“आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस ?

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ! जशी संतांची तशीच सुधारकांचीसुद्धा परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानोबा तुकोबांची भक्तिमार्गी संतपरंपरा या एकीकडे तर फुले, आगरकरांपासून अगदी दाभोलकरांपर्यन्तची सुधारकी परंपरा दुसरीकडे. समाजामध्ये मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी सुधारकांनी टाकीचे घाव स्वतः सोसले. आधी केले मग सांगितले.

महात्मा फुलेंनी दलितांसाठी शाळा काढली किंवा महर्षी कर्वेंनी विधवा पुनर्विवाहाचा प्रचार स्वतः विधवेशी विवाह करून केला. पण सगळेच काही कर्ते सुधारक नव्हते. 

कर्ते विरुद्ध बोलघेवडे समाजसुधारक असा वाद सुद्धा महाराष्ट्रात जुना आहे. महाराष्ट्रातल्या अशाच कर्त्या समाजसुधारकांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमचमणारे एक नाव म्हणजे नाना पाटील! 

होय तुम्ही बरोबर वाचलं क्रांतिसिंह नाना पाटील !

नाना पाटलांच्या कार्याला क्रांतीचं वलय लाभलं. शेतकऱ्याच्या पोरांना बरोबर घेऊन त्यांनी क्रांती घडवून आणली. ज्या राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता त्या ब्रिटिशांच्या राज्यावरचा सूर्य साताऱ्यात मावळला. पण या क्रांतीच्या वलयामुळे सुधारक नाना पाटील झाकोळले गेले. 

‘आधी सामाजिक सुधारणा की राजकीय?’ हा प्रश्न नानांना पडला नाही आपल्या सायकलीला तिरंगा लावून नानांनी गावगाव फिरून शिक्षणाचा प्रसार केला आणि वेळ पडताच ब्रिटिशांच्या गोळीला गोळीने उत्तर द्यायलाही ते सज्ज होते. 

१९१०-२० चा तो काळ म्हणजे सत्यशोधक समाजाच्या उत्कर्षाचा काळ. शाहू महाराजांचे नेतृत्व लाभलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रचार प्रसार जोरात चालू होता. कोल्हापूर साताऱ्याच्या भागात तेव्हा सत्यशोधक तमाशे होत. हे तमाशे म्हणजे शिक्षण, अस्पृश्यतानिर्मूलन, जात्युच्छेदन, स्त्रीशिक्षण अशा सुधारणांचे प्रचारच असत. वयाच्या १५ व्या वर्षी नाना अशाच एका सत्यशोधक तमाशाला हजर राहिले आणि कायमचे सत्यशोधक झाले. बारशातच गळ्यात पंढरीची माळ पडलेले नाना या आधुनिक विचारांकडे सहज ओढले गेले. सत्यशोधक विचारांच्या प्रचारार्थ ते गावोगाव फिरू लागले. 

शिक्षण संपल्यावर नाना तलाठी झाले. तलाठी म्हणजे तेव्हाच्या ग्रामीण समाजरचनेत फार मोठा माणूस ! 

पण नानांचे लग्न काही जमेना. कारण नाना म्हणायचे लग्न करीन तर सत्यशोधक पद्धतीनेच. लग्नात ना वाजंत्री, ना जेवणावळी, ना कर्मकांड, ना भटजी अशा या पद्धतीला जसा नानांच्या घरच्यांचा विरोध होता तसा तो मुलींच्या आई बापांचाही असायचा. त्यामुळे नानांना पोरगी द्यायला कोण बाप धजेना. 

नानांचे वडील नानांना म्हणायचे

“अरं नाना असलं भिकाऱ्यासारखं लगीन लावू का मी माझ्या पोराचं? लोकं तोंडात शान घालत्याली.”

नाना म्हणाले ,

“अवो मी लोकांची लग्न अशी लावून देतो, त्यास्नी सांगतो रिण काढून लगीन करू नका, साध्या पद्धतीनं बिन कर्मकांडाचं लग्न करा, आण ती लोकं ऐकत्याती, आणि मी माझंच लगीन वाजतगाजत करू व्हय? “

अखेर दुधोंडीच्या एका पाहुण्याने नानांना पोरगी दिली. सगळ्यांनीच त्यांच्या हट्टापुढे हार खाल्ली. नानांच्या लग्नात कसलाच बडेजाव नाही, पाटीलकी नाही, तलाठ्याच्या लग्नाची शोभा नाही. अत्यंत साधेपणाने चार पाहुणे बोलवून सोहळा पार पडला. नानांच्या लग्नात मंगलाष्टकासुद्धा नानांनी स्वतःच म्हटल्या आणि विवाह संपन्न केला.

