळेश्वर ते हेळवाक येथे कोयनेच्या जलक्षेत्रात पाणी अडवून देशमुखवाडी येथे २,७९६ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण बांधून जलाशय तयार केला. त्याचे नाव शिवसागर ठेवण्यात आले.
या 105 फूट उंचीच्या महाराष्ट्रातील तेव्हाच्या सर्वात मोठ्या धरणामुळे जवळपास 80 खेडी पाण्याखाली गेली होती. स्वतः नेतेमंडळी गावोगाव फिरून तिथल्या लोकांना तयार करत होते. पुनर्वसनाचा प्रश्न खूप गंभीर बनला होता. कोयना पुर्ण झालं पण पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याच्या चर्चा आजही सांगितल्या जातात.
धरणातील पाणी नवजे गावाजवळ आणून जल बोगद्यातून पोफळी येथे आणून तेथे प्रचंड वेगाने आलेल्या पाण्यावर भूमिगत विद्युत केंद्राची उभारणी केली गेली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ४ जनरेटर्स बसवण्यात आले होते. तोपर्यंत यशवंतराव मुख्यमंत्री झाले होते.
ते या पदावर आल्यावर धरणाच्या कामाला वेग आला. 10 एप्रिल 1960 रोजी कोयना प्रकल्पाची प्रगती पाहण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते.
या प्रकल्पातुन फक्त विद्युत निर्मिती आणि जलसिंचन एवढचं टार्गेट ठेवलं नव्हतं. यशवंतरावाना तिथे पर्यटन क्षेत्र डेव्हलप करायचा होता. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेल्या भागाला महाबळेश्वर सारख हिलस्टेशन बनवायचं होत. आसपासच्या गावकऱ्यांना त्यातून रोजगार देखील मिळणार होता.
1964 साली हे बांधकाम पूर्ण झाले. तोपर्यत यशवंतराव केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते पण त्यांच्या माघारी या धरणाकडे दुर्लक्ष झाल नाही. विक्रमी वेळेत हा प्रोजेक्ट तयार झाला.
लवकरच पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात सिंचनाच पाणी पोहचल. इथल्या उद्योगधंद्यांची वाढती विजेची भूक भागवली जाऊ लागली.या धरणातून होणारी वीजनिर्मिती फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर मुंबईला देखील उपयोगी आली.
महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोयना धरणाची ओळख बनली.
11 फेब्रुवारी 1967. कोयना क्षेत्रात 5.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला.
धरणाला तडे गेले अशी बातमी वेगाने राज्यभर पसरली.
काही वर्षांपूर्वी पुण्यात पानशेत धरण फुटण्याच्या जखमा भरून आल्या नव्हत्या तेवढ्यात कोयना धरण फुटणार या अफवेने अख्खा देश हादरला. कृष्णेच्या खोऱ्यात भीतीची लाट पसरली. कोयना धरण फुटले तर कऱ्हाड सांगली पासून अनेक गावे, छोटीमोठी शहरे वाहून जाणार, शेती मालमत्तेचे प्रचंड नुकसान होणार. हा भाग उजाड होणार ही शक्यता होती.
सुदैवाने काही झालं नाही पण हि तिच ठिणगी होती, ज्यामुळे पुढे कोयना फुटणार अशा चर्चा गावागावात रंगू लागल्या.
धरणावरून मोठा वाद सुरू झाला. कोयना बांधून फक्त तीन वर्षे झालेली म्हणून हा भूकंप धरणामुळेच झाला आहे असं छातीठोक पणे सांगितलं जाऊ लागलं. नंतर अस समोर आलं की कोयना धरण हे भूकंपप्रवण क्षेत्रात बांधलं आहे. आधी अभ्यासकरून धरणाची जागा बदलता आली असती का? हा प्रश्न देखील विचारण्यात आला.
युद्धपातळीवर प्रयत्न करून कोयनेची डागडुजी करण्यात आली. परदेशातील तज्ञांच्या सहाय्याने कितीही मोठा भूकंप झाला तरी कोयनेला धोका होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली.
कोयना फुटणार नाही याची काळजी पहिल्यांच दणक्यात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे कोयना परिसरात झालेल्या या भूकंपानंतर अनेक लहानमोठ्ठे धक्के परिसरात जाणवले. पण कोयनेच्या भिंतींना साधी एक चीर पडली नाही. पाण्याचा इतका मोठ्ठा साठा असल्याने राजकर्त्यांनी मोठमोठ्या तज्ञांना कामाला लावून काम करुन घेतलं होतं.
या धरणाला आत्ता पन्नास वर्ष होवून गेली. जलाशयात आजवर दोन वेळा लेक टॅपिंगचे यशस्वी प्रयोग करण्यात आले. वेगवेगळ्या तंत्रज्ञांकडून धरणाचा अभ्यास करण्यात आला. शासन कोणतेही असो धरणाकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्देवाने काही घडलं तर महाराष्ट्र पुढचे पन्नास वर्ष उभा राहू शकणार नाही हे सत्य सत्तेवर येणारा प्रत्येकजण जाणतो म्हणूनच धरणाच्या भिंती सुरक्षित आहेत आणि राहितील याची हमी प्रशासकिय अधिकारी देतात.
ज्या विश्वासाने आणि कष्टाने धरण बांधण्यात आलं. ज्या प्रकारे धरणाकडे दिवसरात्र लक्ष देण्यात येतं त्यावरच आम्ही देखील ठामपणे सांगू शकतो, कोयनेची एक विट देखील सरकणं मुश्कील आहे…
हे हि वाच भिडू.
- राजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…?
- कर्नाटकातल्या अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरात पूर येतो, हे खरं आहे का ?
- पुरग्रस्त लोकांसाठी मदत घेवून जाताय..? थांबा, वाचा आणि मग जा..
सर आपल्या वेबसाईटवर जे काही ब्लॉग येतात मी त्याची आतुरतेने वाट पाहत असतो सध्या आपण जे धरणांच्या वरती ब्लॉग टाकलेत ते खरच अप्रतीम आहेत मला वाचुन आनंद झाला आणि ज्ञानार्जन सुद्धा झाले साधारण लोकांना जे माहिती नसतं ते आपल्या ब्लॉगवर भेटत असते , सर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते आपण धरणग्रस्तांच्या वर सुध्दा ब्लॉग लिहा त्यांच्या वर आजपर्यंत एकही ब्लॉग वाचण्यात आला नाही लोकांना कोणत्या परिस्थिती मध्ये आपली घर दार सोडून दुसरीकडे आणून टाकले जाते त्यांच्या वर उपेक्षित सारखे हाल येऊन त्यांना राजकारन्यानी दिलेल्या थापा पूर्ण होत नाही त्यावर अधिकारी कशाप्रकारे काणाडोळा करतात हेही सर्व लोकांना कळू देत