कोयनेतून सोडलेल्या पाण्याचा सांगलीकडील प्रवास कसा असतो?
सध्या कोयना धरणातून ५३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जसा हा विसर्ग वाढत जाईल तसा खाली नदीकाठच्या गावांना टेन्शन येतं आहे. पण प्रशासनाकडे देखील पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. कारण मागच्या ६ तासात तब्बल १ लाख २७ हजार क्युसेक्स पाण्याची आवक आवक होतं आहे. त्यामुळे आज दिवसभरात विसर्ग वाढला आहे.
पण हा विसर्ग वाढला कि नदीकाठच्या कोणकोणत्या गावांना किती तासांनी फटका बसतो या पाण्याचा प्रवास कसा असतो याचा ‘बोल भिडू’ने घेतलेला आढावा…
कोयनेतून पाणी सोडलं कि पहिल्या १ ते १० तासातचं फटका बसतो तो उंब्रज – पाटण रोडवरच्या डोनिचावाडा, विठ्ठलवाडी, पाटण, मल्हारपेठ, निसरे, तांबवे, साजूर, जुनी साकुर्डी अशा गावांना. इथं अगदी गावात पाणी शिरत. त्यामुळे प्रशासनाकडून या गावातील नागरिकांना प्रधान्याय स्थलांतरित करण्यात येतं.
पुढे कराडच्या प्रीतिसंगमावर कृष्णा – कोयना नदीचा संगम होतो. त्यामुळे कोयनेतील सोडलेल्या पाण्याचा दुसरा आणि मोठा फटका बसतो तो कराड शहराला. कराडमध्ये हे पाणी दत्त चौक, पाटणकर कॉलनी, कुंभार गल्ली या भागात पाणी शिरतं.
कोयना ते कराड हे अंतर साधारण ६० ते ६५ किलोमीटर आहे. त्यामुळे इथं पर्यंत कोयनेचं पाणी पोहोचण्यासाठी साधारण १४ ते १६ तास लागतात.
सोबतच मोठा पाऊस आणि वाहत येणारा प्रवाह यामुळे नद्यांना मिळणाऱ्या लहान नद्या, नाल्याचे पाणी या मोठ्या नद्या घेत नाही. त्यामुळे बाकी छोट्या नद्यांच्या पात्रात पूर स्थिती निर्माण होते.
पुढे हा प्रवाह कृष्णा नदीतून गोवारे, कर्वे, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, मालखेड या गावांना पुराचं नुकसान पोहोचवत आणि पाणी सांगली जिल्ह्यात जात. पुढे हा प्रवाह नरसिंहपूर, बहे, गौंडवाडी, आमनापूर, औदुंबर, भिलवडी, ब्रम्हनाळ, नरसोबाची वाडी, डिग्रज, सांगली, मिरज, कुपवाड अशा नदीकाठच्या गावांना पुराचं पाणी नुकसान देत जात.
इथं कोयना ते सांगली हे अंतर साधारण १३५ किलोमीटर आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सोडल्यानंतर ते सांगलीपर्यंत पोहोचण्यासाठी २८ ते ३० तास लागतात.
पुढे हा प्रवाह कुरुंदवाड इथून कर्नाटकमध्ये प्रवेश करतो. इथंच कोल्हापूरहुन वाहत आलेली पंचगंगा आणि कृष्णेचा संगम होतो. कुरुंदवाडजवळ कर्नाटकात प्रवेश केल्यावर पुढे हि नदी तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
याच वेळेच्या आधारावर आज दिवसभर कोयनेतून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग होतं आहे. त्यानुसार उद्या सकाळी सांगलीतील पाणी पातळी ४८ ते ५० फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या इथल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे हि वाच भिडू
- आबा, आज्ज्यापासून ऐकताय कोयना धरण फुटणार, आम्ही सांगतो खरं काय होणार..?
- कोयना की जायकवाडी ? ही आहेत महाराष्ट्रातील टॉप ५ धरणे..
- पाणी अडवा, पाणी जिरवा ही शंकररावांनी दिलेली घोषणा पुढे बोधवाक्य म्हणून वापरात आली..