Screen Shot 2018 08 03 at 5.16.45 PM
social media

 नानांची पत्नी आकूबाई ही अशिक्षित होती. कारण त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई. ग्रामीण भागात सगळीकडे हीच परिस्थिती होती. नानांनी महात्मा फुल्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्या पत्नीला शिकवायचा निर्धार केला. आणि एक दिवस पाटी आणि पेन्सिल घेऊनच घरी आले. आकूबाईंना ही कल्पना अजबच वाटली होती पण नवऱ्याच्या हट्टापुढे नकार देण्याचे धैर्य त्यांच्यात नव्हते. त्या शिकायला तयार झाल्या. 

नानांच्या आजीला मात्र जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा ती मात्र रागाने फणफणली. 

आजी म्हणाली शाळा शिकून तू एक येडा झालाईस आता तिलाबी येडं करतुस का?”

नाना म्हणाले ” अगं आज्जे शाळा शिकून कोण येडं होतंय काय? शेहरातनी बघ जाऊन सगळ्या पोरी शाळंला जात्यात”

आजी म्हणाली ” आरं जाऊदे त्यास्नी, त्यांनी आब्रू सोडल्या, मराठ्यांच्या पोरी कवा शाळा शिकत्यात्या काय? न्हाईते सॉंग काढू नगंस” तू तिला कशी शिकवतोस बघतेच मी”.

आजीनं शिक्षणाचा हा मुद्दा फारच ताणला तेव्हा नानांनी आजीला खडसावून सांगितलं “हे बघ आज्जे, जोपतुर आकूबाई लिहाय वाचाय शिकणार न्हाई, तोपतुर मी तिच्यासंगं नवरा बायकुचा संबंधच ठेवणार न्हाई”.

हे ऐकताच आजी घाबरली, तिला माघार घ्यावीच लागली. नाना रोज कामावरून घरी आल्यावर बायकोला शिकऊ लागले. पुढे काही महिन्यातच त्या फाडफाड वाचू लागल्या, लिहू लागल्या. नानांनी तिच्याकडून रामायण, हरिपाठ वाचून घेतले आणि मगच त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते खरे पतिपत्नी झाले नाहीतर तोपर्यंत त्यांचे नाते हे गुरु शिष्याचेच होते. 

गांधी लग्नाची अभिनव कल्पना.

स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेतल्यानंतर नानांना महात्मा गांधींनी वेड लावलं होतं. प्रत्येक गोष्टीत महात्मा गांधी हीच त्यांची प्रेरणा असायची. त्यांनी ‘गांधी लग्न’ हि एक अभिनव कल्पना प्रसारित केली. अत्यंत कमी खर्चात ही लग्ने होत. वरात, वाजंत्री, हुंडा याना फाट्यावर मारणारी हि लग्ने वरवर सत्यशोधक लग्नाप्रमाणेच असत. पण त्यात थोडे बदल केले गेले होते. गांधी लग्न पद्धतीत वधूवरांनी खादीचे कपडे घालून महात्मा गांधींच्या प्रतिमेस हार घालायचे आणि शपथ घ्यायची कि आपल्याला होणारे पहिले मूल हे देशाच्या स्वातंत्र्याच्या कामी येईल.  

१९३६ साली आपल्या बहिणीचा आणि १९४० साली आपल्या मुलीचा विवाह गांधी पद्धतीने लावून नानांनी ‘बोले तैसा चाले’ असा आपला बाणा दाखवला. त्यांच्या बहिणीचे लग्न दहा रुपयात तर मुलीचे लग्न पंधरा रुपयात लावून दिले. अशाप्रकारचे शेकडो विवाह नानांनी लावले. बऱ्याच गावांमध्ये सामुदायिक विवाह लावले, एकाच वेळी दहा-दहा, वीस-वीस विवाह एकाचवेळी एकाच मंडपात पार पडत. 

आजही सांगली साताऱ्याच्या भागात अशाप्रकारची गांधी लग्ने प्रचलित आहेत. 

सतत वीस वर्षे क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याच्या विविध भागातून सायकलीवरून फिरले. ज्या गावात ते जात त्या गावात स्वतःच्या सभेची दवंडी ते स्वतःच देत. संध्याकाळच्या सभेला ते शेती, पीकपाण्यापासून शिक्षण, जातनिर्मूलन ते थेट देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत विविध विषयावर दोन तीन तास एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे बोलत.

त्यांच्या या गावोगावच्या प्रचाराने त्यांनी क्रांतीची बीजे पेरली होती. क्रांतीची सुरुवात स्वतःपासून, आपल्या घरापासून करावी लागते. बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध कराव्या लागतात. हे नानांनी जाणले.

म्हणूनच पुढे साताऱ्यात घराघरातून क्रांतीचा वणवा ते पेटवू शकले. तरुण, स्त्रिया, मुले, वृद्ध असा सर्वांचा सहभाग असलेले प्रतिसरकार ते स्थापू शकले. 

रणजीत यादव 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.