शिवरायांचा गनिमी कावा आणि गांधीजींचा मंत्र घेऊन सातारच्या पोरांनी पत्रीसरकार उभे केले

नाना पाटील यांची आज जयंती. नाना पाटील म्हटलं की आपसूक आपल्या तोंडून प्रतिसरकार चे क्रांतिसिंह नाना पाटील अशी आठवण येते. शाळेत आपण तसच शिकलेलो असतो.

याच प्रतिसरकार ला पत्रीसरकार असं म्हणून पण ओळखलं जातं. काय आहे हे पत्रीसरकार?

प्रतिसरकार चा गावाकडच्या लोकांनी केलेला अपभ्रंश म्हणजे पत्रीसरकार.ह्या कारणाशिवाय पत्रीसरकार हे संबोधन पत्री मारणे याच्याशी निगडित आहे. पत्री मारणे म्हणजे बैल रस्त्यावरून चालताना घसरू नये म्हणून त्याच्या खुराला पत्रा मारतात.मग याचा संबंध प्रतिसरकार शी कुठून आला?

प्रतिसरकारचा मूळ अर्थ समांतर शासन असा होतो.

प्रचलित शासन व्यवस्था जर कारभार चालवायला नालायक ठरत असेल तर त्याला समांतर चालणारी दुसरी एखादी व्यवस्था अस्तित्वात आली तर त्याला प्रतिसरकार म्हणतात. सातारा व सांगली जिल्ह्यात 1942 ते 1946 ही 4 वर्षे जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात असे प्रतिसरकार काम करत होते.

ह्या प्रतिसरकारच्या सुरवातीची कथा देखील रंजक आहे. ती आधी सांगतो मग त्याच्या नावाकडे येऊ.

तर झालं असं की 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालीया टँक मैदानावर काँग्रेस च अधिवेशन भरलं होतं. देशभरातून लोक गांधीजींना ऐकण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळच्या भाषणात त्यांनी ब्रिटिशांना देश सोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आणि ह्यासाठी करेंगे या मरेंगे असा नारा दिला.इंग्रज सरकार विरुद्धचा अंतिम लढा म्हणून चलेजाव चळवळ सुरू झाली.मात्र 8 ऑगस्ट ला रात्रीच गांधी नेहरू पटेलांसकट देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली.

सरकार ला वाटले की नेत्यांच्या अभावी चळवळ बंद पडेल. मात्र झाले उलटेच.

जनतेने चळवळ आपल्या हाती घेतली. दिशा दाखवायला कोणीही नेता नाही, कोणताही कार्यक्रम नाही तरीही हा वणवा पेटला.ज्याने त्याने स्वतःला सुचेल त्या परीने देशाला पारतंत्र्या च्या जोखडातून सोडवायासाठी लढा आरंभ केला.

3789 krantisingnana 14707

ह्या 8 ऑगस्ट च्या अधिवेशनात साताऱ्याचे तरुण उपस्थित होते. ते आपापल्या गावी गांधीजींचा संदेश घेऊन आले. गावोगावी शांततामय आंदोलन सुरू झाले. मात्र इंग्रजांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले होते. ह्यातूनच इस्लामपूर आणि वडूजच्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. 17 सामान्य कार्यकर्त्यांना हौतात्म्य आले.

ह्या घटनेमुळे तरुणांचे रक्त खवळले.

निशस्त्र आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी आपण देखील बंदूक उचलावी असा विचार पुढे आला.पण हे कुठे गांधीजींच्या तत्वात बसत होते ?

तेव्हा या तरुणांचे नेतृत्व करणारे नाना पाटील म्हणाले

“हे आंदोलन गांधीजी च्या मार्गानेच जाणारे आहे. गांधी बाबा म्हणतात अन्याय सहन करणे म्हणजे ही पण एक हिंसाच आहे .आणि हिंसा रोखायला आपल्याला शस्त्र उचलावेच लागेलं”.

शिवरायांचा गनिमी कावा आणि गांधीजींचा मंत्र घेऊन ह्या सातारी पोरांनी क्रांतिकार्य हाती घेतले.

त्यांनी सरकारी खजिना लुटला, बॉम्ब बनवले, तुरुंग फोडला, सरकारी ऑफिस ताब्यात घेतले, रेल्वे स्टेशन जाळले. त्यांनी बनवलेल्या तुफान सेना ह्या सशस्त्र सेनेने पोलिसांना नाकीनऊ आणले.

फक्त एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रतिसरकार बनवलं.

सातारा सांगली भागातून ब्रिटिश सत्ता घालवून कारभार आपल्या हाती घेतला.सह्याद्रीच्या डोंगराळ भागात लपून शिवरायांचे आधुनिक मावळे ब्रिटिश सत्तेला लढा देत होते.

