अन् नाना पाटलांनी म्हसोबाचे डोळेच चोरले..

ब्रिटिशांनी पाच पाचशे पोलीस आणि सैनिक घेऊन कुंडलवर धाड टाकावी, प्रत्येक घर धुंडाळावे आणि त्या पोलिसांना समजावे कि नाना पाटील पारेगाव ला केव्हाच निसटले. तशीच तडकाफडकी धाड मग पाऱ्यावर पडावी पण नाना पाटील तोपर्यंत आपल्या सहकाऱ्यांसह आटपाडीत पोचलेले असायचे. या धाडी घालणाऱ्या गिल्बर्ट आणि हॉब्सन चे नशीब सिद्दी जौहरच्या  नशीबापेक्षा काही वेगळे नव्हते.

आकाशपाताळ एक केले तरी ४२ च्या क्रांतीत नाना पाटीलच काय नाना पाटलांचे नखदेखील ब्रिटिशांच्या नजरेस पडले नाही. आणि भूमिगत राहून नानांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच ४ वर्षे साताऱ्यातून ब्रिटिश सरकार नेस्तनाबूत करून टाकले होते. आणि म्हणूनच त्या अजेय, अपराजित लोकनेत्याला आचार्य अत्रेंनी ‘क्रांतिसिंह’ हि पदवी दिली.

जशी राजकीय  तशीच सामाजिक क्रांतीदेखील नाना पाटलांनी घडवली पण राजकीय क्रांतिसिंहाला जे गूढ वलय लाभले ते समाजक्रांतिसिंह नाना पाटलांना लाभले नाना किंबहुना त्यांच्या क्रांतिकारक प्रतिमेनेच तिला झाकोळून टाकले.पुराणमतवादी, अंधश्रद्धाळू भारतीय समाजाला त्यांनी आपल्या वाणी ने आणि आचरणाने जबरदस्त धक्के दिले तेही आपल्या नर्मविनोदी स्टाईलमध्ये.

एकदा नाना पाटलांना कुणीतरी अंकलखोपच्या म्हसोबाची गोष्ट सांगितली की,

“म्हसोबा लय करी हाये.त्याची आगळीक काढली की आगळीक करणारयाला तो लागीर होतो. त्याला जुलाब होतात. खुद्द अफझलखानाला सुद्धा या देवाने धडा  शिकवला होता. त्यामुळे लोक म्हसोबाला चांगलेच टरकून राहत. या देवाला नवस म्हणून चांदीचे डोळे चढवण्याची पद्धत आहे.”

लोकांच्या या अंधश्रद्धेला मग नानांनी एका वेगळ्याच पद्धतीने आव्हान दिले.

नानांनी रातोरात अंकलखोपच्या म्हसोबाचे डोळे काढले. चांगले तीन चार महिने झाले तरी नानांना काहीच झाले नाही. मग एक दिवस नाना देवळात गेले आणि पुजाऱ्याला म्हणाले,

“पुजारीबुवा म्हसोबाचे डोळे चोरून नेणाऱ्यास जुलाब सुरु झाले असतील काय?”

त्यावर पुजारी म्हणाला,

“नुसते जुलाबच काय घेऊन बसलात आतापर्यंत त्याला रक्ताची हगवण लागून तो मरणाला टेकला असेल”

मग नाना पाटलांनी आपली मूठ उघडली आणि आपल्या हातातील डोळे पुजाऱ्याच्या हातात ठेवले  आणि म्हणाले,

“हे डोळे मीच 3-4 महिन्यापूर्वी चोरले होते पण मला तर काहीच झाले नाही?”

यावर पुजाऱ्याला काही सुचेनासे झाले तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला,

“अहो बरोबर आहे, तुम्ही देवाचे डोळेच काढून नेल्यावर त्याला दिसणार तरी कसे?”

अशा एकापेक्षा एक करामती नाना करीत. नानांचे अंधश्रद्धानिर्मूलन असे कृतिशील होते. याचा अर्थ कुणीतरी असा लावेल कि नाना नास्तिक असतील, पण नाही, त्यांच्या बारशात त्यांच्या गळ्यात पडलेली तुळशीकाष्ठाची माळ त्यांनी श्रद्धेने शेवटच्या श्वासापर्यंत जवळ जपली होती. म्हणूनच आचार्य अत्रेंनी एका लेखात नानांचे वर्णन ‘महाराष्ट्राचा मार्क्सवादी माळकरी’ असे केले आहे.

मोठी मोठी कर्जे काढून लग्नें करण्याचे शेतकरी लोकांना एक वेड होते किंबहुना आजही आहे. नानांनी या वेडावर एक उपाय शोधला तो म्हणजे ‘गांधी लग्न’!

महात्मा गांधींच्या नावाने सुरु केलेली ही लग्ने हा एक सत्यशोधक लग्नाचाच प्रकार होता पण नानांनी त्यांच्या या सामाजिक बदलाबरोबर राष्ट्रवाद असा बेमालूमपणे मिसळला कि एका मंडपात २०-२० लग्ने  २०-२० रुपयात उरकू लागली. या प्रकारच्या लग्नामध्ये वधू वरांनी महात्मा गांधींच्या तसबिरीसमोर खादीचे कपडे परिधान करून शपथ घ्यायची कि, त्यांना होणारे पहिले अपत्य ते स्वातंत्र्यचळवळीसाठी बहाल करतील. आणि या गांधी लग्नाची सुरुवात देखील त्यांनी स्वतःपासून आपल्या घरापासून सुरु केली होती.

बाप मेल्यावर कावळा शिवेल म्हणून नैवेद्य ठेवणे आणि कावळ्याची वाट बघत बसणे हे कर्मकांड नानांना कधीच पसंत पडले नाही. मनुष्याच्या या विचित्र स्वभावाची नाना थट्टा करीत आणि त्यावर विनोदाचे घण घालून लोकांना शहाणे करीत.

आपली पत्नी आकूबाई हिला नानांनी घरच्या घरीच शिक्षणाचे धडे दिले आणि महात्मा फुल्यांच्या हातावर हात मारला. स्त्री शिक्षणाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते आणि आणि नुसते पुरस्कर्ते नव्हे तर कृतिशील पुरस्कर्ते होते. त्यांच्या या कार्याला अर्थातच त्यांच्या घरातून आणि समाजातून विरोध होता पण त्यांनी तो जुमानला नाही. अशा विरोधाला न जुमानणारेच तर क्रांतिकारक असतात.

क्रांतिसिंहांचे आयुष्य म्हणजे एका सत्यशोधकाचा क्रांतीच्या मार्गाने होणारा प्रवास आहे. नानांचा पिंड सत्यशोधकाचा होता आणि स्वभाव क्रांतिकारकाचा.  त्यांच्या या स्वभावामुळेच राजकीय क्रांतीबरोबरच अतिशय अवघड असणाऱ्या गोष्टी देखील त्यांनी लोकांच्या गळी उतरवल्या आणि त्यांना खऱ्या अर्थाने साक्षर केले.  आधी सामाजिक सुधारणा कि राजकीय असल्या बाष्कळ चर्चेत वेळ न दवडता या दोन्ही मोहिमांवर कौशल्याने तलवारबाजी करणाऱ्या क्रांतिसिंहाला विनम्र अभिवादन!!!

  • रणजित यादव

हे ही  वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.