“फिटलं म्हणा.. !” या घोषणेने क्रांतिसिंहांनी बीडच्या शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळवून दिली

बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात. इथं लहान बाळ सुद्धा पाळण्यातच कार्यकर्ता बनून राजकारणात येतो असं म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि बीडच्या निवडणुका एकीकडं. इतरांनी ऐकले देखील नसेल अशा गोष्टी या निवडणुकामध्ये होत असतात. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत कोट्यवधीचा चुराडा होत असतो.

मात्र याच बीडला एकेकाळी कम्युनिस्टांचा गड म्हणून ओळखलं जायचं. देशभरावर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला लढत बीड मध्ये कम्युनिस्टांकडून दिली जायची. या जिल्ह्याला हैद्राबाद मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्यलढ्याचा देखील वारसा लाभला होता.

बीड चे पहिले खासदार म्हणजेच रामचंद्र परांजपे हे देखील स्वातंत्र्यसैनिक होते. कोणतेही पैशांचे बळ नसताना डाव्या आघाडीकडून लढून त्यांनी विजय मिळवला होता. तेव्हा पासून मात्र बीड मध्ये दोन वेळा काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला होता.

गोष्ट आहे १९६७ सालची. काहीही करून बीड वर विजय मिळवायचा म्हणून कम्युनिस्टांनी कंबर कसली होती. तेवढ्यासाठी त्यांनी उमेदवार सातारहून मागवला होता.

ते होते स्वातन्त्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील

एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या नाना पाटलांनी स्वातंत्र्यानंतर विचारधारेची सर्व पदांचा त्याग करत काँग्रेस सोडली. शेकाप, प्रजा समाजवादी, संयुक्त महाराष्ट्र समिती यांच्या माध्यमातून डाव्या विचारांचं राजकारण केलं.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी नाना पाटील सातारचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र १९६२ साली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या विरुद्ध त्यांचे साथीदार किसन वीर यांना काँग्रेसचं तिकीट दिल व तब्ब्ल एक लाख मतांनी निवडून आणलं.

नाना पाटलांची लोकप्रियता अफाट होती. अस्सल ग्रामीण ढंगात कडाडणारी त्यांची भाषणं संपूर्ण राज्यभरात गाजायची. मात्र पैशांचं व सत्तेचं पाठबळ नसल्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव होत होता. नाना पाटलांसारखी मुलुखमैदान तोफ लोकसभेत असावी ही कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. म्हणूनच त्यांना बीड मधून तिकीट देण्यात आलं होतं.

या जिल्ह्यांतील बहुतांश आमदार हे कम्युनिस्ट होते. त्यामुळे जिंकण्याची शक्यता जास्त होती. मात्र नाना पाटलांचा सामना होता कॉंग्रेसच्या अ‍ॅड. द्वारकादास मंत्री यांच्याशी. अ‍ॅड. द्वारकादास मंत्री हे बीडचे सीटिंग खासदार होते. ते आपल्या भागात मोठे लोकप्रिय होते. त्यांचं पक्षात देखील मोठं वजन होतं.

आर्थिक बाजू मजबूत असलेल्या अ‍ॅड. मंत्री यांनी राज्यभरातून प्रचारासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, देवीसिंग चव्हाण अशा मातब्बर नेत्यांना बोलावलं होतं. काँग्रेसच्या प्रचारसभेत झगमगाट असायचा. आश्वासनांची लयलूट होत होती. मोठमोठे नेते पाठीशी असल्यामुळे अ‍ॅड. द्वारकादास मंत्री यांचा विजय पक्का मानला जात होता.

त्यामानाने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रचारासाठी कोणी मातब्बर असे नेते आले नव्हते. ते स्वत:च मातब्बर होते. बैलगाडी, टांगा, सायकलवर प्रचार करण्यात येत होता.

अगदी गावाकडच्या भाषेत सोपी उदाहरणे, किस्से सांगत खुमासदार भाषण करणाऱ्या नाना पाटलांच्या सभा प्रचंड गाजू लागल्या. खेड्यापाड्यातून महिला, पुरुष बैलगाड्या करून फक्त त्यांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले.

ते आपल्या प्रत्येक सभेत दोन उदाहरणे कायम सांगत. त्यातील पहिले हे ‘कणीक तिंबण्यासाठी अगोदर पीठ मळावे लागते. पीठ मळून मळून तयार झाल्यावर ते चांगले वळते.’ या पद्धतीने लोकांनाही चांगल्यासाठी खूप सांगावे लागते. तरच वळतात. या उदाहरणावर लोकांच्या टाळ्या पडत.

दुसरे उदाहरण ते ‘शेतकरी, कामगारांची मोळी ही लाकडाच्या फांद्याप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळलेली असली पाहिजे. एकमेकंत गुतडा निर्माण झाल्यास मोळी तुटत नाही, फुटत नाही’. यावरही लोक भरभरून प्रतिसाद देत.

नाना पाटलांनी संपूर्ण बीडचा मतदारसंघ आपल्या पाय खाली घातला होता. मिळेल त्या जागी मंदिरात ते पाठ टेकवत होते, गरीबाच्या घरची गुळ  शेंगाभाकर आवडीने खात होते. इतका जमिनीवरचा नेता बीडकरांनी यापूर्वी कधीच पहिला नव्हता.

क्रांतिसिंहांच्या भाषणात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांचे प्रश्न असत. तेव्हा शेतकऱ्यांकडेही अनेकांचे कर्ज होते. आधीच हा निजामाच्या अत्याचारामुळे पिचलेला, दुष्काळी भाग. अनेक जण कर्जाचक्रापायी दुर्बळलेलं राहिले होते. कर्जाचं चक्र फिटलं तरच इथला विकास होणार आहे हे नाना पाटलांनी ओळखलं होतं.

त्यासाठी त्यांनी जाहीर सभांमध्ये ‘…फिटलं म्हणा’ अशी घोषणा देण्यास  सुरवात केली.

सावकाराने आपल्या श्रमाच्या घामातूनच पैसा उभारलेला आहे. तो पैसा आपलाच आहे. त्यामुळे सावकाराला एकदा ‘फिटलं म्हणा’ पुन्हा त्याचे काहीही पैसे नसल्याचे स्पष्ट होईल. या पद्धतीने त्यांनी अनेकांना कर्जमाफी मिळवून दिली होती.

गरिबांसाठी लढणारा क्रांतिसिंह आपल्या इथून निवडणूक लढवत आहे याचा बीडकरांना अभिमान होता. त्यांनी भरभरून मते त्यांच्या पदरात टाकली. काँग्रेसच्या धनाड्य उमेदवाराला हरवून नाना पाटलांनी  मोठा विजय मिळाला. या विजयानंतर त्यांची जंगी मिरवणूकही बीड शहरात काढण्यात आली. 

सातारचा क्रांतिसिंह बीडचा खासदार बनला होता.

संदर्भ- जेष्ठ विधिज्ञ मनोहर टाकसळ यांनी दैनिक लोकमतला सांगितलेल्या आठवणी 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.