डीएसपी गिलबर्ट च्या नेतृत्वा खाली पोलिसांनी जंग जंग पछाडले पण हे क्रांतिकारक काही नमले नाहीत.त्यांनी फक्त इंग्रजच नव्हे तर सावकार, जुलमी जमीनदार, दरोडेखोर यांच्यावर पण जरब बसवली.

त्याकाळात त्यांनी पत्री मारण्याची शिक्षा प्रसिद्ध केली.

पत्री मारणे म्हणजे गुन्हेगारांचे दोन्ही पाय एकत्र बांधायचे आणि त्याच्या उघड्या तळव्याला मिठाचे पाणी शिंपडून त्यावर दोन जवान कळकाच्या मजबूत काठीने सपासप जोराचे फटके द्यायचे.ते इतके जबर होते की गुन्हेगार कायमचा अधू होऊन जायचा.ह्यात सौम्य पत्री असा देखील प्रकार होता.

क्रुर दरोडेखोर देखील ह्या शिक्षेला ऐकून थराथरा कापायचे.

गावोगावी न्यायदान करणारी व्यवस्था उभी राहिली.

सासुरवास होणाऱ्या आयाबहिणी पासून जातीय दंगली पर्यंत न्यायनिवडा दिला जाऊ लागला. सरकारी न्यायालये ओस पडली. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याला शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेप्रमाणे एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली जाऊ लागली. पोलिसांच्या खबऱ्या ना देखील शिक्षा होऊ लागली.

सरकारने तत्कालीन टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रांना हाताशी धरून हिंसेच्या अतिरंजित कहाण्या प्रसिद्ध केल्या .

प्रतिसरकारच्या ह्या कार्यपद्धतीवर शंकरराव देव वगैरे गांधीवादी नेत्यांनी टीका केली. पांढरपेशी विचारवंतांनी anarchy माजवणारे पत्रीसरकार म्हणून त्यांना हिणवले. पत्रीसरकार हा शब्द ह्या propaganda मधूनच पुढे आला.

हा ह्या क्रांतिकारकांवर अन्यायच होता. उलट त्यांनी सुशासन आणून शासनाची घडी बसवली होती.

ह्या क्रांतीकारकांबद्दल सहानभूती असणाऱ्या औंध संस्थानच्या राज्यघटनेमध्ये थोडाफार बदल करून प्रतिसरकारची घटना बनवण्यात आली. छोट्या छोट्या 7 ते 13 गावांचा बनून एक गट असे 19 गट बनवण्यात आले आणि त्यावर नियंत्रण ठेवायला एक मध्यवर्ती समिती. यात वाळव्याचे नागनाथ अण्णा नायकवडी, कुंडल चे जि.डी.बापू लाड, पांडू मास्तर, यशवंतराव चव्हाण, किसन वीर, सांगली गटाचे वसंतदादा पाटील शिवाय उत्तमराव पाटील, लीलाबाई पाटील, राजमती बिरनाळे अशा अनेक शिलेदारांच्या जोरावर हे सरकार उभे होते.

प्रतिसरकार ने फक्त क्रांतिकार्य केले असे नाही तर सृजनात्मक विकासाची कामे पण केली.

ग्रामवासीयांच्या श्रम दानातून रस्ते बांधले, गटारी बांधल्या, गावे स्वच्छ झाली.दारूबंदी केली, अस्पृश्यता कायद्याने बंद केली. भाऊराव पाटलांच्या राष्ट्रीय शाळेच्या चळवळीला जिल्हाभर पसरवले. गांधीजी ना अभिप्रेत असणारे ग्रामस्वराज्य त्यांनी प्रत्यक्षात आणले.

पुस्तकी गांधीवाद्यांना हे क्रांतिकारी कधी समजलेच नाहीत. मात्र पुढे गांधीजींनी या क्रांतीकारकांना चळवळ जिवंत ठेवल्याबद्दल कौतुक केले.

स्वतः नेहरूंनी महाराष्ट्र का शेर म्हणून नाना पाटलांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

यामुळे हे अराजकता पसरवणारे पत्रीसरकार नसून देशप्रेमाचीे प्राणाची पराकाष्ठा करून लोकांचे राज्य चालवणारे प्रतिसरकारच होते ह्या वर शिक्कामोर्तब झाला. गर्विष्ठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ला देखील साताऱ्याच्या प्रतिसरकारबद्दलच्या प्रश्नावर इंग्लडच्या संसदेसमोर मान खाली घालायला लागली.

पुढे स्वातंत्र्य मिळल्यावरही क्रांतिसिंह नाना पाटलांनी सत्ताकरणाविरुद्धचा लढा चालूच ठेवला.

ज्या स्वराज्यासाठी शाहिदानी बलिदान दिले त्या लोकशाहीची होणारी वाताहत त्यांना डोळ्यांनी पहावी लागली.

मात्र त्यांनी पेटवलेली क्रांतीची धग अजूनही ह्या माती मध्ये टिकून आहे.  सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आजच्या दिवशी मानाचा मुजरा..

  • भूषण टारे

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.